प्रजा रामधर्म

    22-Jan-2024
Total Views |
ram mandie
 
अयोध्येतील राम मंदिर कर्तव्य धर्म रामाचे मंदिर आहे. या कर्तव्य धर्माचे पालन करण्याचा कालखंड आता सुरू झाला आहे. मानवी जीवन हे अनेकांगी असतं. मनुष्य हा सृष्टीतील एकाकी प्राणी नाही. सर्व प्राणी वनस्पती, विश्वातील सर्व मानव त्यांचे उपासना पंथ ही सर्व सृष्टी निर्मात्याची विविध रुपे आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाप्रति आपले कर्तव्य आहे. रामचरित्र हे कर्तव्य धर्म शिकवणारे चरित्र आहे. त्याचे स्मरण आपल्याला नित्य ठेवावे लागेल. 
 
जसा प्रत्येक व्यक्तीचा एक जीवन हेतू असतो, तसा प्रत्येक राष्ट्राचा एक जीवनहेतू असतो. ज्याप्रमाणे बहुसंख्य माणसांना ‘मी मानव म्हणून का जन्माला आलो,’ ते मरेपर्यंत कळत नाही. त्यामुळे त्यांची अवस्था जन्माला आले, जगले आणि गेले, अशी असते. राष्ट्राचेही असेच असते. आपले अस्तित्व कशासाठी आहे, याचे विस्मरण झाले की, तो देश अधोगतीला जातो. इस्लामी राजवटीखालील भारत त्याचे दर्शन घडवतो. ज्या राष्ट्रांना आपले जीवनलक्ष्य पूर्णपणे अवगत असते, अशी राष्ट्रे जगावर प्रभुत्व निर्माण करतात. ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, जपान, चीन, रशिया ही त्याची उदाहरणे आहेत. ब्रिटिशांनी जगभर आपले साम्राज्य निर्माण केले, अमेरिकेने देखील जगभर आर्थिक साम्राज्य निर्माण केले, रशियाने देखील युरोपात आपले साम्राज्य निर्माण केले.
 
भारताचा जीवनहेतू भूप्रदेश जिंकून लोकांना गुलाम करण्याचा नाही. आपला जीवनहेतू विश्वाला मानवतेच्या धर्माची शिकवण देण्याचा आहे. जेव्हा आपण जागृत होतो, तेव्हा हे कार्य सर्व विश्वात आपल्या पूर्वजांनी केले. नंतर आपण झोपलो आणि संकुचित होत गेलो. आपल्या वैश्विक ध्येयासंबंधी स्वामी विवेकानंद म्हणतात की, “वेदांत प्रतिपादन करतो विश्व एकत्व. एक मनुष्य ज्याप्रमाणे आहे, त्याप्रमाणे मीदेखील आहे. मी एक प्राणीमात्र आहे. सर्व परिस्थितीमध्ये एक देह, एकच मन आणि एकच आत्मा आहे. आत्म्याला अंत नाही, कोणताही विनाश नाही, देहाचा देखील अंत नाही, मनदेखील मरत नाही, देहाचा अंत कसा होणार? झाडाचे एक पान पडले, याचा अर्थ झाडाचा अंत झाला का? ते विराट विश्व हाच माझा देह आहे, पाहा त्याची कशी अविचल परंपरा आहे. सर्व मनं माझी मने आहेत, सर्वांच्या पायाने मीच चालत असतो, सर्वांच्या मुखातून मीच बोलत असतो, माझा निवास सर्व शरीरात आहे.“
 
या वैश्विक देहाच्या जागरणाचा कालखंड म्हणजे अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या मंदिराची उभारणी होय. प्रत्येक राष्ट्राच्या अस्मितेची प्रतीके असतात. ब्रिटनच्या अस्मितेचे प्रतीक राजघराण्याचे निवासस्थान ‘विंडसर पॅलेस’ आहे आणि ब्रिटनची पार्लमेंट आहे. अमेरिकेच्या अस्मितेचे प्रतीक ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ आहे. फ्रान्सच्या अस्मितेचे प्रतीक ‘व्हर्साइल राजवाडा’ आहे. भारताच्या अस्मितेचे प्रतीक अयोध्या, काशी आणि मथुरा आहे. ही तिन्ही स्थाने केवळ तीर्थयात्रेची आणि पुण्य प्राप्तीची केवळ स्थाने नाहीत, ती आम्हाला आमच्या सनातन वारशाची राष्ट्रीय ध्येयाची आठवण करून देणारी, अस्मिता स्मारके आहेत.
 
अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या जन्मस्थानी ५०० वर्षांपूर्वी मंदिर होते. इस्लामी आक्रमकांनी ते उद्ध्वस्त केले. आता त्याच जन्मस्थानावर पूर्वीच्या वैभवाची आठवण करून देणारे, भव्य मंदिर उभे राहत आहे, म्हणजे आपली अस्मिता उभी राहत आहे. मंदिर आपल्या जागृत अस्मितेचं प्रतीक बनून उभे राहत आहे. ते सर्व जगला सांगू इच्छितं की, भारत त्याच्या मोह निद्रेतून जागा होत आहे. आपण कोण आहोत आणि आपल्याला कसे जगायचे आहे, उत्तम प्रकारे जगून, आपल्याला विश्वमानवाचे कल्याण करायचे आहे.
 
प्रभू रामचंद्रांचे अस्मिता जागरण मंदिर विश्व मानव कल्याणाच्या काही पूर्व अटीदेखील सांगत आहेत. ती पूर्व अट अशी की, सर्वप्रथम देशात रामराज्य निर्माण करा. रामराज्य म्हणजे न्याय, नीती आणि विधी (फायदा)चे राज्य. मन मानेल तसे राज्य नाही. हे राज्य कसे असले पाहिजे, हे समर्थ रामदास स्वामींनी पुढील ओव्यात सांगितले आहे.
 
उद्वेग पाहतां नाही। चिंतामात्र नसे जनीं।
व्याधी नाहीं रोग नाहीं। लोक आरोग्य नांदती॥
अद्भुत पिकती भूमी। वृक्ष देती सदाफळे।
अखंड दुभती धेनू आरोग्ये वाहती जळें॥
संत तुकारामांनी देखील म्हटले की,
झाले रामराज्य काय उणे आम्हासी।
धरणी धरी पीक गाई वोळल्या म्हैसी॥
राम वेळोवेळा आम्ही गाऊं ओविये।
दळिता कांडिता जेविता गे बाईये॥
 
याचा अर्थ असा झाला की, आपल्या संतांनी दुःख विरहित समाजाची निर्मिती करण्याचे स्वप्न आपल्यापुढे ठेवले आहे. त्याला ’रामराज्य’ असे म्हटले. समाजात दुःखं असतात, ती कोणती असतात? जाती भेद, अस्पृश्यता, अवमान, अवहेलना ही सामाजिक दुःखे आहेत. रामराज्यात ती बसत नाहीत. आम्ही जातीभेद पाळू, अस्पृश्यतेचे पालन करू, स्त्रियांना दुःख देऊ, या सर्व गोष्टी रामराज्याच्या विरुद्ध आहेत. दुसरे सामाजिक दुःख आर्थिक वंचनेचे असते. रोजगार नसणे, राहायला घर नसणे, अनारोग्य असणे, पेयजलाचे दुर्भिक्ष्य असणे, इंधनाचा अभाव असणे, शिक्षण अत्यंत कठीण होत जाणे इत्यादी सर्व आर्थिक दुःखे असतात. या दोन्ही दुःखांना उपाय समाजाची इच्छा शक्ती असते.
 
