_202401312059531560_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
आईचे पत्र हरवले, ते मला सापडले’ हा लहानपणीचा खेळ अनेकांच्या स्मरणातही असेल. सध्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांत असाच काहीसा पत्रांचा खेळ रंगलेला दिसतो. वंचित बहुजन आघाडीचा ’मविआ’त समावेश करण्यासाठी सुरू असलेला हा खेळ. प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी ठाकरे गट आग्रही असला, तरी काँग्रेस आणि शरद पवार फारसे उत्सुक नाहीत. त्यांच्या पक्षाच्या धरसोड वृत्तीचा पूर्वानुभव गाठीशी असल्यामुळे, ते ’ताकही फुंकून पिण्याच्या’ भूमिकेत आहेत. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि वंचित या तिन्ही पक्षांचा ’कोअर व्होटर’ हा सारख्या विचारधारेचा असल्यामुळे, मतविभाजनाचा फटका टाळण्यासाठी आपल्याला सोबत घेण्यावाचून, त्यांच्यासमोर दुसरा पर्याय नाही, हे प्रकाश आंबेडकर जाणतात. त्यामुळेच ’मविआ’ला विशेषतः काँग्रेसला शक्य तितके वाकवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू असलेला दिसतो. परवाचे मानापमान नाट्य हाही त्याचाच एक भाग. नाना पटोले यांच्या सहीचे पत्र चालणार नाही, अशी भूमिका आंबेडकरांनी घेतलेली असतानाही, काँग्रेस हायकमांडने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे ’मविआ’च्या बैठकीला दुय्यम प्रतिनिधी पाठवून, वंचितने जशास तसे उत्तर दिले. त्याला प्रत्युत्तर देणार नाहीत, ते काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते कसले? त्यांनीही मग वंचितच्या प्रतिनिधींना दीड तास बाहेर ताटकळत ठेवले. त्यामुळे पारा चढलेल्या वंचितच्या धैर्यवर्धन पुंडकर यांनी बैठकस्थळावरून काढता पाय घेतला आणि बाहेर येऊन माध्यमांसमोर पद्धतशीर गोंधळ घातला. त्यानंतर मग वंचितच्या मविआतील समावेशाचे पत्र परस्पर जाहीर केले. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांची काहीशी कोंडी झाली. मविआत समावेश केल्यानंतरही वंचितची आडमुठी भूमिका कायम असल्याचे चित्र जनतेत जाईल, संभ्रम निर्माण होईल, या शक्यतेमुळे त्यांनी नाईलाजास्तव पुढच्या बैठकीला येईन, असे ट्विट केले. परंतु, काँग्रेस-ठाकरे-पवारांच्या आघाडीत सहभागी होण्यासंदर्भात त्यांचा निर्णय अद्याप पक्का झालेला नाही. लोकसभेच्या किमान आठ जागा मिळाल्या, तरच पुढचा निर्णय घेण्याचे वंचितच्या अंतर्गत बैठकीत ठरले आहे, तर वंचितला आठ जागा सोडल्यास इतरांनी काय करावे, असा प्रश्न अन्य घटक पक्षांकडून विचारला जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत वंचितचा समावेश सध्या तरी अधांतरीच!
जागावाटपाचा वाढता तिढा
आवळा देऊन कोहळा काढणे’ अशी एक प्रचलित म्हण. आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळविणे, हा त्यामागील अर्थ. महाविकास आघाडीतील घटक पक्षांत जागावाटपावरून सध्या अशीच चढाओढ सुरू दिसते. त्यामुळे तीन बैठक सत्रांनंतरही मविआमधील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यात वंचित बहुजन आघाडीने आघाडीची डोकेदुखी आणखीन वाढवली. त्यांना म्हणे किमान सात ते आठ जागा हव्या आहेत. तिकडे काँग्रेस १९, ठाकरे १९ आणि पवार दहा जागांवर अडून बसले आहेत, तर सप दोन आणि जद(यु)ने एका जागेची मागणी केली आहे. त्यामुळे पुढच्या बैठकीतही जागावाटप निश्चित होण्याची शक्यता धूसरच. पक्षफुटीमुळे ठाकरे आणि पवार गट अस्थिपंजर झाला आहे. नेतृत्वहीन काँग्रेसला राज्यात फारसा वाव नाही. त्यामुळेच त्यांना वंचितच्या साथीची नितांत गरज. अशा वेळी मविआच्या जागावाटपात लोकसभेच्या किमान सात ते आठ जागा पदरात पाडून घेत, प्रकाश आंबेडकरांना आपले बाहू विस्तारायचे आहेत. परंतु, अवघे चार टक्के मतदार गाठीशी असलेल्या वंचितला सात जागा दिल्यास, इतरांचा वाटा कमी होणार असल्याने, त्यांना फारसे जवळ करण्याची इच्छा ठाकरे वगळता इतरांची नाही. काँग्रेस हायकमांड आणि स्थानिक नेतृत्वाविरोधात आंबेडकर यांनी वेळोवेळी केलेली विधाने, शरद पवारांवर ओढलेले राजकीय आसूड आणि मागील निवडणुकीत आयत्यावेळी तोडलेली आघाडी, असा पूर्वानुभव पाठीशी असल्यामुळे, याही वेळेस दगाफटका होण्याची भीती विशेषतः काँग्रेस-पवारांना आहेच. त्यामुळे ’धरलं तर चावतय अन् सोडलं तर पळतंय’ अशी स्थिती त्यांच्यासमोर आहे. दुसरीकडे, कालच्या बैठकीत दहा ते १२ जागांवरून काँग्रेस, ठाकरे आणि शरद पवार गटात गरमागरम चर्चा झाली. अशा परिस्थितीत वंचितला जागा सोडण्याचे मोठे आव्हान तिन्ही पक्षांपुढे आहे. आघाडीतील तिन्ही पक्षांनी आपापल्या वाट्याची प्रत्येकी एक जागा वंचितला सोडावी, अशी चर्चा झाल्याचे समजते. पण, आंबेडकर फक्त तीन जागा मान्य करतील का, असाही प्रश्न आहे. त्यामुळे लोकसभेच्या निमित्ताने पुढे आलेले, हे समीकरण खरोखर आकाराला येते की, वंचित बहुजन आघाडीमुळे गुंतागुंत अधिक वाढते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
सुहास शेलार