पक्षांतरबंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी राहूल नार्वेकरांची निवड!

    29-Jan-2024
Total Views |

Rahul Narvekar

मुंबई : पक्षांतरबंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहूल नार्वेकरांच्या नावाची घोषणा करत त्यांची नियुक्ती केली आहे. अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.
 
ओम बिर्ला यांनी रविवारी पक्षांतरबंदी कायद्याचा पुनर्विचार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली. तसेच राहूल नार्वेकरांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार असल्याचेही यावेळी ते म्हणाले. राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचीमध्ये निवडून आलेल्या आणि नामनिर्देशित सदस्यांना त्यांचे राजकीय पक्ष सोडण्यापासून रोखण्यासाठी कठोर तरतुदी आहेत.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर राहूल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेप्रकरणी १० जानेवारी रोजी निर्णय दिला. तसेच सध्या त्यांच्यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेची सुनावणी सुरु आहे. दरम्यान, आता पक्षांतरबंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे.
 
पक्षांतरबंदी कायदा काय आहे?
 
वारंवार होणाऱ्या पक्षांतराला आळा घालण्यासाठी भारतात इ.स. १९८५ साली पक्षांतरबंदी कायदा तयार करण्यात आला होता. यामध्ये लोकसभा व राज्य विधीमंडळातील सदस्यांना पक्षांतराच्या आधारे अपात्र ठरविण्याची तरतूद करण्यात आली. तसेच यासंदर्भात विस्तृत असे १०वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले. पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या सदस्याने पक्षातच राहावे आणि आणि पक्षाच्या आदेशाचे पालन करावे, हा या कायद्याचा प्रमुख हेतू आहे.