अजून किती नुकसानाचे साक्षीदार?

    22-Jan-2024   
Total Views |
 Species
 
‘आययुसीएन‘ अर्थात ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर’च्या संकेतस्थळावर प्रत्येक प्रजातीच्या संख्येनुसार वर्गीकरण सांगणारी यादी प्रकाशित केली जात असते. आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण असणार्या, या यादीमधील आकडेवारीनुसार, त्या प्रजातींचे मूल्यमापन न केलेल्या, डाटाची कमतरता असलेल्या, सर्वात कमी चिंता, धोक्याच्या जवळ असलेल्या, असुरक्षित गटातील प्रजाती, संकटग्रस्त प्रजाती, गंभीरपणे धोक्यात असलेल्या, जंगलातून नामशेष असलेल्या आणि विलुप्त प्रजाती असे टप्पे पडतात. या यादीचे अनेक चांगले परिणाम संवर्धनाच्या कामामध्ये होत असतात. तसेच यादीमध्ये दिवसेंदिवस भर पडणारी झाडांच्या तसेच इतर प्रजातींची भर ही चिंतेची बाब बनत चालली आहे.
 
अशाच प्रकारे नुकत्याच प्रकाशित झालेल्या, एका वृत्तामध्ये तब्बल १७ हजार झाडांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याची चिंता शास्त्रज्ञांना भेडसावत असल्याचे समोर आले आहे. ही सर्वसमावेशक यादी असून, जागतिक स्तरावरील जैवविविधतेचे गंभीर सूचक आहे, असं म्हणायला हरकत नाही. गेल्या दोन दशकांतील बदलांचे प्रमाण निश्चित करत, ‘आययुसीएन’च्या ’रेड लिस्ट’मध्ये नमूद केलेल्या, वृक्ष प्रजातींच्या संवर्धनाचे मूल्यांकन करण्याचा उपक्रम, ’ग्लोबल ट्री असेसमेंट’द्वारे वर्गीकृत केलेल्या सहा प्रमुख धोक्यांच्या आधारे शास्त्रज्ञांनी केले. हे धोके म्हणजे पीक शेतीचा विस्तार, शहरीकरण, वनक्षेत्रातील भू-वापरासाठी केलेली जंगलतोड, वनक्षेत्रातील बदलांचे धोके, आग आणि त्या सदृश परिस्थितीतून जळलेल्या भागात बदल त्याचबरोबर हवामान.
 
तापमान, बदललेलं ऋतुमान, पर्जन्यमानात झालेले बदल यांमुळे केवळ झाडे आणि वनस्पतीच नाही, तर प्राणी-पक्षी अशा अनेक जीवांच्या जीवनमानावर गंभीर परिणाम दिसून येत आहेत. ’नेचर कम्युनिकेशन्स’च्या एका प्रकाशित अहवालानुसार, यामध्ये नमूद केलेल्या पहिल्या चार कारणांमुळे म्हणजेच पीक शेतीचा विस्तार, वृक्षाच्छादित क्षेत्रामध्ये घट, शहरीकरण, जंगलतोड, जमिनीच्या वापरातील बदल यांमुळे या झाडांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. आतापर्यंत असे अनेक अहवाल समोर आले असले, तरी चिंतेची बाब अशी की, १७ हजार हा एक मोठा आकडा असून, ’नेचर कम्युनिकेशन्स’ने या प्रजातींची संख्या समोर आणली आहे.
 
नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या, या प्रजातींची संख्या इतकी झपाट्याने वाढणे, ही अत्यंत चितांजनक बाब आहे. या संशोधनामध्ये शास्त्रज्ञांनी जवळजवळ ४१ हजार, ८३५ प्रजातींचा अभ्यास केला. ज्यामध्ये जगभरात आढळणार्या सर्व वृक्ष प्रजातींपैकी ७२.२ टक्के प्रजातींचा समावेश होता. यातील ३२ हजार, ९० इतक्या प्रजाती संसर्ग धोक्याचा सामना करण्यास सक्षम होत्या. यापैकी ५४.२ टक्के प्रजाती (१७ हजार, ३९३) उच्च आणि वाढत्या धोक्यांचा संपर्कात असल्याचे आढळून आले.
 
अभ्यासात असेही निदर्शनास आले आहे की, अलीकडील हवामान बदलामुळे, गेल्या २० वर्षांमध्ये प्रजातींचे प्रमाण अधिक उष्ण, कोरडे तसेच वर्षाव आणि दुष्काळात अधिक हंगामी बनले आहे. ज्यामुळे उष्ण कटिबंधापासून ते उपआर्क्टिकपर्यंतच्या प्रजातींवर त्याचा परिणाम झाला आहे. पश्चिम ऑस्ट्रेलियातील (Eucalyptus redimiculifera) ही प्रजात अतिप्रमाणात केलेल्या वृक्षतोडीमुळे पाच टक्क्यांनी दरवर्षी कमी होत आहे. अशा अनेक परदेशी तसेच भारतीय प्रजाती आहेत. मोठ्या प्रमाणातील जंगलतोड, वृक्षांचे होत असलेले नुकसान, त्यांच्याबरोबर घटत चाललेले अधिवास हे सगळे वातावरण बदलाचे द्योतक आहेतच. यामुळे हवामान आणि वातावरण बदलाचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
 
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, या यादीमध्ये नोंदविलेल्या प्रजातींचे वारंवार मूल्यांकन केले जावे, जेणेकरून संवर्धनासाठी प्राधान्य क्रमावर ठेवल्या गेलेल्या या प्रजाताचे संरक्षण आणि संवर्धन होते आहे की नाही, यावर लक्ष ठेवता येईल. सातत्याने मूल्यांकन झाल्यामुळे प्रजातींच्या संवर्धनात आणखी महत्त्वाची पाऊले उचलता येऊ शकतील. त्याचबरोबर, नव्याने धोक्याच्या स्तरावर जाणार्या प्रजाती लवकर लक्षात येऊ शकतील. त्यामुळे ‘आययुसीएन’च्या यादीचे मूल्यांकन अधिक सातत्यपूर्ण व्हावे, अशी अपेक्षा शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी व्यक्त केली आहे. मानवामुळे घडलेल्या हवामान आणि वातावरण बदल तसेच परिसंस्थेचा आणि पर्यायाने जैवविविधतेच्या होणार्या भयंकर र्हासाचे अजून किती काळ साक्षीदार व्हावे लागणार, हाच खरा प्रश्न आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.