... कुत्ते भौंके हजार

    23-Jan-2024
Total Views |
mahamtb
 
सोमवार, दि. २२ जानेवारी हा दिवस जगभरातील तमाम हिंदूंसाठी आणि भारतीय संस्कृतीवर ज्यांचा विश्वास आहे, त्यांच्यासाठी सर्वार्थाने ऐतिहासिक ठरला. हजारो वर्षांच्या संघर्षानंतर भारतीय संस्कृतीचे, अस्मितेचे प्रतीक असलेल्या रामललाची प्राणप्रतिष्ठा अयोध्येतील रामजन्मभूमीच्या उभारण्यात आलेल्या भव्य राम मंदिरात झाली. ’हे विश्वची माझे घर’ असे मानणार्‍या भारतीय संस्कृतीचा राम हे विश्वरुपच. त्यामुळे रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची चर्चा जगभरात झाली. पण, या चर्चेला नकारात्मकतेकडे नेण्याचे काम पाश्चिमात्य आणि ‘अल जजीरा’सारख्या कट्टरपंथी माध्यमांनी केले. यातूनच जगभरात उदारमतवाद, पुरोगामीत्वाची दवंडी पिटवणार्‍या या माध्यमांचा हिंदूद्वेषी आणि कट्टरपंथी चेहरा पुन्हा एकदा समोर आला.
 
प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तारीख जवळ येईपर्यंत भारतातील प्रसारमाध्यमे रामभक्तीत तल्लीन झाली होती. अर्थातच सर्वांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद होता असे नाही, पण जनभावनेपुढे सर्वांनाच नतमस्तक व्हावे लागते. या जनभावनेच्या दबावामुळेच कायम हिंदूविरोधी भूमिका घेणार्‍या माध्यमांनीसुद्धा रामनामाचा जप सुरू केला. पाच-सहा सोशल मीडिया पत्रकार सोडले, तर भारतीय माध्यमे पूर्णपणे रामभक्तीत न्हाहून गेली होती. पण, याउलट पाश्चिमात्य माध्यमांनी आपला भारतद्वेष, हिंदूद्वेषाचा अजेंडा कायम ठेवला.
 
भारताविषयी नकारात्मक प्रपोगंडा चालवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने राम मंदिराविषयी एक वृत्तअहवाल प्रसिद्ध केला. त्यामध्ये ‘न्यूयॉर्क टाईम्स’नेसुद्धा मान्य केले की, “प्राणप्रतिष्ठा सोहळा सर्वच हिंदूंसाठी आनंदाचा क्षण आहे. पण, त्याबरोबरच ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने राम मंदिरासोबतच भारतात अल्पसंख्याक समुदायावर अत्याचार, अन्याय होत असल्याचा आरोप केला. या मंदिराद्वारे भारतातील हिंदुत्ववाद्यांना आणखी बळ मिळेल, यामुळे भारत भविष्यात अल्पसंख्याक समुदायांसाठी सुरक्षित राहील की नाही, अशी शंकासुद्धा ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने उपस्थित केली.
 
‘न्यूयॉर्क टाईम्स’प्रमाणेच, अमेरिकेतील आणखी एक प्रसिद्ध वृत्तपत्र ‘वाशिंग्टन पोस्ट’नेसुद्धा अशाच आशयाचे वार्तांकन प्रसिद्ध केले. या अमेरिकी वृत्तपत्रांची नक्कल करत युरोपातील वृत्तपत्रांनीसुद्धा या सोहळ्यामुळे भारतातील अल्पसंख्याक समुदाय असुरक्षित असल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या. ही सर्व माध्यमे स्वत:ला पुरोगामी समजत असली तरी, सत्य हेच की, भारतीय पत्रकारितेत ज्यांना कवडीचीही किंमत नाही, अशा लोकांच्या हवाल्याने हे भारतविषयी जगभरात प्रपोगंडा पसरविण्याचे काम करतात. भारतातील राणा अय्युबसारख्या हिंदूद्वेषी पत्रकारांच्या प्रपोगंडा पसरविणार्‍या लेखांना अशी ही पाश्चिमात्य माध्यमे आपल्या संपादकीय पानावर जागा देतात. यावरूनच पाश्चिमात्य माध्यमांचा हिंदूद्वेष उघड होतो.
 
पाश्चिमात्य देशातील माध्यमांबरोबरच, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची चर्चा मुस्लीम देशातील माध्यमांमध्येसुद्धा चांगलीच रंगलेली दिसली. याला राजकीय आणि ऐतिहासिक कारणेसुद्धा आहेत. मुस्लीम जगतातून या वृत्तांकनामध्ये आघाडीवर होती, निष्पक्ष पत्रकारितेचा आव आणणारी वृत्तवाहिनी ‘अल-जजीरा.’ ‘अल-जजीरा’नेसुद्धा आपल्या वार्तांकनात ‘बाबरी’चा राग आळवला.
 
‘अल-जजीरा’पेक्षाही अधिक आश्चर्यकारक कव्हेरज होते ते ’तुर्कीये’च्या माध्यमांचे. तुर्कीयेचे राष्ट्रपती एर्दोगान यांनी १५०० वर्षांपूर्वीच्या ’हागिया सोफीया’ या ऐतिहासिक चर्चचे मशिदीत रुपांतर केल्यानंतर आनंदोत्सव साजरा करणार्‍या तुर्कीयेच्या याच माध्यमांनी, भारतातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर मात्र आगपाखड केली. ही घटना भारतीय मुस्लिमांसाठी दुःखद क्षण असल्याचा उल्लेख तुर्कीयेच्या माध्यमांनी केला. तुर्कीयेच्या माध्यमांप्रमाणेच पाकिस्तानच्या माध्यमांनी सुद्धा हिंदूद्वेषाचे दर्शन घडविलेच.
त्यामुळे अशाप्रकारे जगभरातील माध्यमांचे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याविषयीच्या वार्तांकनाचे विश्लेषण केल्यानंतर हिंदीतील एक म्हण आठवते, ’हाथी चले बाजार कुत्ते भौंके हजार!’ प्राचीन भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेल्या रामाला समजून घेणे हे या माध्यमांच्या आकलनशक्तीच्या पलीकडचे, हेच खरे! 
 
श्रेयश खरात