नुपेक्षी कदा देव...

    31-Jan-2024   
Total Views |
vaman
 
‘वामन’ आणि ‘परशुराम’ या दोन्ही अवतार कथांतून समर्थांना हेच सांगायचे आहे की, भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंत अवतार घेऊन दुष्ट दुर्जनांचा नाश करतो. त्याला भक्ताचा अभिमान असतो, तो भक्ताची उपेक्षा करीत नाही.


सज्जनांचे रक्षण करावे आणि सत्याचा विजय व्हावा, यासाठी भगवंतांनी अवतार घेऊन दुष्ट दुर्जनांचा शेवट केला आहे आणि असत्याचा पराजय केला. अशा न्यायनीती जाणणार्‍या परमेश्वराचा भक्त होऊन राहण्यातच जीवाचे कल्याण आहे. एकदा तुम्ही भगवंताचे भक्त झालात की, देव तुम्हाला विसरत नाही. देव तुमची उपेक्षा करीत नाही. कारण, देवाला आपल्या भक्ताचा अभिमान असतो. तथापि नुसत्या वरवरच्या दांभिक भक्तिसदृश हालचालींना देव फसत नाही. भक्तीचे ढोंग देवाला समजत नाही असे थोडेच आहे. खर्‍या भक्तीच्या बाबतीत बोलायचे, तर ज्याने असत्याला कधी थारा दिला नाही आणि सज्जनांच्या ठायीचे गुण ज्याने आत्मसात केले आहेत, तोच खर्‍या अर्थाने भगवंताचा भक्त होऊ शकतो. अशा भक्ताचा देवाला अभिमान असतो. या विचाराच्या पुण्ठ्यर्थ स्वामींनी देवाच्या अवतार कथा आपल्या श्लोकांतून सांगायला सुरुवात केली. या अवतार कथांच्या निवडीत स्वामींनी कशी संगती साधली आहे, यावर पूर्वीच्या लेखातून चर्चा आली आहे. मागील श्लोकक्र. १२१ मध्ये भगवद्भक्त प्रल्हाद याला त्याच्या वडिलांनी तो भगवद्भक्ती करतो म्हणून अपार कष्ट दिले, छळ केला. भक्ताच्या कष्ट निवारणासाठी भगवंताला ’नरसिंह’ अवतार घेणे भाग पडले. वरप्राप्तीने मदाहंकारी बनलेल्या प्रल्हादाच्या बापाला म्हणजे हिरण्यकश्यपूला नरसिंहाने ठार मारले, तो कथा भाग मागील श्लोकाच्या विवरणात आला आहे. आता प्रल्हादाच्या वंशातील बली या राजाला भगवंतांनी पाताळात धाडण्यासाठी वामन अवतार घेतला, तो कथाभाग आणि परशुराम अवतार यांचा उल्लेख पुढील श्लोकात आला आहे-
 
कृपा भाकितां जाहला वज्रपाणी।
तया कारणे वामनु चक्रपाणी।
द्विजांकारणें भार्गव च्यापपाणी।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥(१२२)
 
दैत्य कुळात, देवाचा द्वेष-मत्सर करणार्‍या हिरण्यकश्यपूच्या पोटी जन्म घेतलेला असूनही भक्त प्रल्हादाचे स्थान उच्च कोटीतील आहे. भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायात आपल्या दिव्य विभूती अर्जुनाला सांगताना भगवान श्रीकृष्णांनी ३० व्या श्लोकात दैत्यांमध्ये ‘मी प्रल्हाद आहे’ असे म्हटले आहे. (प्रल्हादश्चास्मि दैत्यानां), हिरण्यकश्यपूच्या वधानंतर नरसिंह अवतारातील भगवतांनी राज्य प्रल्हादाकडे सोपवले. प्रल्हादानंतर त्याचा मुलगा विरोचन याने राज्यकारभार सांभाळला. पुढे विरोचनाचा पुत्र बळी हा राजा झाला. बळी हा महापराक्रमी होता. आपल्याला इंद्रपद मिळावे, अशी आकांक्षा निर्माण झाल्याने त्याने १०० यज्ञ करण्याचा पण केला. आपल्या पराक्रमाने त्याने ९९ यज्ञ पार पाडले. त्यामुळे स्वर्गलोकातील इंद्राला त्याचा धाक निर्माण झाला. बळीचा १००वा यज्ञ थांबवणे इंद्राला शक्य नव्हते. त्यामुळे तो भगवान विष्णूंना शरण गेला आणि आपले इंद्रपद वाचवा, अशी त्याने विष्णूची अंतःकरणपूर्वक करुणा भाकली. भगवंतांनी इंद्रावर म्हणजे वज्रपाणीवर कृपा करायचे ठरवले. (कृपा भाकिता जाहला वज्रपाणी), इंद्रावर कृपा करायची तर बळीला यज्ञापासून दूर करणे आवश्यक होते. विष्णूंनी अदितीच्या पोटी वामन म्हणून जन्म घेतला. हा परमेश्वराचा वामनावतार होय.
 
