ऐतिहासिक चित्रपटांमुळे कलाकारांचे वाचन वाढते – तेजस्विनी पंडित

    30-Jan-2024
Total Views |

tejaswini pandit 
 
रसिका शिंदे-पॉल
 
 
मुंबई : राष्ट्रमाता, राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले... यांनी हिंदवी स्वराज्याची पायाभरणी करून या मुलुखाला छत्रपती शिवाजी महाराज दिले .बुद्धिमत्ता, चातुर्य, पराक्रम, शौर्य, दूरदृष्टी, कुशल राजनिती, कुटुंबवत्सल असे सगळेच गुण त्यांच्यात होते. शिवबाचे शिवराय घडवताना या माऊलीने अनेक वादळं पेलली पण या वादळात ही तेजस्वी ज्योत आणखी प्रखर झाली. प्रत्येक कसोटीवर खऱ्या उतरून या माऊलीने स्त्रीशक्ती व मातृशक्तिचे चिरंतन उदाहरण आपल्या सर्वांस दिले. जगाला दिशा देणाऱ्या या जगत्जननीच्या आयुष्यावर आधारित 'स्वराज्य कनिका जिजाऊ' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटात जिजाऊंची भूमिका तेजस्विनी पंडित साकारणार आहे. जिजाऊंची भूमिका साकारण्यास मिळणे हे माझे भाग्यच आहे”, अशी प्रतिक्रिया तेजस्विनीने ‘महाएमटीबी’शी बोलताना दिली.
 
ऐतिहासिक चित्रपटांमुळे कलाकारांचे वाचन वाढते  
 
मराठी चित्रपटसृष्टीत एकामागून एक ऐतिहासिकपट येत आहेत. महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासातील शौर्यवान महापुरुषांचे जीवन, त्यांच्या संघर्षगाथा काय होती हे नव्या पिढीला कळणे नितांत गरजेचे आहे याच जाणीवेने प्रत्येक दिग्दर्शक, कलाकार, निर्माते ऐतिहासिकपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. याबद्दलच आपले मत मांडताना तेजस्विनी म्हणाली की, “ऐतिहासिक चित्रपटांचा भाग होणं सध्या प्रत्येक कलाकारासाठी महत्वाचं आहे. मुळात आपलं वाचन कमी असल्यामुळे ऐतिहासिकपटांच्या निमित्ताने आपण साकारणाऱ्या व्यक्तिंचे जीवन, इतिहास काय होता याबद्दल प्रत्येक कलाकार वाचन आणि संशोधन करण्यास सुरुवात करतो. त्यामुळे माझ्यामते ऐतिहासिक चित्रपटांच्या निमित्ताने माझ्यासह जे जे कलाकार ऐतिहासिकपटांचा भाग आहेत किंवा होणार आहेत यांचे वाचन नक्कीच वाढण्यास मदत होईल”, असे प्रामाणिक मत तेजस्विनीने मांडले. दरम्यान, 'स्वराज्य कनिका जिजाऊ' या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन अनुजा देशपांडे करत आहेत.