मुंबई : महानंद डेअरीचे अस्तित्व टिकावे हीच राज्य सरकारची भुमिका आहे, असे वक्तव्य दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. महानंद डेअरी गुजरातला जाणार असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता. यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारची भुमिका स्पष्ट केली आहे. तसेच त्यांनी संजय राऊतांचेही कान टोचले आहेत.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, "संजय राऊतांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. एनडीडीबीच्या बाबतीत तर त्यांना काहीच माहिती नाही. महानंद प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचा आरोप करुन संजय राऊत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडीतील ज्या नेत्यांमुळे महानंद प्रकल्प डबघाईला आला आहे त्यांची नावं आधी राऊतांनी तपासावे."
"राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड (एनडीडीबी) ही भारत सरकारची शिखर संस्था असून ती काही कोणत्या विशिष्ट राज्याची नाही. आज महानंद आर्थिकदृष्ट्या संकटात आहे. महानंदची दुध हाताळणी क्षमता ९ लाख लीटर होती ती आज ती फक्त ६० हजार लीटरपर्यंत आली आहे. इथे कामगारांची अवास्तव भरती झालेली आहे. महानंदाचे अस्तित्व टिकावे हीच राज्य सरकारची भुमिका आहे. तसेच महानंद डेअरीचं अस्तित्व राहणार असून हा प्रकल्प हा महाराष्ट्रातच राहणार आहे," असेही ते म्हणाले आहेत.