मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना जागतिक वारसा मिळणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. तसेच जागतिक वारसा स्थळांच्या नामांकनामध्ये महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर याबाबत पोस्ट केली आहे.
भारत सरकारने यावर्षी युनेस्को जागतिक वारसा यादी २०२४-२५ करिता मराठा लष्करी रणभूमी म्हणजेच गडकिल्ल्यांना नामांकन दिले आहेत. यामध्ये १२ किल्ल्यांचा समावेश असून यापैकी ११ किल्ले हे महाराष्ट्रातील आहेत. साल्हेर किल्ला, शिवनेरी किल्ला, लोहगड, खांदेरी किल्ला, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा किल्ला, विजय दुर्ग, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूतील गिंगी किल्ला इत्यादी स्थळे या नामांकन यादीत देण्यात आली आहेत. विविध भौगोलिक आणि भौतिक क्षेत्रांमध्ये वितरीत केलेले हे घटक मराठा राजवटीच्या लष्करी शक्तींचे प्रदर्शन करतात.