नीलक्रांतीचे मत्स्यपुराण

    27-Jan-2024
Total Views |
Central Institute of Freshwater Aquaculture in Odisha

मागील नऊ वर्षांत भारतातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राने २.८ कोटींहून अधिक मच्छीमार आणि मत्स्यपालकांना उपजीविका आणि उद्योजकतेची संधी प्रदान केल्याचे केंद्र सरकारच्या आकडेवारीतून स्पष्ट होते. मागील पाच वर्षांत मत्स्यव्यवसायाचा वार्षिक वृद्धी दरदेखील सात टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर गोड्या पाण्यातील मत्स्यपालन योजना आखणारी केंद्रीय संस्था म्हणजे ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेशवॉटर अ‍ॅक्वाकल्चर’ (सिफा). ओडिशाच्या दौर्‍यात या संस्थेचे मत्स्यपालनसंबंधी कार्य जवळून अनुभवता आले. त्याचाच या लेखात घेतलेला हा आढावा...

ओडिशामधील ’इंडियन काऊंसिल ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्च’च्या प्रशासकीय नियंत्रणाखाली ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेशवॉटर अ‍ॅक्वाकल्चर’ (सिफा) संस्था कार्यरत आहे. १९८७ साली ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेशवॉटर अ‍ॅक्वाकल्चर’च्या रुपात एक स्वतंत्र संस्था म्हणून विकसित झाली. या संस्थेच्या आवारात लहान-मोठी अशी ३५० मत्स्य शेततळी आहेत. ‘सिफा’मध्ये जयंती रोहू, उन्नत कटला, संवर्धित कोळंबीच्या प्रमुख प्रजातींसह मरळ, मगूर, फंटुश यांसारख्या २५ प्रमाणित मत्स्य प्रजातींचे प्रजनन, बीजोत्पादन, मत्स्योत्पादन केले जाते. या ठिकाणी देशांतर्गत मत्स्य प्रजातींचे जतन करण्याबरोबरच त्यांच्या सुधारित प्रजाती देखील विकसित केल्या जातात. त्याचप्रमाणे वैज्ञानिकदृष्ट्या विकसित करण्यात आलेल्या माशांच्या प्रजातींची माहिती देण्यासाठी दरवर्षी ३० प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात. या वर्गात ५००-६०० शेतकर्‍यांना शास्त्रोक्त पद्धतीने मत्स्य शिक्षण व प्रशिक्षण दिले जाते. या संस्थेला दरवर्षी किमान चार ते पाच हजार जिज्ञासू शेतकरी भेट देऊन मत्स्य उत्पादन क्षेत्राकडे वळले आहेत. यासह संस्थेची प्रादेशिक केंद्रही आहेत. विजयवाडा, बंगळुरू, भटिंडा आणि कोलकाता येथे ही प्रादेशिक केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून स्थानिक मत्स्य संशोधन आणि संवर्धन विषयक समस्या जाणून घेतल्या जातात. महाराष्ट्रातही ‘केंद्रीय मत्स्य विज्ञान शिक्षण संस्थे’ अंतर्गत मस्त्यशेतीविषयक कार्यक्रम हाताळले जातात.

‘सिफा’मधून शास्त्रोक्त पद्धतीने मत्स्य प्रशिक्षण घेऊन, देशभरातील कित्येक शेतकर्‍यांनी मत्स्योत्पादन क्षेत्रात अनेक मान-सन्मानदेखील मिळविले आहेत. ओडिशातील मत्स्यपालक प्रगत शेतकरी पद्मश्री बटकृष्णा साहू यांच्यासह आठ ते दहा ‘राष्ट्रीय पुरस्कार’ विजेत्या शेतकर्‍यांशीही यावेळी संवाद साधण्याची संधी मिळाली. ‘पद्मश्री’ साहू यांनी मत्स्यपालन क्षेत्राची महती आणि ’सिफा’च्या अमूल्य योगदानाची माहिती दिली. देशाच्या विविध भागांतील शेतकर्‍यांनी मत्स्यशेती पालनात नवनवे प्रयोग करून, देशातील प्रगत शेतकर्‍यांपुढे आपल्या कार्याचा अनोखा आदर्श ठेवला असल्याची माहिती ‘सिफा’चे संचालक डॉ. प्रमोदकुमार साहू यांनी दिली. मत्स्य विभाग, अनुवांशिक, जैवतंत्रज्ञान विभागाचे प्रमुख जितेंद्रकुमार सुंदराय, मत्स्य पोषण व मानसोपचार विभागाचे डॉ. एस. एस. गिरी, मत्स्य आरोग्य व्यवस्थापन विभागाच्या डॉ. मृणाल सामंता, मत्स्य उत्पादन व पर्यावरण विभागाचे प्रमुख डॉ. पी. सी. दास, मोती शेतीपालन विभागाचे प्रमुख डॉ. शैलेश सौरभ, वैज्ञानिक अविनाश रसाळ यांच्यासह ‘सिफा’च्या विविध विभांगाच्या प्रमुख शास्त्रज्ञांनी मत्स्य शेतीमधील अत्याधुनिक कार्याची माहिती प्रात्यक्षिकांसह सादर केली. जगभरातून आज भारताच्या या मत्स्यशेतीसाठी आवश्यक आधुनिक तंत्रज्ञानाची मागणी असल्याचेही संचालक डॉ. प्रमोदकुमार साहू यांनी सांगितले.

