राज्यातील होमगार्ड्ससाठी आनंदवार्ता ! मानधनात होणार दुप्पट वाढ; फडणवीसांची माहिती
12-Oct-2024
Total Views | 81
मुंबई : राज्य शासनाने होमगार्ड्सच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा शासन आदेशही जारी करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. त्यामुळे आता होमगार्ड्सना देशातील सर्वाधिक मानधन मिळणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील होमगार्ड्सचे मानधन जवळजवळ दुप्पट करण्यासंबंधीचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. प्रतिदिन ५७० रुपयांवरून ते आता १०८३ रुपये इतके करण्यात आले आहे. त्यामुळे आता हे मानधन देशात सर्वाधिक आहे.
याशिवाय विविध भत्त्यांची रक्कम सुद्धा दुप्पट करण्यात आली आहे. उपहार भत्ता १०० वरून २०० रुपये तर भोजन भत्ता १०० वरून २५० रुपये इतका करण्यात आला आहे. राज्यातील सुमारे ५५ हजार होमगार्डना या निर्णयाचा लाभ मिळेल. १ ऑक्टोबर २०२४ पासून ही वाढ देण्यात येईल. तसेच गेल्या महिन्यात सुमारे ११ हजार २०७ होमगार्ड्सची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याची माहितीसुद्धा फडणवीसांनी दिली आहे.