ज्ञानवापी : नारीशक्तीच्या साहसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच!

    29-Jan-2024
Total Views |
gyanwapi
 
काशी विश्वनाथ-ज्ञानवापी मशीद परिसरात असलेल्या, माँ शृंगारगौरी स्थळाची पूजा करण्याचे अधिकार मिळाले पाहिजेत, यासाठी पाच सर्वसामान्य महिलांनी सर्वप्रथम न्यायालयात लढा लढला आणि प्रचंड साहस दाखवून, त्यांनी ते प्रकरण धसास लावले. त्यांच्याविषयी...
 
वाराणसीमधील ज्ञानवापी मशीद परिसराचे ’भारतीय पुरातत्व विभागा’ने (एएसआय) न्यायालयाच्या आदेशावरून नुकतेच सर्वेक्षण केले. त्या सर्वेक्षणाचा अहवाल अलीकडेच सर्वत्र प्रसिद्ध झाला. ज्ञानवापी मशीद नावाने जी वास्तू ओळखली जाते, ती मूळ हिंदू मंदिरावर उभी असल्याचे या सर्वेक्षणावरून अगदी स्पष्टपणे दिसून आले. हिंदू मंदिरांमध्ये आढळणार्‍या अनेक प्रतिमा या सर्वेक्षणात आढळून आल्या. हे सर्वेक्षण लक्षात घेऊन, या ठिकाणी पूजा-पाठ करण्यास हिंदू समाजास अनुमती देण्यात यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली. पण, या सर्वेक्षणाआधी काशी विश्वनाथ-ज्ञानवापी मशीद परिसरात असलेल्या, माँ शृंगारगौरी स्थळाची पूजा करण्याचे अधिकार मिळाले पाहिजेत, यासाठी पाच सर्वसामान्य महिलांनी सर्वप्रथम न्यायालयात लढा लढला आणि प्रचंड साहस दाखवून, त्यांनी ते प्रकरण धसास लावले.
 
त्यातील एका महिलेचे नाव लक्ष्मीदेवी. त्या मूळच्या महाराष्ट्रातील. सोहनलाल आर्य यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या वाराणसीत आल्या. सोहनलाल आर्य हे विश्व हिंदू परिषदेच्या वाराणसी प्रांताचे उपाध्यक्ष. त्यांची आणखी एक ओळख म्हणजे ज्ञानवापी परिसरात वजूखाना म्हणून ओळखल्या जाणार्‍या, परिसरात काळ्या पाषाणाची जी प्रतिमा आढळली, ती प्रत्यक्षात शिवलिंग असल्याचा दावा त्यांनी केला होता. सोहनलाल आर्य यांच्या पत्नी लक्ष्मीदेवी यांचे शिक्षण फारसे झाले नसतानाही, त्यांनी या कायदेशीर लढाईत उतरण्याचा निर्णय घेतला. माँ शृंगारगौरीची नित्यनेमाने पूजा करता येत नसल्याचे पाहून आणि त्या भागात शिवाच्या प्रतीक्षेत असलेला नंदी पाहून, त्यांना वाईट वाटत होते. लक्ष्मीदेवी यांच्याप्रमाणे सीता साहू या महिलाही या कायदेशीर लढाईत उतरल्या होत्या. कोणत्याही संघटनेशी संबंध नसलेल्या सीता साहू या आपले पती बालगोपाल साहू यांच्यासमवेत एक लहानसे दुकान चालवतात. माँ गौरीची पूजा करताना मिळणार्‍या वाईट वागणुकीमुळे त्या अस्वस्थ होत्या. त्यातून त्यांनी या कायदेशीर लढाईत उतरण्याचे ठरविले.
 
