सह्याद्री व्याघ्र प्रकल्प वाघांसाठी सज्ज...

    08-Jan-2024   
Total Views |


Sahyadri Tiger Reserve

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नुकतंच वाघाचं दर्शन घडलं. व्याघ्र प्रकल्प असूनही वाघ नाही यामुळे अनेकदा याविषयी नकारात्मक प्रतिक्रियाच अधिक उमटताना दिसतात. याच पार्श्वभूमीवर सह्याद्रीतल्या वाघांवर या व्याघ्र प्रकल्पाच्या १४व्या वर्धापन दिनानिमित्त प्रकल्पाचे उपसंचालक आणि उपवनसंरक्षक 'उत्तम सावंत' यांची ही मुलाखत...


१) सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघ नाही, अशी टीका नेहमी केली जाते, अशा परिस्थितीत ‘एनटीसीए’ (National Tiger Conservation Authority) कडून प्रकल्पाला 'व्हेरी गूड कॅटेगिरी'चा दर्जा मिळण्याची किमया कशी साधली?

सह्याद्रीमध्ये मुळात पहिल्यापासूनच वाघांचा अधिवास होता. अगदी २०११ पर्यंत सह्याद्रीतील कॅमेरा ट्रॅप्समध्ये वाघांचे दर्शन घडत होते. परंतु, नंतर अनेक कारणांचे परिणामस्वरुप म्हणुन येथील वाघांची संख्या कमी कमी होत गेली. अलीकडे अशी परिस्थिती आहे की, ‘रेसिडंट’ म्हणजेच व्याघ्र प्रकल्पात वास्तव्यास असणारे वाघ नाहीत. पण, ‘ट्रांझीयंट’ म्हणजेच फिरत फिरत येणारे वाघ या व्याघ्र प्रकल्पात सध्या आहेत. नवीन प्रदेशाच्या शोधात हे वाघ सह्याद्रीत येत असतात. पश्चिम घाट असेल किंवा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, वाघाचा अधिवास वाचविणे गरजेचे आहे, तरच इथे वाघ येऊन राहू शकतील. त्यामुळे व्याघ्र अधिवास सुरक्षित आणि संवर्धित करणे गरजेचे आहे. ‘एनटीसीए’कडून दर चार वर्षांनी जे मूल्यांकन केले जाते त्यामध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला हा व्हेरी गुड या श्रेणीत स्थान मिळाले. Management Effectiveness Evaluation (व्यवस्थापन परिणाकारकता मूल्यांकन) हे त्यामध्ये केले जात असून त्यामध्ये व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या हा एक निकष असला तरीही इतर ३३ विविध प्रकारचे अनेक निकष आहेत. व्याघ्र अधिवास वाचविण्यासाठीच्या उपाययोजना, विविध कागदपत्रे अशा अनेक गोष्टी तपासूनच ‘एनटीसीए’ आपला निर्णय देत असते. त्याचबरोबर, केवळ व्याघ्र अधिवासच नाही, तर त्या परिसंस्थेतील इतर वन्यजीवांना वाचविण्यासाठीही कोणत्या उपाययोजना केल्या जातात याचीही पडताळणी केली जाते. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आम्ही करत असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना पाहता ‘एनटीसीए’ने सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व्हेरी गुड कॅटेगरीमध्ये ठेवला आहे.



Uttam Sawant

२) वाघ म्हटले की, पुन्हा ‘प्रे-बेस’ म्हणजेच इतर तृणभक्षी प्राण्यांचा प्रश्न येतो. त्यामुळे प्रकल्पामध्ये या प्राण्यांची संख्या नैसर्गिकरित्या मुबलक प्रमाणात आहे का? त्याचबरोबर ती वाढवण्यासाठी कोणत्या पद्धतीचे प्रयत्न केले जात आहेत?