समाजाला दुःख मुक्त करण्याची मोठी जबाबदारी शासन व्यवस्थेची असते. जसे लोक तसे त्यांचे शासन असते आणि जसे शासक असतात, तसे लोक होतात, असे हे परस्परावलंबी वर्तुळ आहे. लोक भ्रष्टाचार सहन करणारे असले, तर शासक भ्रष्टाचारी होतात. शासक भ्रष्टाचारी झाले की, लोकं ही संधी मिळेल, तेथे भ्रष्टाचार करतात. म्हणून रामराज्यात प्रजा आणि शासकाने नैतिक असणे अनिवार्य आहे. लोकशाही व्यवस्थेत प्रजा ही राजा असते. म्हणून राजा कसा विचार करतो, तसा समाज घडतो. आपले प्रतिनिधी निवडून देत असताना, प्रजेने नैतिकता बघितली पाहिजे. तुरुंगवारी करून आलेल्याला मते देऊ नयेत, काहीही कामधंदा न करता कोट्यवधी रूपयांची संपत्ती गोळा करणार्‍याला निवडून देऊ नये, अनेक आरोप असलेल्या कोणालाही निवडून देऊ नये, हा प्रजारुपी राजाचा धर्म आहे. आजच्या भाषेत त्याला ‘प्रजा रामधर्म’ म्हणू.
 
श्रीरामांचा विचार करताना, रामाला दशावतारातील एक अवतार मानायचे की दशरथ आणि कौसल्येचा पुत्र राम की आपल्याप्रमाणे मानव देहधारी राम म्हणायचे, हा प्रश्न आहे. एखाद्याला अवतार केले की, आपले काम त्या अवताराचे भजन-कीर्तन करणे, पूजा-अर्चा करणे एवढेच राहते. रामाचे अनुकरण करा, असे जर कोणी म्हटले, तर लगेच उत्तर येते की, राम तर अवतारी पुरूष होता. त्याचे अनुकरण आपण कसे करणार? तो देव असल्यामुळे त्याला सर्व काही शक्य होतं. आपण मानव आहोत, आपल्याला ते कसे शक्य होईल? एखाद्याला ईश्वर बनवून आपल्या कल्याणाचा सर्व भार त्याच्या डोक्यावर टाकून हरी हरी करत बसणे, ही पारतंत्र्यातील आपली सवय आपण सोडली पाहिजे. आता प्रत्येकाला राम बनायला पाहिजे आणि प्रत्येक स्त्रीला सीता बनायला पाहिजे, मानवी जीवनातील ते आदर्श आहेत.
 
अयोध्येतील राम मंदिर कर्तव्य धर्म रामाचे मंदिर आहे. या कर्तव्य धर्माचे पालन करण्याचा कालखंड आता सुरू झाला आहे. मानवी जीवन हे अनेकांगी असतं. मनुष्य हा सृष्टीतील एकाकी प्राणी नाही. सर्व प्राणी वनस्पती, विश्वातील सर्व मानव त्यांचे उपासना पंथ ही सर्व सृष्टी निर्मात्याची विविध रुपे आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाप्रति आपले कर्तव्य आहे. रामचरित्र हे कर्तव्य धर्म शिकवणारे चरित्र आहे. त्याचे स्मरण आपल्याला नित्य ठेवावे लागेल.
 
हे स्मरण म्हणजे काही नवीन विचार आहे, असेही नाही. आपल्या पूर्वजांनी जे सांगितले, त्याची आठवण करून देणे एवढाच भाग आहे. पसायदानात संत ज्ञानेश्वर म्हणतात की,
हे विश्वचि माझे घर। ऐसी मती जयाची स्थिर।
किंबहुना चराचर। आपणची जाहला॥
 
हा भव्य विचार आपण मोहनिद्रेमुळे विसरलो. अयोध्येतील राम मंदिर आपल्याला त्याचे नित्य स्मरण करून देईल. हे मंदिर आपल्याला विवेकानंदांच्या वाणीची आठवण करून देईल. स्वामी विवेकानंद सांगून गेले की, “सामर्थ्य म्हणजे जीवन, दुर्बलता म्हणजे मृत्यू, विस्तार जीवन आहे, आकुंचन मृत्यू आहे, प्रेम म्हणजे जीवन, शत्रुत्व म्हणजे मृत्यू.“ अयोध्येतील मंदिर आपल्याला सांगते की, सामाजिक सामर्थ्य निर्माण करा, आर्थिक समृद्धी निर्माण करा, आत्मरक्षणाची महाशक्ती बना, त्यानंतरच जग तुमचा प्रेमाचा संदेश ऐकेल आणि शत्रूदेखील मित्र होतील!
९८६९२०६१०१
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.