रेखा पाठक या गृहिणी आहेत. त्याचे बालपण आणि पुढील आयुष्य वाराणसीत गेले. त्यांचे वडील हे वाराणसी शहरातील प्रसिद्ध लाट भैरव मंदिराचे पूजारी. माँ गौरीची पूजा योग्य पद्धतीने करण्याचा अधिकार मिळायलाच हवा, म्हणून त्याही या कायदेशीर लढाईत सहभागी झाल्या. माँ गौरीची पूजा मंदिराच्या आतच करण्यास मिळाली पाहिजे, असे रेखा पाठक यांनाही वाटत होते. त्यातून या लढ्यात उतरण्याचा निर्धार त्यांनी केला. मंजू व्यास या लढाईत सहभागी झालेल्या आणखी एक महिला. त्या घरातच ब्युटी पार्लर चालवत आहेत. त्याही कोणत्या संघटनेशी किंवा राजकीय पक्षाशी संबंधित नाहीत. पण, माँ गौरीची पूजा करण्यासाठी विनाअडथळा जाता आले पाहिजे, असे त्यांना वाटत होते. त्यातून त्या या कायदेशीर लढाईत सहभागी झाल्या. या कायदेशीर लढाईतील आणखी एक अग्रणी म्हणजे राखी सिंह. त्या सामाजिक कार्यकर्त्या. वैदिक सनातन संघाच्या त्या संस्थापक सदस्य. माँ शृंगारगौरीवर त्यांची अपार श्रद्धा. या कायदेशी लढाईत सहभागी झालेल्या अन्य महिला राखी सिंह यांना वाराणसीमध्ये आयोजित एका सत्संग कार्यक्रमात भेटल्या. या महिलांनी न्यायालयात माँ शृंगारगौरीची पूजा करण्याचा अधिकार मिळायलाच हवा, यासाठी संघर्ष केला आणि त्या लढाईत विजय मिळवला.
 
आता काशीविश्वनाथाचे मंदिर पाडून, तेथे मशीद उभारण्यात आल्याचे पुरावे सापडले आहेत. हे पुरावे न्यायालयास सादर करण्यात आले असून, दोन्ही पक्षकारांना त्याच्या प्रती देण्यात आल्या आहेत. विश्वनाथाचे मंदिर पाडूनच मशीद उभारण्यात आल्याचे आढळून आल्याने, ती जागा हिंदू समाजास परत देण्यात यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. खरे म्हणजे, इतके ढळढळीत पुरावे सापडले असताना, मुस्लिमांनी स्वतःहून ती वास्तू हिंदू समाजाच्या ताब्यात द्यायला हवी. भारतासारख्या राष्ट्रामध्ये आक्रमकांनी अनेक हिंदू मंदिरांचा विध्वंस केला आहे. हिंदू समाज हे विसरू शकत नाही. हिंदूंची मंदिरे त्यांच्या ताब्यात द्यायलाच हवीत. आपलीच हक्काची मंदिरे परत मिळावीत, यासाठी हिंदू समाजास संघर्ष करावा लागतो, कायदेशीर लढाया लढाव्या लागतात, हे किती दुर्दैवाचे आहे!
 
