मुंबई : आमदार अपात्रता प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीवर भाष्य केले. तसेच आम्ही शेवटी जनतेच्या न्यायालयात लढणारी लोकं आहोत, अशी भुमिका मांडली. मात्र त्यांची ही भुमिका जनतेच्या मनात भावनिक वातावरण निर्माण करण्यासाठी आहे. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यातून रडीचा डाव बघायला मिळाला, अशी घाणघाती टीका भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केली.
माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, उद्धव ठाकरेंचा रडीचा डाव आज त्यांच्या वक्तव्यातून बघायला मिळाला. न्याय व्यवस्था कुठलीही असो किंवा विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर हे त्या भूमिकेत असो ते कायद्याला अनुसरूनच नियमानुसार निर्णय घेत असतात. आता कायदेशीर बाबतीत आपण बॅकफुटला असल्याचे उद्धव ठाकरेंना दिसतेय अशा मानसिकतेतून उद्या जर निकाल आला तर जनतेला असे वाटावे की मुख्यमंत्री, सरकार आणि अध्यक्ष यांनी मिळून प्रतारणा केलीय अशा प्रकारचे भावनिक वातावरण निर्माण करण्यासाठी रडीचा डाव उद्धव ठाकरे खेळले असल्याची टीकाही दरेकरांनी केली.
तसेच उद्धव ठाकरेंनी कधीच विकासाचे, जनहिताचे, सर्वसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी राजकारण केले नाही. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासावर कधी बोलले नाहीत. केवळ भावनिक वातावरण तयार करायचे जातीय तेढ निर्माण करायची. प्रकशोभक वातावरण तयार करायचे आणि अशा प्रकारचे भावनिक वातावरण तयार करून आपल्याला या प्रतिकूल परिस्थिती काही लाभ मिळतोय का? हाच केविलवाणा आणि दुर्दैवी प्रयत्न उद्धव ठाकरे यांचा दिसून आल्याचेही दरेकर म्हणाले.
राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत. विधिमंडळ हेही जनतेचे न्यायालय आहे. तिथेच जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. अध्यक्ष हेही जनतेचाच प्रतिकात्मक भाग असतो. परंतु आता निर्णय आपल्या बाजूने लागणार नाही असा त्यांचा ठाम समज झाल्याने अशा प्रकारची धडपड जनतेच्या न्यायालयात बोलून उद्धव ठाकरेंची सुरू आहे. विधिमंडळ हेही जनतेचे न्यायालय आहे आणि राहुल नार्वेकर हेही जनतेचे प्रतिनिधी आहेत, असेही दरेकर म्हणाले.
चौकशी होत असेल तर त्याला सामोरे जायला हवे
ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्या घरावर पडलेल्या ईडी धाडीवर बोलताना दरेकर म्हणाले की, ईडी ही न्यायव्यवस्था, तपासणी व्यवस्था आज नाही. काँग्रेसच्या काळापासून ईडी कार्यरत आहे. अलीकडच्या काळात कारवाई झाली की राजकीय उद्देशाने झाली अशा प्रकारचा बोंब मारण्याचा कार्यक्रम विरोधक करत असतात. अनेक प्रकारचे घोटाळे, भ्रष्टाचार केल्यानंतर जर चौकशी होत असेल तर त्याला इमानेइतबारे सामोरे जायला हवे, असेही दरेकरांनी विरोधकांना सुनावले.