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यासाठी डेहराडूनची संस्था ‘वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ यांच्या मार्गदर्शनाखाली २०१७ पासून 'टायगर रिकव्हरी प्रकल्प' सुरू होता. प्रकल्पात वाघांचा अधिवास असण्यासाठी संरक्षण, तृणभक्षी प्राणी आणि अबाधित जंगल अशा काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. वाघांवर नजर ठेवण्यासाठी जे कॅमेरा ट्रॅप्स लावले जातात, त्यामध्ये इतर ही वन्यप्राण्यांचा येणार्‍या फोटोनुसार पाहिले, तर साधारणतः २० ते २५ तृणभक्षी प्राणी प्रति चौरस किलोमीटर आहेत. क्षेत्रामध्ये असलेल्या तृणभक्षी प्राण्यांची संख्या लक्षात घेऊन यानुसार एखाद्या क्षेत्राची 'Tiger Carrying Capacity' ठरवली जाते. या अनुषंगाने विचार केला असता सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये २५ हून अधिक वाघ वास्तव्यास राहू शकतात, अशी परिस्थिती आहे. त्यापैकी ४५० चौरस किलोमीटर क्षेत्र असे आहे. ज्यामध्ये आता वाघांचं स्थानांतरण करता येऊ शकेल. याविषयी स्थानिकांच्या मतांना ही प्राधान्य दिले जाते, या पार्श्वभूमीवर स्थानिकांशी चर्चा केली असता जंगलालगत असणार्‍या गावांमधील स्थानिकांना बिबटे व इतर वन्य प्राण्यांची आधीच भीती असल्यामुळे त्यांच्याकडून नकार मिळत होता. परंतु, जंगलापासून काही अंतरावर असणार्‍या गावकर्‍यांचे सकारात्मक मत पाहायला मिळाले. वाघांचे स्थानांतरण करताना जंगलालगत असलेल्या गावांचे पुनर्वसन केले जाणार आहे. त्याबरोबर या सर्वेक्षणामध्ये केवळ वाघांचे स्थानांतरण नाही, तर तृणभक्षी प्राण्यांची संख्या अधिक वेगाने वाढण्यासाठी त्यांच्यात प्रजनन घडवून आणण्याबाबत ही सुचविले गेले आहे. यामध्ये चितळ, सांबर अशा प्राण्यांचे स्थानांतरण करून त्यांच्यामध्ये प्रजनन घडवून आणता येऊ शकते. चांदोली जवळ असणार्‍या सागरेश्वर अभयारण्यातून २०२१ पासून चितळ स्थानांतरित केले जात असून अशा पद्धतीनेच ’प्रे-ऑगमेंटेशन’ प्रकल्प चालू आहे. या व्यतिरिक्त कात्रज, ताडोबा, पेंच अशा इतर ठिकाणांवरून ही चितळ आणण्याच्या परवानग्या मिळाल्या असून त्याबाबत लवकरच विचार केला जाईल.
याबरोबरच, अलीकडे रानगव्यांची संख्या अधिक वाढलेली दिसत असून त्यामुळे हल्ले आणि होणारे नुकसान वाढले आहे. गव्याला खाणारा एकमेव प्राणी म्हणजे वाघ, त्यामुळेच वाघांची संख्या वाढली, तर आपसुकच रानगव्यांची संख्याही कमी होणार आहे, असे वाटते.

३) व्याघ्र स्थांनातरणाची प्रक्रिया कशा पद्धतीने पार पाडली जाईल? आणि त्यासाठी सद्यःस्थितीत प्रशासन कोणत्या पद्धतीचे प्रयत्न करत आहे?

वाघांसाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा अधिवास पूरक असल्यामुळे स्थांनातरणासाठी सर्वांत महत्त्वाची बाब असणारी परवानगी आपल्याला मिळाली आहे. ताडोबामधून ज्याप्रमाणे वाघ आणण्यासाठी विचार सुरू आहे, त्याचा विचार केला, तर एका वेगळ्या प्रदेशातून (लँडस्केप) वाघ आणणार असल्यामुळे त्यांच्यावर एक प्रकारचा ताण आलेला असतो. या वाघांना आणल्यानंतर त्यांना सोडण्याच्या ’हार्ड रिलीज’ आणि ’सॉफ्ट रिलीज’ असे दोन प्रकार असतात. नागझिरामध्ये सोडलेले वाघ हे ’हार्ड रिलीज’चं उदाहरण आहे. मात्र, सह्याद्रीमध्ये आणावयाचे वाघ ’सॉफ्ट रिलीज’ केले जाणार आहेत. वाघांना पकडण्यापासून त्यांचा प्रवास, वैद्यकीय तपासण्या आणि बदललेला भूप्रदेश यामुळे त्यांच्यावर निर्माण झालेला ताण हलका करून मग त्यांना वन्य अधिवासात सोडले जाईल. जेणेकरून त्यांची या परिसरामध्ये टिकून राहण्याची शक्यता अधिक वाढते. यासाठी व्यवस्थित तयारी केली जात असून वाघांच्या स्थानांतरणावर विविध ठिकाणी जाऊन अभ्यासही करण्यात आला आहे. यामध्ये ‘WII’चे सल्लागार म्हणून सल्ले आणि मदत ही घेतली जात आहे.




Tiger in Sahyadri

४) नुकतेच प्रकल्पात वाघाचे दर्शन झाले आहे? त्यासाठीचे नियोजन कशा पद्धतीने होत आहे?

सध्या राधानगरी ते तिलारी क्षेत्रात असलेले वाघांपैकी हे वाघ असावेत असे म्हटले जाते. त्याचबरोबर, कर्नाटकजवळ असलेल्या वनक्षेत्रातून ही येण्याची शक्यता होती. मात्र, कर्नाटक वनविभागाबरोबर तपासणी केली असता,त्यांच्याकडून या वाघाची नोंद आढळली नाही, असे असले तरी कॅमेरा ट्रॅपमध्ये आलेला हा वाघ त्याच क्षेत्रातून आल्याची शक्यता आहे. हा वाघ नर जातीचा असून तो मादीच्या तसेच स्वतःच्या भूप्रदेशाच्या शोधातच आला असल्याची दाट शक्यता आहे. या वाघाला मादी मिळाली नाही, तर तो तिथेच न थांबता पुढे मादीच्या शोधात आपला प्रवास सुरू ठेवतो. स्थानिक निसर्गप्रेमी आणि अभ्यासकांच्या मते, या कालावधीत दरवर्षी अशाप्रकारे (ट्रांझीयंट) वाघ येतात. त्यामुळेच स्थानांतर करताना ते या कालावधीत करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. जेणेकरून इथे आलेले ’ट्रांझीयंट टायगर’ स्थिरावू शकतील.


५) दक्षिण सह्याद्रीमधून येणारे वाघ हे नैसर्गिकरित्या प्रकल्पात स्थिरावण्यासाठी भविष्यात काय उपाययोजना कराव्या लागतील?

वेगवेगळ्या भूप्रदेशात राहणारे वाघ एकत्र यायला हवेत जेणेकरून त्यांच्यामध्ये अनुवांशिक विविधता येईल. एकाच भूप्रदेशातील वाघांचे प्रजनन झाले, तर येणारी पिढी ही त्याच प्रकारची असल्यामुळे शाश्वततेच्या दृष्टीने ते धोक्याचे आहे. त्यामुळे विविध भागातील जंगलांमध्ये ठेवण्यात आलेले भ्रमणमार्ग सुस्थितीत राहण्याची गरज आहे. या भ्रमणमार्गातून वन्यजीवांची ये-जा झाल्यामुळे त्यांचे प्रजनन घडून आल्यास अनुवांशिक विविधता निर्माण होण्यास मदत होणार आहे.


६) सह्याद्रीत घोषित झालेल्या संवर्धन राखीव क्षेत्रांचा व्याघ्र भ्रमणमार्गाच्या अनुषंगाने व्याघ्र प्रकल्पाला कशा पद्धतीने उपयोग होतोय ?

