साहित्य क्षेत्रातील ‘अधोरेखित’ पल्लवी

    31-Jan-2024   
Total Views |
dr. pallavi parulekar
 
लेखिका, कवयित्री, संपादिका अशा क्षेत्रात मुसाफिरी करत, आपलं अस्तित्व ‘अधोरेखित’ करणार्‍या डॉ. पल्लवी परुळेकर-बनसोडे यांचा जीवनप्रवास...
 
डॉ. पल्लवी परुळेकर-बनसोडे यांचा जन्म मूळचा वसईचा. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आदर्श विद्यालय आणि शिवाजी विद्यालयातून झाले. तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयातून पल्लवी यांनी इतिहास आणि मराठी विषयांतून पदवीचे शिक्षण घेतले. पल्लवी यांचे कुटुंब मध्यमवर्गीय. त्यांची आई गृहिणी, तर वडील ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’मध्ये कार्यरत होते. खरं तर वसई ही मास्टर दत्तारामांसारख्या प्रसिद्ध नाट्यकर्मींची कर्मभूमी असल्याने, नाटकाची आवड पल्लवी यांना लहानपणापासूनच होती. त्यावेळी नृत्य आणि क्रीडा विभागात त्यांचा सहभाग अधिक होता. पण, महाविद्यालयीन जीवनात डॉ. सिसिलिया कार्व्हालो, डॉ. रमेश कुबल यांसारख्या प्राध्यापकांमुळे मराठी साहित्यातील पल्लवी यांची गोडी वाढत गेली. मग वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन, लेख स्पर्धा अशा अनेक स्पर्धांमध्ये त्या आवर्जून सहभागी होत. या स्पर्धांमध्ये त्यांनी भरघोस पारितोषिकेदेखील पटकावली.

तसेच महाविद्यालयीन वार्षिक अंक, भित्तिपत्रक यासाठी त्यांनी लेखन सुरू केले. त्यातही विशेष म्हणजे शंकर वैद्य, केशव मेश्राम यांच्या हस्ते त्यांना महाविद्यालयीन जीवनात कविता लेखनासाठी पारितोषिक मिळाले.त्यादरम्यान त्यांनी मराठी आणि इतिहास विषयांत मुंबई विद्यापीठातून ’एमए’ पूर्ण केले. तसेच या शब्दांच्या प्रवासाने त्यांना उद्योजिका म्हणूनही ओळख मिळवून दिली. त्यांनी ‘डिप्लोमा इन प्रोफेशनल मॅनेजमेंट’चा कोर्स करून स्वतःच्या शब्दात ग्रीटिंग कार्ड, स्क्रोल कार्ड, मग्ज, टी-शर्ट यांवरील सुलेखन, कविता प्रीटिंग तसेच साडी, ड्रेस विक्री करायला सुरुवात केली. त्यातून ’पल क्रिएशन’ या नावाने त्यांनी ‘पर्सनलाईज ग्राफ्टिंग’चा यशस्वी उद्योगदेखील सुरू केला. तसेच ’महात्मा फुले टॅलेंट रिसर्च अकादमी, नागपूर’ येथून त्यांनी ’मराठी ग्रामीण साहित्याचा अभ्यास’ या विषयात सुवर्णपदक मिळवत, ‘विद्यावाचस्पती’ ही पदवी प्राप्त केली.

त्यानंतर कुटुंबाकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे, त्यांनी लिखाणाकडे साहित्य निर्मितीच्या दृष्टीने गांभीर्याने पाहिले. त्यातून ’पाऊलखुणा’ ललित लेखसंग्रह, ‘क्षण ओघळते’, ‘इवल्याशा जाणिवेने’, ‘देहमूठ’ काव्यसंग्रह तर ’सांग ना गं आई’, ’फास्ट फूड’ बालकवितासंग्रह, ’निःशब्द’ लघुकथासंग्रह असे वैविध्यपूर्ण लेखन केले. त्यांच्या कथा, कविता बालविश्वकोशातूनही प्रसिद्ध झाल्या आहेत. तसेच त्यांच्या ‘निःशब्द’ या लघु कथासंग्रहाचा हिंदी, गुजराती आणि कन्नड भाषेत अनुवादित झाला आहे. त्याचबरोबर त्यांच्या ’देहमूठ’ या काव्यसंग्रहास ‘मसाप-पुणे’चा ‘गदिमा पुरस्कार’, ‘दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रतिष्ठान’चा ’उत्कृष्ट साहित्य पुरस्कार’, ‘साहित्य कला संस्कृती केंद्रा’चा ’कविवर्य वसंत राशिनकर काव्यसाधना अखिल भारतीय सन्मान’, ‘कवयित्री शांता शेळके प्रतिष्ठान’चा ’कवयित्री शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. तसेच ’देहमूठ’ या काव्यसंग्रहावर आतापर्यंत ३७ हून अधिक परीक्षणे वृत्तपत्रात प्रकाशित झाली आहेत.
 
