मुंबई : विद्यार्थ्यांमधील नवसंकल्पनांना चालना देणे, महाराष्ट्रातील ग्रामीण उद्योजकांचा शोध घेणे आणि नवउद्यमींचे स्टार्टअपचे स्वप्न साकार करण्यासाठी 'महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज' हे व्यासपीठ आम्ही उपलब्ध करून दिले आहे. स्थानिक पातळीवर उद्योजक घडावेत, हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवार, दि. २६ जानेवारी रोजी दिली.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राज्यभरातील २८५ नवउद्यमींना मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. राज्यातील ग्रामीण तसेच निमशहरी भागामध्ये खूप कल्पक विद्यार्थी वर्ग आहे. त्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन करण्यात आले आहे. याद्वारे विद्यार्थ्याच्या नवसंकल्पनांचा राज्याच्या विकास प्रक्रियेत लाभ घेता येणार आहे.
मंत्री लोढा म्हणाले की, "हा उपक्रमाचा दुसरा टप्पा असून, आता तिसऱ्या टप्प्यात ३६ जिल्ह्यातील निवडलेल्या या २८५ नवउद्योजकांना पुढील १ वर्षासाठी महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीकडून इन्क्युबेशन व अॅक्सेलेरेशन साहाय्य मिळेल. त्यानंतर राज्यस्तरावर १० विजेत्यांची निवड करून त्यांना प्रत्येकी ५ लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात येईल."
"विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनांना वाव मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीकडून स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचा दुसरा टप्पा पार पडला. या सर्व विजेत्यांना एका वर्षासाठी नाविन्यता सोसायटीकडून इन्क्युबेशन व अॅक्सेलेरेशन साहाय्य देण्यात येणार आहे. या सर्व नवउद्योजकांना शासनाच्या वेगवेगळ्या विभागाबरोबर काम करण्याची संधीही दिली जाईल," अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.