भ्रष्टाचारामुळे योजनांचे लाभ मिळत नसल्याचा राज्यपाल रवी यांचा आरोप
तामिळनाडू राज्यात द्रमुकचे सरकार आहे. पण, त्या राज्यात ’प्रधानमंत्री आवास योजना’ यासारख्या केंद्र सरकारच्या योजनांपासून लाभार्थींना वंचित ठेवले जात असल्याचे दिसून आले आहे. प्रशासनाचा नाकर्तेपणा आणि कथित भ्रष्टाचार यामुळे जे पात्र आहेत, अशांना ‘प्रधानमंत्री आवास योजने’तील घरे मिळू शकलेली नाहीत. तामिळनाडूच्या नागपट्टनम जिल्ह्यातील ग्रामस्थांना या योजनेतील घरे मिळू शकलेली नाहीत. प्रशासनाचा नाकर्तेपणा आणि भ्रष्टाचार यास कारणीभूत असल्याचा आरोप कोणा राजकीय नेत्याने केलेला नाही, तर खुद्द तामिळनाडू राज्याचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी हा आरोप केला आहे. राज्यपालच असा आरोप करीत आहेत, हे लक्षात घेता, त्या आरोपांमध्ये तथ्य नाही, असे म्हणता येणार नाही.
राज्यपाल आर. एन. रवी यांनी अलीकडेच नागपट्टनम जिल्ह्यातील कीझवेनमणी नावाच्या खेड्यास भेट दिली होती. याच गावात १९६८ साली एका जमीनदाराने ४४ शेतमजुरांना जीवंत जाळले होते. त्या गावास राज्यपाल रवी यांनी भेट दिल्यावर, तेथील गरीब जनतेला ’प्रधानमंत्री आवास योजने’चे लाभ मिळत नसल्याचे, राज्यपालांना आढळून आले. ”ज्या ४४ शेतमजुरांना जीवंत जाळण्यात आले होते, त्याचे स्मारक गावात उभे असले, तरी त्या स्मारकाभोवती गरिबांच्या झोपड्या उभ्या राहिलेल्या आहेत. आपणच शेतकरी समाजाचे कैवारी असल्याचा दावा करणार्‍या, राजकीय पक्षाकडून हुतात्म्यांचा आणि शेतकर्‍यांचा अवमान केला जात आहे,” असे राज्यपालांनी म्हटले आहे. त्या गावात जे जळीतकांड झाले होते, त्यातून वाचलेल्या एका खेडूताची राज्यपालांनी भेट घेतली. आपल्या या भेटीत राज्यपालांनी वेलंकणी चर्चला भेट दिली आणि सर्व जनतेच्या भल्यासाठी प्रार्थना केली. तामिळनाडूच्या राज्यपालांनी आपल्या या भेटीनंतर द्रमुक सरकार कशा प्रकारे कार्य करीत आहे, यावर प्रकाश टाकला आहे. राज्यपालांनी सरकारचे कान टोचल्याचे लक्षात घेऊन, राज्य सरकारला काही सद्बुद्धी होते का ते पाहायचे!
 
‘तामिळनाडू, पुदुच्चेरीमधील सर्व ४० जागा रालोआला मिळतील!’
केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांनी अत्यंत आत्मविश्वासाने एक विधान केले आहे. ”आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीस तामिळनाडू आणि पुदुच्चेरीमध्ये मिळून ४० जागा मिळतील,” असे विधान एल. मुरुगन यांनी केले आहे. ’इंडी’ आघाडीत सहभागी झालेले पक्ष म्हणजे आवळ्याभोपळ्याची मोट आहे. या आघाडीत सहभागी झालेले पक्ष आगामी निवडणुका होईपर्यंत तरी एक राहतील की नाही, अशी शंका आहे. आतापासूनच या युतीला भगदाड पडण्यास सुरुवात झाली आहे. मुरुगन यांनी असा विश्वास व्यक्त केला असला, तरी त्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीस प्रचंड परिश्रम करावे लागणार आहेत. तामिळनाडू राज्यात द्रमुकशी संबंधित असलेल्या पत्रकारांनी भाजप नेते अण्णामलाई यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या पत्रकारांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला, ते सर्व द्रमुकचे हितसंबंध जपणारे पत्रकार असल्याचे सांगण्यात येते. पण, “तामिळनाडू राज्यात काय व्हायला हवे, ते काही द्रमुक समर्थक पत्रकार ठरवू शकत नाहीत. जे पत्रकार द्रमुक सरकारला खूश करण्यासाठी, त्या सरकारची प्रचार यंत्रणा असल्यासारखे वागतात, ते पत्रकारितेस काळीमा फासत आहेत,” असा आरोप के. अण्णामलाई यांनी केला आहे. चेन्नई येथे आयोजित एका निषेध सभेत ‘हिंदू’ समूहाचे संचालक एन. राम यांनी तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के. अण्णामलाई यांच्याविरुद्ध सर्व पत्रकारांनी संघटित होऊन, ‘एक समान कार्यक्रम’ आखायला हवा, असे आवाहन केले आहे. भाजप नेते अण्णामलाई यांच्याविरुद्ध काही द्रमुक समर्थक पत्रकारांचे असे वागणे असताना, केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांनी त्या भागातील लोकसभेच्या ४० जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. भाजपच्या पदरात ४० जागांचे माप टाकायचे की नाही, हे सर्वस्वी तेथील मतदारराजावर अवलंबून आहे!
९८६९०२०७३२
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.