नवी दिल्ली : भारतविरोधी भूमिका घेतल्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाने मालदीवच्या भारतातील उच्चायुक्तांना पाचारण केले आणि अवघ्या चारच मिनिटात त्यांना समज देऊन रवानाही करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलच्या अपमानास्पद वक्तव्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भारताने मालदीवचे उच्चायुक्त इब्राहिम साहिब यांना सकाळीच पाचारण केले होते.
त्यानंतर इब्राहिम शाहिब दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयाच्या साऊथ ब्लॉकमध्ये पोहोचले. यावेळी दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या वादावर चर्चा झाली. त्यानंतर अवघ्या चारच मिनिटात चर्चा संपवून परराष्ट्र मंत्रालयाने साहिब यांना रवानाही केले होते. यावेळी भारतासोबत संबंध सुरळीत करण्याची जबाबादारी आता मालदीवच्या राष्ट्रपतींची आहे, अशीही समज भारताने साहिब यांना दिल्याचे समजते.
भारत आणि मालदीवमधील वादाचा परिणाम आता पर्यटकांवरही दिसून येत आहे. भारतीय प्रवासी कंपन्या आता मालदीवसाठी बुकिंग रद्द करत आहेत आणि पर्यटकांना लक्षद्वीपला जाण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. यासाठी ट्रॅव्हल कंपन्यांनी लक्षद्वीपला जाण्यासाठी खास पॅकेजही सुरू केले आहेत.
त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या लक्षद्वीप भेटीमुळे सुंदर बेटांमधील पर्यटनाला चालना मिळाली आहे. केंद्रशासित प्रदेशासाठी प्लॅटफॉर्मवरील शोधांमध्ये 3,400 टक्क्यांनी मोठी वाढ झाली आहे, असे मेक माय ट्रीप या पर्यटन कंपनीने म्हटले आहे. यापूर्वी ईज माय ट्रीप या भारतातील प्रमुख पर्यटन पोर्टलनेही मालदीवच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.