आपल्या देशात माशांच्या जवळपास २ हजार ७९९ प्रजाती असून, त्यात १ हजार ५१८ सागरी, तर ८७७ गोड्या पाण्यातील प्रजाती आहेत. मत्स्योत्पादनात आंध्र प्रदेश हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे. गेल्या नऊ वर्षांमध्ये, भारताचे वार्षिक मत्स्य उत्पादन ९५.७९ लाख टन (२०१३-१४ अखेरीस) वरून १६२.४८ लाख टन (२०२१-२२च्या शेवटी) पर्यंत वाढले आहे. म्हणजेच सुमारे ६६.६९ लाख टनांची वाढ त्यामध्ये नोंदवण्यात आली आहे. २०२३-२४ अखेरीस राष्ट्रीय मत्स्य उत्पादन विक्रमी वाढवत, जागतिक मत्स्य बाजारपेठेवर मोहर उमटविण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे.

गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीमध्ये भारत जगात दुसर्‍या क्रमांकावर आहे. २०२१-२२ या वर्षात देशांतर्गत गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन १२.१२ दशलक्ष मेट्रिक टन, तर सागरी मत्स्य उत्पादन ४.१२ दशलक्ष मेट्रिक टन इतके होते. तसेच त्याच वर्षी देशाच्या सागरी मत्स्य निर्यातीने ५७ हजार, ५८६ कोटींचा पल्ला गाठला. एकूणच भारताचे मत्स्योत्पादन मागील नऊ वर्षांत तिपटीने वाढले आहे.

मागील दहा वर्षांत ‘सिफा’ने मत्स्योत्पादन क्षेत्रात १४ तंत्रज्ञान पद्धती विकसित केल्या आहेत, ज्या आज व्यावसायिक वापरातदेखील आहेत. ‘सिफा’चा एक विभाग पूर्णतः माशांच्या आरोग्यविषयक बाबींवर संशोधन करतो. ‘नॅशनल रेफरल लॅबोरेटरी’ माशांना होणारे आजार, व्हायरल आजार, फंगल इन्फेक्शन यांविषयक अभ्यास आणि संशोधन करते. गेल्या वर्षी ’सिफा’ने खास माशांसाठी एक लसदेखील विकसित केली होती. यासोबतच मस्त्यशेतीसाठी आवश्यक विविध आरोग्य उत्पादनांची निर्मितीही ‘सिफा’ने केली आहे, ज्यामुळे विविध प्रजातींच्या मत्स्य प्रजातींचे संवर्धन आणि संरक्षण होईल. शोभीवंत माशांच्या गडद आणि तेजस्वी रंगरुपाच्या १५ ते २० प्रजाती इथे विकसित करण्यात आल्या आहेत. ’मत्स्य सेतू’ अ‍ॅपच्या माध्यमातून भारतातील हजारो शेतकरी ’सिफा’सोबत जोडले गेले आहेत. या अ‍ॅपच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मत्स्यशेतीविषयक मार्गदर्शन केले जाते. तसेच शेतकर्‍यांना आवश्यक मदतही पोहोचवली जाते.

माशांचे टॅगिंग

‘सिफा’मधील तीन तळ्यांमध्ये एकूण ६० ते ६५ प्रकारचे मासे आढळतात. तेव्हा, प्रजननातून उत्पादन घेतल्या जाणार्‍या अशा या माशांच्या पूर्ण वंशावळीचा अहवालच ’सिफा’कडे उपलब्ध आहे. प्रत्येक माशाची इत्यंभूत माहिती ‘टॅगिंग’च्या माध्यमातून नोंदवली जाते. माशाच्या पोटामध्ये छोट्याशा चिपच्या स्वरुपात कोणतीही इजा होऊ न देता, हे ‘टॅगिंग’ केले जाते. यामध्ये जेव्हा कृत्रिमरित्या मत्स्यबीज निर्मिती केली जाते, तेव्हा त्या माशाच्या चार पिढ्यांमध्ये कोणतेही नाते नसेल, याची खात्री केली जाते. अशा पद्धतीने माशांच्या विविध जातींच्या संवर्धनासाठी ’सिफा’च्या माध्यमातून व्यापक संशोधन आणि उपाययोजना सुरू आहेत.

गायत्री श्रीगोंदेकर