मुंबई : मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, यां. व वि.) यांची सुमारे ४०० पदे आणि दुय्यम अभियंता (स्थापत्य, यां. व वि.) यांची सुमारे ३५० पदे अशी एकूण ७५० पदे रिक्त आहेत. सेवानिवृत्ती तसेच पदोन्नतीमुळेदेखील रिक्तन पदात वाढ होत आहे. त्यामुळे पालिकेतील कार्यरत अभियंत्यांवर रिक्त पदांचा अतिरिक्त भार पडत असल्याने त्यांना मानसिक ताणतणावास सामोरे जावे लागत आहे, असा आरोप करत रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी अशी मागणी बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनचे कार्याध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष आणि सरचिटणीस यशवंत धुरी यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्याकडे केली आहे.
मराठा सर्वेक्षणसाठी अभियंत्यांची नेमणूक केल्यामुळे अभियांत्रिकी कामाच्या उडालेल्या बोजवाऱ्याबाबत आधीच पालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तसेच रिक्त पदे भरण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि. १३ सप्टेंबर २०२२ रोजी आयुक्तांना निर्देश दिले आहेत. दीड वर्ष लोटूनही याबाबत काहीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. तरी कनिष्ठ आणि दुय्यम अभियंत्यांच्या पदभरतीची जाहिरात देत रिक्त पदे तत्काळ भरण्याची मागणी बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनद्वारे करण्यात आली आहे.