"संजय राऊत कुठे कुठे खिचडी खायला जातात हे आम्हाला माहिती आहे"
अमेय घोले आणि राहुल कनाल यांचे चोख प्रत्युत्तर
31-Jan-2024
Total Views |
मुंबई : संजय राऊत तुम्ही कुठे कुठे खिचडी खायला जात असता हे आम्हाला माहिती आहे. आमच्यावर केलेल्या आरोपांचे पुरावे द्या अन्यथा राजीनामा द्या, अशी मागणी शिवसेनेचे नेते अमेय घोले आणि राहुल कनाल यांनी केली आहे. संजय राऊतांनी अमेय घोले आणि राहूल कनाल यांच्यावर खिचडी घोटाळ्याचे आरोप केले होते. अमेय घोले, वैभव थोरात आणि राहुल कनाल हे खिचडी घोटाळ्याचे लाभार्थी आहेत, असा आरोप त्यांनी केला होता. यावरून आता त्यांनी पत्रकार परिषद घेत राऊतांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
अमेय घोले म्हणाले की, "सुनील कदम आणि सुजीत पाटकर यांच्या बँक खात्यात सरळ पैसे आले आहेत. आम्ही खोटं बोलत असू तर २०२० ते २०२२ या काळातले महापौर बंगल्यातले सीसीटीव्ही फुटेज तपासा. कोरोनानंतर हे लोक महापौरांच्या बंगल्यावर का यायचे? संजय राऊतांनी किती अधिकाऱ्यांना फोन केले आहेत याचे रेकॉर्ड काढा."
"संजय राऊत पत्रकारिता करतात. त्यामुळे त्यांनी आरोप करण्याच्या आधी पुरावे देणं अपेक्षित आहे. कथित खिचडी घोटाळ्याचे आरोप असलेल्यांमध्ये राऊतांच्या आजूबाजूचेच लोक आहेत. मी जेव्हा ठाकरे गटात होतो तेव्हा कुठलीही चौकशी माझ्यावर नव्हती, ही वस्तुस्थिती राऊतांनी जाणून घ्यावी. कुठल्याही पदाधिकाऱ्याने पक्ष सोडला तर तो चोर बनतो. पण जोपर्यंत ते तुमच्या पक्षात असतात तेव्हा त्यांना मांडीवर घेऊन का बसता? सगळ्या गोष्टी तुम्ही तपासून बघा आणि मगच बोला. तुमच्या नेत्यांवर आरोप आणि कारवाई झाल्याचा राग आमच्यावर काढू नका," असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना राहुल कनाल म्हणाले की, "आज बाळासाहेब ठाकरे भवनात मी बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन सांगतो की, खिचडी घोटाळा, रेमडिसिव्हिर घोटाळा, डेड बॉडी बॅग घोटाळा यापैकी कुठल्याही घोटाळ्यात आमचं नाव आढळलं तर आम्ही राजकारण सोडू. पण हे खोटं सिद्ध झाल्यास संजय राऊत तुम्हीदेखील बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगा की, तुम्ही राजकारणातून राजीनामा देणार. मी तुम्हाला वेळ देतो. पण तुम्ही माध्यमांसमोर येऊन पुरावे द्या. तुम्ही आमच्यावर खिचडी घोटाळ्याचे आरोप केलेत. मात्र, तुम्ही कुठे कुठे खिचडी खायला जात असता हे आम्हाला माहिती आहे. पुढची पत्रकार परिषद सोबत घेऊन तुम्ही आणि आम्ही दोघंही पुरावे देऊ."
"कोरोनाकाळात केलेल्या कामासाठी तुमच्याच नेत्याने माझा सन्मान केला. जर मी घोटाळा केला आहे तर तुम्ही आमच्या व्हॅक्सिनेशन सेंटरमध्ये का आलात? २०२३ मध्ये माझं लग्न झालं तेव्हादेखील तुम्ही आला होतात. त्यावेळी मी चांगला होतो का? आम्ही कमीतकमी १ लाख रेशनची पाकीटं वाटली. आम्ही खूप काम केलं आहे. तुम्ही कोरोनाकाळात काय केलं आहे, ते सांगा," असा सवालही त्यांनी केला आहे.