'आर्टिकल ३७०' मध्ये यामी गौतम सोबत झळकणार 'हा' मराठमोळा अभिनेता
23-Jan-2024
Total Views | 29
मुंबई : अभिनेत्री यामी गौतम तिच्या विविधांगी भूमिकांसाठी नक्कीच प्रसिद्ध आहे. आजवर तिने साकारलेल्या भूमिका ती फार विचारपूर्वक निवडते हे तिच्या चित्रपटांवरुन नक्कीच जाणवून येते. नुकताच तिच्या आगामी ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा प्रेक्षकांचे लक्ष नक्कीच वेधून घेणार यात शंका नाही, मात्र, यात एक मराठमोळा चेहरा देखील चर्चेत येत आहे. अभिनेता वैभव तत्ववादी याने यापुर्वी देखील अनेक हिंदी चित्रपट, वेब मालिकांमध्ये दिसला होता. आता पुन्हा एकदा ‘आर्टिकल ३७०’ मध्ये तो वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. टीझरमध्ये वैभव अॅक्शन करताना दिसत आहे.
यापुर्वी वैभव 'बाजीराव मस्तानी', 'सर्किट', 'कमांडो', 'मणिकर्णिका', 'लक्ष्य', या चित्रपटांतून नानाविध भूमिका साकारताना दिसला होता. दरम्यान, ‘आर्टिकल ३७०’ चित्रपट २३ फेब्रुवारी २०२४ रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटाबद्दल मनोगत व्यक्त करताना वैभव म्हणाला, “आदित्य जांभळे दिग्दर्शित या विलक्षण चित्रपटाचा भाग होण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. अप्रतिम कलाकारांसोबत काम केल्याने ते आणखी खास बनते. काश्मीरच्या नयनरम्य ठिकाणी शूटिंग करणे ही एक उत्तम गोष्ट होती. चित्रपटाच्या शूटिंगवेळी आम्ही सर्वांनी खूप मेहनत केली पण चित्रपट पाहिल्यानंतर मला वाटते की सर्व मेहनत सार्थकी लागली. "
‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सुहास जांभळे यांनी केले असून आदित्य धर, लोकेश धर आणि ज्योती देशपांडे यांनी या चित्रपाची निर्मिती केली आहे. तसेच, ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटात यामी गौतम, प्रियामणी, अरुण गोविल, स्कंद ठाकूर, अश्विनी कौल, किरण करमरकर, दिव्या सेठ शाह, वैभव तत्ववादी, राज झुत्शी, सुमित कौल, राज अर्जुन, असित गोपीनाथ रेडिज, अश्विनी कुमार, इरावती हर्षे मायादेव हे कलाकार देखील महत्वाची भूमिकेत दिसणार आहेत.