सुषमा अंधारेंवर मालेगावात गुन्हा दाखल ; ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या
04-Jan-2024
Total Views |
नाशिक : उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात गुरुवार, दि. ४ जानेवारीला गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुषमा अंधारे यांच्यावर भादवि कलम २९५ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमन परदेशी यांच्या तक्रारीवरून मालेगाव पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झाल्यामुळे अंधारे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी हिंदू धर्मियांचे पवित्र देवता श्रीराम व श्रीकृष्ण यांच्या संबंधी वादग्रस्त शब्दप्रयोग केला होता. या शब्दप्रयोगांमुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत, असा आरोप मालेगाव येथील अमन परदेशी यांनी केला.
त्यामुळे परदेशी यांनी मालेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. परदेशी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुषमा अंधारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एकीकडे शिवसेना उपनेते अद्वय हिरे जेलमध्ये असताना संजय राऊत यांच्यापाठोपाठ सुषमा अंधारे यांच्यावर देखील मालेगावात गुन्हा दाखल झाल्याने ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत.
अंधारे यांना लवकरच कोर्टात येऊन आपली बाजू मांडावी लागेल...
भारताचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्र व श्रीकृष्ण यांच्या विषयी उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एका व्हिडिओत काही आक्षेपार्ह विधान केले आहेत. त्यांनी सदर विधान हे जाणीव पूर्वक हिंदू धर्माचा भावना दुखावल्या जातील या उद्देशाने केले आहे. या प्रकरणाबद्दल आम्ही मालेगांव येथील जेष्ठ कायदेतज्ञ अॅड. सुधीर बी. अक्कर यांच्यामार्फत कायदेशीर सल्ला घेऊन मालेगाव पोलीस स्टेशन येथे अंधारे यांच्याविरुध्द भादंवि कलम २९५(अ) प्रमाणे गंभीर दखलपात्र फौजदारी अजामीनपात्र गुन्हा दाखल केलेला आहे. लवकरच त्यांना कोर्टात येऊन आपली बाजू मांडावी लागेल. या प्रकरणात आमची कायदेशीर सल्लागार टिम कामकाज बघत आहे. असे अमन परदेशी यांनी म्हटले आहे.