सह्याद्रीच्या जवळ असलेली ‘सोर्स पॉप्युलेशन’ म्हणजेच प्राण्यांची संख्या असलेली ठिकाणे म्हणजे कर्नाटकचे ’काली टायगर रिझर्व्ह’. त्याचबरोबर इतर ठिकाणांचा ही विचार केल्यास ते अनेक नद्यांचे उगमस्थान असल्यामुळे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच, या भ्रमणमार्गामधून येणार्‍ङ्मा वाघांवर कॅमेरा ट्रॅपमार्फत नजर ठेवण्यात आली असून त्यामुळे अनेक गोष्टी समजण्यास मदत झाली. भ्रमणमार्गांना असणारे धोके लक्षात घेऊन त्यावर काम करण्याची गरज आहे. त्याचबरोबर, संवर्धन राखीव क्षेत्रांचा ही प्रकल्पाला फायदा होत आहे.



Tiger in Sahyadri


७) निसर्ग पर्यटनाच्या अनुषंगाने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये भविष्यात काय नावीन्यपूर्ण पाहता येणार आहे?

वाघांचे व्यवस्थापन हा मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा असला तरी तो एकमेव प्रश्न नाही. त्याबरोबर वाघांचे, त्यांच्या तृणभक्षी प्राण्यांचे आणि आजूबाजूला असलेल्या स्थानिक यांचे सगळ्यांचे संरक्षण ही एक मोठी समस्या आणि जबाबदारी ही असते. वाघ वाढविण्यासाठी प्रथम वाघांविषयी स्थानिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची गरज लक्षात घेऊन त्यांच्या मनामध्ये त्याविषयी आदर निर्माण व्हायला हवा, यासाठी वनविभाग प्रयत्नशील आहे. वाघांचे तसेच इतर वन्यजीवांसाठी पोषक वातावरण निर्मिती, नैसर्गिक संसाधनांची उपलब्धता आणि मानवी वावर कमी करून अबाधित जंगल संरक्षित करून त्यांचा अधिवास सुरक्षित करणे या ही जबाबदार्‍या पार पाडाव्या लागतात. स्थानिक गावकर्‍यांची जंगलावरचे अवलंबित्व कमी करून जंगल संवर्धित करणे जसे गरजेचे आहे, तसेच त्यांना रोजगार मिळवून देणे ही गरजेचे आहे. ज्यामुळे त्यांच्यामध्ये व्याघ्र प्रकल्प आणि वाघाविषयी चांगली भावनाही निर्माण होण्यास मदत होईल. ’डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजने’अंतर्गत गावांना आर्थिक साहाय्य ही केले जात आहे. स्थानिक तरुणांना शहरात नोकरीसाठी न जाता तिथेच निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामध्ये होम स्टे, गाईड यांचा समावेश करत त्यांना प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘एनआयसी’ म्हणजेच ‘नेचर इंटरप्रिटेशन सेंटर’ सुरू करण्याबाबत ही विचार झाला आहे. मानव व्याघ्र संघर्ष योग्य पद्धतीने हाताळण्याबरोबरच, नेचर एजुकेशन, संशोधकांसाठी छोटेखानी रिसर्च स्टेशन, वैज्ञानिक ग्रंथालय अशा वैविध्यपूर्ण गोष्टी सुरू करण्याचा आराखडा तयार झाला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये सात जिल्ह्यांना समाविष्ट करत निसर्ग पर्यटन आराखडा तयार करण्यात आला असून यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. ज्यावेळी सामान्यांच्या मनात व्याघ्र प्रकल्पाविषयी सकारात्मक भावना निर्माण होईल त्यावेळीच ते व्याघ्र प्रकल्पाचे संवर्धन आणि संरक्षण करू लागतील. त्यामुळे, स्थानिकांचा सहभाग, अभ्यासपूर्ण व्यवस्थापन आणि त्याला कृतीची जोड देत या व्याघ्र प्रकल्पाला पुन्हा नव्याने उभारी देण्याच्या या प्रयत्नाला लवकरच यश मिळेल अशी आशा आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.