भटके-विमुक्तांची नावे आता मतदारयादीत; निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या प्रयत्नांना यश, शिधापत्रिकांसाठी १५ जानेवारी ते १४ मार्चपर्यंत विशेष मोहीम

    05-Jan-2024
Total Views |
Bhatake Vimukt in electoral roll
 
महाराष्ट्र : राज्यात सतत भटकंती करणाऱ्या भटक्या विमुक्त प्रवर्गातील नागरिकांची मतदार यादीत नोंद करण्यात येणार आहे. यासोबतच शिधापत्रके तयार करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. याबाबतची एक अधिसूचना राज्य सरकारने काढली आहे. राज्यातील भटके विमुक्तांना न्याय देण्यासाठी राज्य सरकारचे दोन मोठे उपक्रम हातील घेतले असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मागणीला मोठे यश मिळाले आहे.

भटक्या विमुक्त जमातीमधील नागरिकांची मतदार नोंदणीची टक्केवारी वाढावी तसेच लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी सर्व घटकातील मतदारांचा समावेश व्हावा यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना मागणी केली होती. त्यात त्यांनी भटके विमुक्त प्रवर्गात मतदार नोंदणी तसेच मतदान कार्य वाटपासाठी विशेष मोहिम राबविण्याची विनंती केली होती. याची दखल घेत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या असून निरंतर पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत भटक्या विमुक्त जातीमधील सुटलेल्या नावाची नोंदणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कार्यवाही सुरू राहणार आहे.

राज्यातील भटके विमुक्त जमातीच्या उत्थानासाठी अनेक योजना असल्या तरी देखील त्याचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिका हा मूळ दस्तावेज नसल्याने सरकारी योजनांचा विशेषत: अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. त्यांना लाभ मिळावा यासाठी बावनकुळे यांनी राज्य सरकारकडे मागणी केली होती. त्याची दखल घेत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण विभागाने अधिसूचना काढून १५ जानेवारी ते १४ मार्च २०२४ या दोन महिन्यांच्या कालावधीत विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना सर्व जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

महायुती सरकारचे आभार - बावनकुळे
 
या दोन्ही निर्णयामुळे भटके विमुक्तांना लोकशाहीच्या बळकटीकरणात सहभागी होता येणार आहे. तसेच केंद्र सरकारच्या अन्न व सुरक्षा योजनेसह विविध योजनांचा लाभ मिळविणे शक्य होईल. या दोन्ही निर्णयासाठी बावनकुळे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचे आभार व्यक्त केले.