’शब्दवेल साहित्य प्रतिष्ठान’च्या पल्लवी संस्थापक-अध्यक्षा आहेत. ’शब्दवेल’च्या माध्यमातून श्रीमंत नरवीर चिमाजी अप्पांच्या नावाने राज्यस्तरीय संमेलन त्यांनी सुरू केले. तसेच गझलकार सुरेश भट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मराठी गझल मुशार्‍याचे आयोजन त्यांनी केले. तसेच शाळेतील आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या साहित्याशी निगडित कथा, काव्य, निबंध स्पर्धांचे आयोजनही पल्लवी करतात. त्यामुळेच पल्लवी यांना ’साहित्य गौरव साहित्य संमेलना’चे संमेलनाध्यक्ष पद आणि ‘इंदिरा संत साहित्य गौरव पुरस्कार’, ’विरांगणा सावित्रीबाई फुले राष्ट्रीय सन्मान पदक’, ’राज्यस्तरीय ताराराणी गौरव पुरस्कार’, ’राष्ट्रीय प्रज्ञारत्न विदश्री अ‍ॅवार्ड’, ’सरस्वतीबाई दादासाहेब फाळके वूमन अचिव्हर्स अवार्ड’,’artbeats महाराष्ट्र कला सन्मान २०२१’, ‘नारायण सुर्वे काव्यगौरव पुरस्कार’ यांसारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे लेखिका, कवयित्री म्हणूनच पल्लवी यांनी ओळखच निर्माण केली नाही, तर ’अधोरेखित’सारख्या शब्दांवर प्रेम करणार्‍या, रसिकांच्या पाठबळाने चालणार्‍या दिवाळी अंकाच्या संपादिका म्हणूनही त्या कार्यरत आहेत. हा दिवाळी अंक गेल्या पाच वर्षांपासून वाचकांच्या पसंतीस खरा उतरत आहे.

या अंकाला ‘मुंबई मराठी पत्रकार संघ’ आणि ’रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळा’चा २०१८ या वर्षीच्या राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाचा प्रथम क्रमांकाच्या पारितोषिक मिळाले आहे. या अंकाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रभरातील नवोदित लेखकांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम पल्लवी करत आहेत. तसेच डॉ. पल्लवी परुळेकर-बनसोडे यांची ‘मधुरम् सुंदरम् मंगलम्’, ‘बा विठ्ठला’, ‘हे ओमकारा’, ‘देह कस्तुरीचा वास’, ‘हळदुले ऊन्ह सांडे’ यांसारखी गीते प्रसिद्ध झाली आहेत. त्यातील काही गीते पद्मश्री सुरेश वाडकर, पं. अच्युत ठाकूर, शरयू दाते यांसारख्या प्रसिद्ध गायकांनी संगीतबद्ध व गायलेली आहेत. यादरम्यान पती अशोक बनसोडे यांची प्रकृती गंभीर असल्याने, पल्लवी यांना संघर्षाला सामोरे जावे लागले. त्यामुळे पल्लवी यांनी त्यावेळी लाखो रुपये उभे करण्यासाठी ’निःशब्द’पणे केलेला संघर्ष ’अधोरेखित’ करणारा प्रवास लवकरच पुस्तक रुपाने वाचकांपुढे येणार आहे. तरी त्यांना पुढील वाटचालीसाठी दै. ’मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!



-सुप्रिम मस्कर

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सुप्रिम मस्कर

इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण पुर्ण केले आहे. सध्या साठ्ये महाविद्यालयात 'एमएसीजे'च्या प्रथम वर्षात शिकत आहेत. मुंबई विद्यापीठातून 'लोककला' या विषयात पदविका पूर्ण केली आहे. वक्तृत्व स्पर्धा, अभिनय स्पर्धांमध्ये अनेक परितोषिके प्राप्त.