चतुरस्त्र कलावंत सानिका

    07-Jan-2024   
Total Views |
Article on Sanika Indap

अयोध्येतील श्रीराम मंदिरांची डोंबिवलीत प्रतिकृती साकारण्यात योगदान देणारी सानिका इंदप ग्राफीक डिझाइनर तसेच केक निर्मितीही करते. सांस्कृतिक वारसा लाभलेली सानिका चतुरस्त्र कलावंत आहे.

सानिकाचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण डोंबिवलीतील मॉडेल इंग्लीश स्कूलमधून झाले. बारावीपर्यंतचे शिक्षण तिने वाणिज्य शाखेतून पूर्ण केले असून तिने अंधेरी येथील एका संस्थेतून कला क्षेत्रात येण्यासाठी ‘ग्राफिक डिझायनर’ आणि ‘व्हीएफएक्स’चा अभ्यासक्रम पूर्ण केला. चार वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सानिकाला नोकरीसाठी अनेक संधी चालून आल्या. पण त्या काळात ‘कोविड’ असल्याने संधी स्वीकारणे शक्य नव्हते. या काळात सानिकाने सोशल मीडियावर लोगो डिझाईन करण्यास सुरुवात केली, तर दुसरीकडे बेकरी उत्पादने बनविण्यास सुरुवात केली. सानिकाला कलेचा वारसा वडिलांकडून तर कुकिंगचा वारसा आई संगीता यांच्याकडून मिळाला आहे. सानिकाचे वडील हे प्रसिद्ध कला दिग्दर्शक आहेत, तर आईला विविध खाद्यपदार्थ सोबतच केक ही बनविण्याची आवड आहे. आईच्या या कलेला अधिक उंचीवर नेण्याचे काम सानिकाने केले आहे.

केक बनविण्याचे कोणतेही प्रशिक्षण न घेता ती केक तयार करू लागली. तिचे केक चवीला जेवढे चांगले तेवढीच त्याच्यावरची सजावटदेखील मनाला भुरळ घालते. सानिकाने कस्टमाईज केक करायला सुरुवात केली. कोणतीही प्रसिद्धी न करताच तिच्या केकची प्रसिद्धी झाली. त्यातूनच तिच्या स्नेहीजनांनी तिला एवढे सुंदर केक करते, तर ऑर्डर घ्यायला सुरुवात कर असा आग्रह केला. आई-वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत सानिका दोघांचे ही स्वप्न पूर्ण करताना दिसत आहे. संगीता यांच्या आई यादेखील सानिकाला तिच्या करियरमध्ये यशस्वी होण्यासाठी पाठिंबा दिला. सानिकाचा मोठा भाऊ निखिलने ही सानिकाला तिच्या करियरमध्ये मोलाचे मार्गदर्शन केले आहे. सानिकाच्या घरातच कलेचा वारसा होता. फक्त आजी आजोबांना त्याकाळात फारशी संधी मिळाली नाही. मात्र, स्वत:ला सिद्ध करण्याची संधी माझ्या वडिलांना आणि मला मिळाल्याचे सानिका सांगते.

दि. २२ जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. अयोध्येतील या मंदिराला भेट देण्याची रामभक्तांची इच्छा आहे. मात्र, त्याआधीच तशाच राममंदिराची झलक बघण्याचे भाग्य डोंबिवलीकरांना लाभले. डोंबिवली जिमखाना आणि सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवारच्या माध्यमातून डोंबिवली जिमखान्याच्या मैदानावर अयोध्येतील श्रीराममंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली. अयोध्येतील श्रीरामांचे मंदिर कसे असेल याची झलक कशी असेल यावरून समजले. ही प्रतिकृती उभारण्यात सानिका इंदप हिची मोठी भूमिका आहे. विशेष म्हणजे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केल्यानंतर सानिकाची ही पहिलीच कलाकृती आहे.

सानिकाचे वडील उदय हे तिचे या क्षेत्रातील आदर्श आहेत. उदय यांचे या क्षेत्रात मानानं नाव घेतले जाते. ते गेली ४५ वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत. लग्नाचे भव्य सेट उभारण्यात त्यांचा हातखंडा आहे. समाजातील अनेक प्रश्नांना त्यांनी आपल्या सेटच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम केले आहे. त्यांनी अनेक वर्ष फिल्म सिटीमध्ये काम केल्यावर स्वत:चा व्यवसाय सुरू केला. त्यांचा हा प्रवास सानिका जवळून पाहत होती. त्यामुळे सानिकादेखील वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत आहे. सध्या सानिकाने आपली कमर्शियल आणि व्हीएफएक्स आर्टिस्ट म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे. राम मंदिरांच्या उभारणीसाठी सानिकाने वडिलांच्यासोबत दिवसरात्र मेहनत घेतली आहे. सानिकाने ‘माय हॅपीनेस’ नावाचा स्वत:चा एक बॅण्ड तयार केला आहे. त्याचबरोबर गेल्या चार वर्षांपासून सानिका बेकरी उत्पादनाचे प्रशिक्षण तरुण-तरुणींना मिळावे, याकरिता कार्यशाळा घेत आहे.

ज्यांना शिकण्याची इच्छा आहे व त्यांची आर्थिक परिस्थिती नसलेल्यांना सानिका मोफत प्रशिक्षणही देते. तिच्याकडून आतापर्यंत १०० हून अधिक जणांनी प्रशिक्षण घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे. एक दिवस आणि एक महिना अशा दोन प्रकारचे वर्कशॉप डोंबिवली आणि ठाणे याठिकाणी लावले जातात. सानिका एक किलोपासून ते १५ किलोपर्यंतचे केक बनविते. ‘कोविड’ काळात केवळ कुटुंबीय आणि नातेवाईकसाठी सुरू केलेला केकचा हा तिचा व्यवसाय हळूहळू वाढू लागला आहे. स्वत:चे केक शॉप टाकण्याचा सानिकाचा मानस आहे. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनीही सानिकाच्या केकचे कौतुक केले आहे. सगळ्यात मोठा पिझ्झा केक ही सानिकांने तयार केला आहे. सानिका कमर्शियल आर्टिस्ट म्हणून व्यस्त असली तरी ती आपल्या बेकरी व्यवसायाला ही वेळ देते. याशिवाय सानिका गिफ्ट हॅम्पर तयार करते. २० हून अधिक कंपन्यासोबत तिने करार केला आहे.

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून राममंदिराची प्रतिकृती उभारण्याची संधी मिळाली हा आयुष्यातील सर्वांत मोठा क्षण असल्याचे सानिका मानते. या मंदिरासाठी तिने महिनाभर मेहनत घेतली आहे, अशा या हरहुन्नरी कला दिग्दर्शिकेला तिच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.