मुंबई, दि. १२ : राज्यातील विविध गृहनिर्माण योजना सक्षमपणे राबविण्याकरिता व परवडणार्या किंमतीत घरे उपलब्ध होण्याकरिता सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था, वास्तुशास्त्रज्ञ, विकासक व इतर सर्व संबंधित नागरिकांनी आपल्या सूचना गृहनिर्माण विभागाचे सल्लागार यांचे म्हाडा गृहनिर्माण भवनातील कार्यालय येथे पाठविण्याचे आवाहन गृहनिर्माण विभागाचे सल्लागार राजेंद्र मिरगणे यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाने राजेंद्र मिरगणे यांची गृहनिर्माण विभागासाठी सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये विविध गृहनिर्माण योजना सक्षमपणे राबविण्याकरिता सध्या अस्तित्वात असणारी धोरणे, नियमावली यामध्ये सुधारणा, बदल सुचविणे अशी कार्यकक्षा निश्चित करण्यात आली आहे. सहकारी गृहनिर्माण संस्था, वास्तुशास्त्रज्ञ, विकासक व इतर सर्व संबंधिताकडून मागविण्यात आलेल्या सूचनांचा विचार करून गृहनिर्माण विभागास अहवाल सादर करण्यात येईल, असे मिरगणे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
संबंधितांनी आपल्या सूचना अध्यक्ष, सल्लागार समिती, गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र शासन यांचे कार्यालय, दालन क्र. ४२६, तिसरा मजला, गृहनिर्माण भवन, म्हाडा, कलानगर, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०००५१ या कार्यालयीन पत्यावर व chairmanadvisorycommittee@gmail.com या ई मेल आयडीवर दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पाठवण्यात याव्यात, असे आवाहन गृहनिर्माण विभागाचे सल्लागार राजेंद्र मिरगणे यांनी केले आहे.