काँग्रेसला रामयुक्त ‘करून दाखवा!’

    23-Jan-2024   
Total Views |
 Uddhav Thackeray
 
माणूस पराकोटीचा हताश, हतबल, हतबुद्ध झाला की त्याचा आपल्या वाणीवरील संयम सुटतो. सदसद्विवेकबुद्धीने तर अशा पराभूत मानसिकतेच्या माणसाशी कधीच फारकत घेतलेली असते, म्हणूनच मग तो विचार आणि भूमिकांच्या बाबतीतही असाच परपोषी होतो. नेतृत्वाच्या बाबतीत सांगायचे तर, आसपासचे हांजी हांजी करणारे गोतावळे आणि राजकीय संगतही पक्षाच्या मूळावर उठते. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या संघटनेची वाताहत हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण. पण, आपलेच विश्वासू नेते, शिवसैनिक आपल्याला का सोडून गेले, हे आत्मचिंतन तर सोडाच, ठाकरे आता थेट भाजपला राममुक्त करण्याची भाषा बोलू लागले. राम मंदिर कुणा एका नेत्याचे, एका पक्षाचे नाही, हा राग ठाकरेंनी काल पुन्हा आळवला. तसेच ‘भाजप श्रीराममुक्त’ करावा लागेल, अशीही मल्लिनाथी केली. यावरूनच उद्धव ठाकरेंच्या राजकीय मर्यादा अधोरेखित व्हाव्या. कारण, पंतप्रधानांचे राम मंदिर लोकार्पणाप्रसंगीचे भाषण ठाकरेंनी काळजीपूर्वक ऐकले असते, तर अशी निरर्थक, बेताल विधाने करण्याची दुर्बुद्धी त्यांना कदाचित सूचलीही नसती. पण, प्रारंभी म्हटल्याप्रमाणे विवेकबुद्धीचीच झीज झालेल्या ठाकरेंना मोदींच्या उद्बोधनाचा अन्वयार्थ समजेल, ही अपेक्षाच फोल ठरावी.
 
‘राम सबके हैं, राम समस्या नही, समाधान हैं’ हीच भाजपची भूमिका पंतप्रधानांनी आपल्या भाषणातही अधोरेखित केली. त्यामुळे भाजप श्रीरामयुक्तच होती आणि ती तशीच राहील. उलट ठाकरेंच्या शिवसेनेला आपले हिंदुत्व, रामप्रेम दर्शविण्यासाठी नाशिकच्या काळाराम मंदिरात हजेरी लावावी लागली. त्यामुळे ठाकरेंप्रमाणे भाजपने हिंदुत्व राजकीय स्वार्थासाठी खुंटीला टांगले नाही. उलट आपल्या राजकीय भूमिकेतील ठामपणा, त्याबाबतचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि हिंदू जनजागरणाच्या प्रक्रियेतील भाजपचे योगदान, याच्याच परिणामस्वरुप अयोध्येत आलिशान राम मंदिर उभे राहिले. त्यामुळे श्रीराम हे एकट्या भाजपचे नाहीतच, पण भाजप मात्र श्रीरामांच्या विचारांशी, नीतीशी नक्कीच बांधील आहे. त्यामुळे ठाकरे आता कितीही रामजप करीत असले, तरी ज्यांना रामाचे अस्तित्वच मान्य नाही, रामाचे मंदिर रुचत नाही, अशांसोबत ठाकरे मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यामुळे ‘भाजपमुक्त श्रीरामा’पेक्षा, ‘काँग्रेसयुक्त श्रीराम’ करून ठाकरेंनी त्यांच्या श्रीरामभक्तीची प्रचिती द्यावी.
 
...म्हणूनच शिवसेना ‘उद्धवमुक्त’
 
माणसामध्ये आत्मविश्वास जरुर असावा, पण स्वत:बद्दल पराकोटीचा अतिविश्वास असू नये. ठाकरेंचीही सध्या हीच गत. आपण काय होतो, ते आपली कशी वाताहत झाली, याचे किमान भान ठाकरेंनी ठेवले तरी मुंबादेवीच पावली म्हणायची. दोन पक्षांच्या कुबड्या घेऊन मुख्यमंत्री झालेले आणि वाडवडिलांनी वाढवलेली शिवसेना बुडवणारेे हेच ठाकरे आता थेट मोदींना त्यांच्या गेल्या दहा वर्षांतील कामगिरीचा हिशोब विचारतात, तेव्हा हसावे की रडावे, हाच प्रश्न पडतो. कारण, हेच ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद घेऊन घरीच बसून राहिले. अख्ख्या राज्याचा कारभार म्हणे मी ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीने घरी बसून रेटला, याचेच त्यांना अजूनही अप्रूप. पण, त्या अडीच वर्षांच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा पूर्णपणे रुतला.
 
‘कोविड’ काळातही ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचार केला. त्यामुळे आपल्या उण्यापुर्‍या अडीच वर्षांच्या घरगुती कारकिर्दीचा हिशोबही ज्यांना देता येणार नाही, त्यांनी मोदी सरकारला दहा वर्षांत काय केले, म्हणून उद्दामपणे जाब विचारणे हाच मूळी पराकोटीचा दुटप्पीपणा. त्यामुळे ठाकरेंनी डोळ्यावरची राजकीय पट्टी काढून महाराष्ट्र पालथा घातला तरी मोदी सरकारने फक्त महाराष्ट्रात किती काय काय केले, याचे त्यांना दर्शन होईल. पण, कोत्या मनाच्या स्थगितीपुरुषाला विकासपुरुषाचा पुरुषार्थ कसा बरं रुजेल म्हणा? एवढ्यावर ठाकरेंची राजकीय हास्यजत्रा थांबत नसून, ते म्हणाले की, “वर्षानुवर्षे शिवसैनिकांनी खस्ता खालल्या. मगच तुम्हाला दिल्ली दिसली. पुचाट भाजपवाल्यांमुळे तुम्हाला दिल्ली दिसली नाही. माझ्या शिवसैनिकांमुळे दिल्ली दिसली.” ‘भाजपला शिवसेनेमुळे दिल्लीची सत्ता दिसली’ हाच मुळी ठाकरेंचा सर्वाच हास्यास्पद दावा. उलट शिवसेनेचे खासदार हे मोदींच्या लाटेत निवडून आले, हे वास्तव जनताही जाणून आहेच. त्यामुळे स्वत:विषयी, स्वपक्षाविषयी इतक्या आत्मविश्वासपूर्वक खोटे बोलण्याबाबत ठाकरेंचा हात कोणीच धरू शकत नाही. खोटे बोला, पण अगदी रेटून बोला, त्यातलीच ही गत. अशा आत्ममग्न, हिंदुत्ववाच्या विचारसरणीला तिलांजली देऊन राजकीय सत्तास्वार्थ साधणार्‍या नेत्याला, म्हणूनच निष्ठावंतांनीही सोडचिठ्ठी दिली आणि शिवसेना ‘उद्धवमुक्त’ करून बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुन:स्थापित झाली, ती महाराष्ट्रहितासाठीच!
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची