मगरींची लंका

    08-Jan-2024   
Total Views |
Sri Lanka with climate change does human-crocodile conflict

दक्षिण श्रीलंकेतील मतारा जिल्ह्यातील अकुरेसा येथील टी इस्टेटमध्ये (चहाच्या मळ्यात) पक्षी, खारी, ससे आणि साप आढळून येतात. परंतु, गेल्या आठवड्यात तिथे एक १५ फूट लांबीची मगर आढळून आली होती. टी इस्टेटमध्ये काम करणार्‍या, कर्मचार्‍यांच्या लक्षात येताच, त्यांनी स्थानिक वन विभागाच्या मदतीने या मगरीचा बचाव केला. हवामान बदलामुळे गेल्या काही दिवसांत श्रीलंकेत सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. विषुववृत्ताच्या जवळ असल्यामुळे, श्रीलंकेत हवामान बदलाचे पडसाद अधिक दिसून येतात. वर्षातील अनेक महिने दुष्काळ पडतो, कमी कालावधीत खूप पाऊस पडतो आणि नद्यांना पूर येतात. नदीचे पात्र रुंदावणारा हा पूर नदीतील मगरींना किनारी येण्यास भाग पाडतो आणि या मगरी मानवी वस्त्यांमध्ये शिरल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण असते.

दक्षिण श्रीलंकेतून वाहणार्‍या नीलवाला नदीला आलेल्या पुरांमुळे मानव-मगर संघर्ष वाढला आहे. अलीकडील पुराच्या घटनांदरम्यान, मगरींशी संबंधित कोणतीही गंभीर घटना नोंदवली गेली नाही; परंतु वन्यजीव अधिकार्‍यांना मगरींना पिटाळून लावण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नसल्याचे दिसून आले आहे. चहाचे मळे हे काही या खार्‍या पाण्याच्या मगरींचे (क्रोकोडायलस पोरोसस) निवासस्थान नाही. परंतु, जोरदार पाऊस झाल्यामुळे, जवळच्या नीलवाला नदीला पूर येऊ लागला. ही मगर पूरग्रस्त भागाच्या काठावर पोहोचली असावी आणि पूर ओसरल्यावर चहाच्या प्लॉटमध्ये अडकली असावी. यापूर्वी २०१७ साली अशाच एका मळ्यात मगर शिरल्याची घटना समोर आली होती. मानवी वस्तीत शिरल्यावर योग्य बचाव न झाल्यामुळे, या मगरींचा अंत होतो.

२०१६ मध्ये झालेल्या ‘फ्लॅश फ्लड’ म्हणजेच आकस्मिक पुरामध्ये अशीच एक मोठी मगर वेरादुवा गावच्या किनार्‍यावर आढळून आली होती. पाऊस थांबल्यावर पूर ओसरू लागला आणि पाणी कमी झाल्यामुळे मगरी इमारतींमध्ये किंवा घराच्या बागांमध्ये अडकलेल्या आढळल्या. यावेळी पुरामुळे घरे सोडलेल्या, लोकांना घरी परतल्यानंतर सावध राहण्याची सूचना प्रशासनाकडून करण्यात आली. पूर कमी होत असताना, काही मगरी कल्व्हर्टमध्ये येतात, त्यामुळे त्यांच्या जवळ न जाणेच चांगले असल्याचे स्थानिक प्रशासनाने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले होते. २०२३च्या ऑक्टोबरमध्ये आलेल्या एका भीषण पूर प्रसंगादरम्यान, अनेक भातशेती आणि चक्क रस्त्यांवर मगरी दिसल्या. नदीला जोडलेल्या अनेक कालव्यांमध्ये मगरीही गेल्या होत्या. यादरम्यान सोशल मीडियावर लोकांना मगरींबद्दल माहिती देणार्‍या आणि एका कुत्र्याला मगरीने पकडल्याच्या घटनेचा संदर्भ देत पोस्ट्स होत्या.

जगात मगरींच्या २४ प्रजाती आहेत. परंतु, मानवांवर हल्ला करण्यासाठी फक्त आठ प्रजाती ज्ञात आहेत. श्रीलंकेत मगरींच्या दोन प्रजाती आहेत-मगर (क्रोकोडायलस पॅलुस्ट्रिस) आणि खार्‍या पाण्याची मगर. साधारणपणे खार्‍या पाण्यातील मगरींना शांत पाणी आवडते. या मगरी प्रवाही पाण्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. २००८च्या मगरी सर्वेक्षणादरम्यान, संशोधकांच्या चमूने नीलवाला नदीच्या पाच किलोमीटर ( तीन मैल) पट्ट्यात सुमारे ५० मगरी नोंदवण्यात आल्या होत्या. मगरी मानवी वस्तीत येत असल्या, तरी त्या शक्य तितक्या माणसांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. २०१५ मधील पुरादरम्यान नदीच्या दोन्ही बाजूंचे किनारे दिसत नव्हते. असा वारंवार येणारा पूर मगरींसाठी वाईट ठरू शकतो. कारण, पुरामुळे पाण्याचा प्रवाह वाढून, मगरींची घरटी सहजपणे नष्ट होऊ शकतात. मादी मगर नदी किनारी बांधलेल्या, घरट्यात अंडी घालते. पुरामुळे ही घरटी नष्ट होऊ शकतात.

दक्षिण श्रीलंकेत नीलवाला नदी ही लहान खेड्यांमध्ये राहणार्‍या लोकांसाठी जीवनवाहिनी आहे. परंतु, मगरींच्या वाढत्या धोक्यामुळे, लोकांनी नदीमध्ये प्रवेश करणे बंद केले आहे. नदीतील मगरींबद्दल अनेक लोककथा आहेत. नीलवाला ऐतिहासिकदृष्ट्या अनेक मगरी होत्या. यापूर्वी जुन्या पिढीतील लोक नदीत पोहायचे. परंतु, आता मगरीच्या संभाव्य हल्ल्याच्या भीतीमुळे नदीकडेला राहणारे नदीत जास्त वेळ पोहत नाहीत. गेल्या २३ वर्षांपासून नदी किनारी राहणारे संशोधक सांगतात की, गेल्या दोन दशकांत जेवढ्या घटना झाल्या नाही, तेवढ्या घटना मागील चार वर्षांत घडल्या आहेत. हा हवामान बदलाचा परिणाम आहे. जगभरात हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

उमंग काळे

पर्यावरण प्रतिनिधी, वन्यजीव छायाचित्रकार.
 
जंगलात फिरून विविध जीव कॅमेरात कैद करण्याची आवड, मध्य भारतातील बहुतांश जंगलात फिरण्याचा अनुभव. रामनारायण रुईया महाविद्यालयातून 'बी. एम. एम.' पदवी प्राप्त करून पर्यटन शास्त्रात पदव्युतर शिक्षण. आणि नाविन्याचा ध्यास.