"भाजपची साथ सोडा! वंचितसोबत या!" CM शिंदेंना प्रकाश आंबेडकरांची ऑफर

    30-Jan-2024
Total Views |

Prakash Ambedkar & Eknath Shinde


वाशिम :
भाजपची साथ सोडा आणि वंचितसोबत या अशी थेट ऑफर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिली आहे. मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकरांनी ही ऑफर दिली.
 
शनिवारी मराठा आरक्षणाबाबतच्या सर्व मागण्या मान्य करत राज्य सरकारने अध्यादेश जारी केला. या अध्यादेशामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा समाजाचे स्ट्राँग मराठा लीडर म्हणून पुढे आले आहेत, अशी प्रतिक्रिया सोमवारी प्रकाश आंबेडकरांनी दिली होती. त्यानंतर मंगळवारी त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना वंचितमध्ये येण्याची थेट ऑफरच दिली आहे.
 
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "एकनाथ शिंदेंना माझी ऑफर आहे की, भाजप सोडा आणि आमच्यासोबत या. त्यांनी याबाबतचा निर्णय घ्यायचा आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आमच्यासोबत यायचं असेल तर आम्ही त्यांचं स्वागतच करतो. फक्त अट एवढीच आहे की, त्यांनी भाजपची साथ सोडावी," असे ते म्हणाले.
 
महाविकास आघाडीच्या बैठकीबाबत बोलताना ते म्हणाले की, "महाविकास आघाडीच्या बैठकीला आमचे प्रतिनिधी जाणार आहेत. आम्ही तिथे आमचे मत मांडणार आहोत. शरद पवारांनी ३५ जागांवर एकमत झाले असल्याचे म्हटले होते. याबाबतची माहिती आम्ही त्यांना मागणार आहोत आणि ही आघाडी चालावी अशी सुचना आम्ही देणार आहोत. काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आम्हाला निमंत्रण आलेलं नाही, तर महाविकास आघाडीने आम्हाला चर्चेसाठी बोलवलं आहे. त्यामुळे कसंही बोलवा आम्ही चर्चेला येतो," असेही ते म्हणाले.