मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी सुरु असलेले आंदोलन मनोज जरांगेंनी २७ जानेवारीला मागे घेतले. राज्य सरकारने जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य केल्याने त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. दरम्यान, यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेप घेत २९ जानेवारीला पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलेन असे म्हटले होते. मात्र, आता त्यांनी ही पत्रकार परिषद रद्द केली आहे.
नारायण राणेंनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत पत्रकार परिषद रद्द करत असल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, "मराठा आरक्षण या विषयावर आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. ही पत्रकार परिषद रद्द करण्यात येत आहे. या विषयावर मला महाराष्ट्र शासनाला विनंती करावयाची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात लढवय्येपणाचा वारसा आणि इतिहास असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण होणार नाही याची काळजी घ्यावी. स्वाभिमानी मराठा कुणबी समाजामध्ये समाविष्ट होऊन आरक्षण घेणार नाही. याशिवाय तसे केल्याने इतर मागास वर्ग (ओबीसी) समाजावर अतिक्रमण होणार आहे," असे ते म्हणाले.
तसेच "या सगळया नाजूक प्रश्नाचा महाराष्ट्र सरकारने सखोल विचार करावा. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची संख्या ३२ टक्के म्हणजे ४ कोटी एवढी आहे. कोणत्याही पदापेक्षा जात, धर्म आणि देश महत्वाचे आहेत एवढंच मला सांगावेसे वाटते," असेही राणे म्हणाले आहेत.