बळी दानशूर होता आणि यज्ञात दानाला महत्त्व असते. याचकाला तसेच परत पाठवले, तर यज्ञपूर्ती होत नाही. भगवंताच्या अवतारातील वामनाने आठ वर्षांच्या बटूच्या रुपात बळीची भेट घेतली, तेथे वामनाने तीन पावले जमीन दानात मागितली. बटूच्या ठेंगण्या मूर्तीकडे पाहून बळीने तीन पावले जमीन दान देण्याचे कबूल केले. शुक्राचार्य यज्ञाचे पौरोहित्य करीत होते. त्यांनी वामनाचे खरे रूप जाणले होते आणि त्यांनी बळीला या दानापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण, तरीही बळीने दानाचे उदक वामनाच्या हातावर सोडले. ती संकल्पपूर्ती होती - वामन लगेच विस्तार पावला. त्याने एका पावलात संपूर्ण पृथ्वी व्यापली, दुसर्‍या पावलाने सर्व आकाश व्यापले. बली हे सारे पाहत होता. तिसरे पाऊल उचलल्यावर ते आता कुठे ठेवावे, असे संकेताने बळीला विचारल्यावर त्याने आपले मस्तक पुढे केले. वामनाने उचललेले तिसरे पाऊल बळीच्या मस्तकावर ठेवत त्याला पाताळात दडपून टाकले, त्यामुळे त्याचा १००वा यज्ञ होऊ शकला नाही व इंद्राचे डळमळीत झालेले आसन स्थिर झाले. भगवंताने कृपा करावी म्हणून विनंती करणार्‍या इंद्रासाठी या चक्रपाणीने वामन अवतार धारण केला व शरणागताला मदत केली. भागवत पुराणात महाविष्णूचे दशावतार सांगितलेले आहेत. भगवंताने अवतार घेऊन धर्माचे सज्जनांचे रक्षण केले आहे. तसेच अधर्माने चालणार्‍या दुष्ट दुर्जनांचा नाश केला आहे. दशावतार हा समर्थांच्या आवडीचा विषय आहे, तत्कालीन समाजाचा विचार करता समर्थांना वाटत होते की, रामाने पुन्हा अवतार घेऊन दुष्ट, दुर्जन, कपटी व हिंदूधर्म-संस्कृती बुडवायला निघालेल्या म्लेंच्छांचा नाश करावा.
 
या श्लोकाच्या तिसर्‍या ओळीत स्वामी परशुराम अवताराचा उल्लेख करतात. ब्राह्मणांच्या रक्षणार्थ देवाने परशुराम रामाचा अवतार घेऊन पृथ्वी नि:क्षत्रिय केल्याची कथा पुराणात आढळते. परशुराम हा जमदग्नीचा मुलगा. एकदा कार्तवीर्य राजाने बळाने जमदग्नीच्या आश्रमातील सर्व गाई पळवून नेल्या. त्यावेळी परशुराम तेथे नव्हता. परत आल्यावर त्याला सर्व प्रकार समजला,भयंकर राग आल्याने परशुराम कार्तवीर्य राजावर चाल करून गेला. युद्ध झाले. युद्धात कार्तवीर्य मारला गेला. त्याच्या मृत्यूनंतर कार्तवीर्यांच्या मुलांनी जमदग्नीला एकटा गाठून ठार केले. ते युद्धशास्त्रनीतीच्या विरूद्ध होते. म्हणून परशुरामाने पृथ्वीवरील सर्व क्षत्रियांना मारून टाकण्याचा पण केला. परशुरामाने २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली, असे सांगितले जाते. परशुरामाचा उल्लेख या श्लोकात ’चापपाणी’ असा झाला आहे, त्याने ब्राह्मणांचे रक्षण केले, असे सांगितले जाते. पुढे कश्यपांच्या सांगण्यावरून परशुराम समुद्रतीरी गेला. तेथे आपल्या सामर्थ्याने समुद्र मागे हटवून परशुरामाने कोकण व गोवा किनारपट्टी वसवली असे सांगितले जाते. ’वामन’ आणि ’परशुराम’ या दोन्ही अवतार कथांतून समर्थांना हेच सांगायचे आहे की, भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंत अवतार घेऊन दुष्ट दुर्जनांचा नाश करतो. त्याला भक्ताचा अभिमान असतो, तो भक्ताची उपेक्षा करीत नाही, हे भक्तिमार्गाचेसार आहे.
७७३८७७८३२२
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सुरेश जाखडी

दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये 'समर्थांच्या पाऊलखुणा' या सदराचे लेखक, 'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..