दि. ९ जानेवारी २०२४ या दिवशी 'पद्मभुषण' उस्ताद राशिद खान नावाचे एक सांगितिक वादळ शांत झाले. भारदस्त आणि निकोप स्वर, मुक्त कंठाने केलेला स्वर लगाव, अत्यंत सुरेल आणि भावनिक स्वर स्पर्श असलेल्या या कलाकाराच्या निघून जाण्याने भारतीय शास्त्रीय संगितात एक मोठी पोकळी निर्माण होऊन, पुढच्या पिढीने फक्त राशिदभाईंच्या रेकॉर्ड्सवर त्यांची गायकी ऐकणे ही खूप मोठी क्षती आहे, असे मी समजतो.
राशिदभाई हे रामपूर सहसवान घराण्याचे असून, इनायत हुसेन खाँ साहेब यांचे ते पणतू होते. फार कष्टाने, मेहनतीने आणि रियाजाने राशिद भाईंनी त्यांना मिळालेली विद्या आणि ज्ञान टिकवले आणि त्यांच्या गायकीतून अनेक श्रोत्यांना भारतीय राग संगीतातला आत्मिक आनंद प्रदान केला. (sportify app) वरती दहा लाखांहून अधिक वेळा प्रत्येक महिन्यात राशिद भाईंना ऐकले जाते, म्हणून मला असे वाटते की, ते कालच्या प्राचीन संगीतापासून ते आजचे प्रायोगिक भारतीय संगीत लीलया हाताळणारे, एक सामर्थ्यशाली कलाकार होते.
त्यांच्या सांगीतिक प्रवासात प्रत्येक व्यक्तीने शिकण्यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. त्या म्हणजे ज्येष्ठ संगीततज्ज्ञांकडून अनेक राग, रागिण्या, बंदिशी अंगीकारणे आणि स्वतःच्या गायकीने त्यात नावीन्य आणणे. उस्ताद निसार हुसेन यांच्याकडून त्यांनी गंडा बांधून घेतला होता. पण, त्यांच्या घराण्याबरोबरच इतर घराण्यांतील गोष्टींचाही अवलंब केला आणि आपण ऐकत असलेला परिपक्व उस्ताद हा अशा अनेक शैलींचा मिलाप होता. तथापि, ते कोणत्याही एका शैलीने बांधले गेले नव्हते. रामपूर सहसवान गायकी ही थोडी ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीशी जवळून संबंधित आहे, असे मला वाटते. ज्यामध्ये मध्यम मंद टेम्पो, खुल्या आवाजाची गायकी आणि बोलबाटीचे तालबद्ध लयकारीचे नाट्य अशा गोष्टींचा समावेश राशिद भाईंच्या गायकीत आढळतो. त्यांच्या गायकीवर आमिर खाँ साहेब आणि भीमसेन जोशीजींचा प्रभाव जाणवत असे. जेव्हा उस्तादजी स्वरमंडल घेऊन ‘याद पियाकी आये’ गायला लागायचे, तेव्हा उस्ताद बडे गुलाम अली खाँ साहेब यांच्या गायकीची छवी आणि बुलंदी श्रोत्यांना अनुभवायला मिळायची. त्यांची गमकेची तान असो किंवा जबडे की तान असो, अप्रतीम पद्धतीने तीनही सप्तकांतून संचार करणार्या अती जलद तानांनी खयाल नटवून त्याचे सादरीकरण करणे, हे त्यांचे वैशिष्ट्य! रागाचा स्वभाव ओळखून भावविश्वाची निर्मिती करणे, हे उस्ताद राशिद खान यांच्या गायकीचे बलस्थान होते.
या सर्व त्यांच्या विविध पैलूंमुळे मला त्यांच्या गायकीचे एक विशेष आकर्षण होते. म्हणून माझ्या भारतीय ज्ञान परंपरेचे संवर्धन करणार्या प्रकल्पात उस्ताद राशिद खान यांनी गावे, अशी माझी तीव्र इच्छा होती. प्रकल्पाचे नाव होते ‘रागोपनिषद.’ ज्याचे उद्घाटन २०२४ साली होऊ घातले आहे. या प्रकल्पामध्ये ८० बंदिशींचा समावेश असून, भारतातील सर्वोत्तम कलाकारांपैकी ३२ कलाकारांनी त्या सादर केल्या आहेत. यामध्ये उस्ताद राशिद खान यांनी तीन बंदिशी ‘राग भैरव’, ‘राग रामकली’ आणि ‘राग दरबारी कानडा’ यामध्ये गायल्या आहेत. राशिद भाई हे परिपूर्णतावादी कलाकार असल्यामुळे, मी तयार केलेल्या बंदिशी ते रियाज करून गातील, असे त्यांनी सांगितल्यामुळे मला कोलकाताला त्यांच्या घरी जाऊन राहून त्यांना ‘रिहर्सल’ देण्याची संधी लाभली. तेव्हा मी संगीतबद्ध केलेल्या बंदिशींचा अभ्यास तर झालाच; पण त्यासोबत त्यांच्या आणि माझ्या अनेक बंदिशींची देवाणघेवाण पण झाली. विशेषतः मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या बंदिशी. अनेक दिवसांच्या ‘रिहर्सल’नंतर माझ्या बंदिशींच्या ’compositions’ रेकॉर्ड झाल्या आणि विशेष म्हणजे, माझ्या मनासारख्या झाल्या. एका गोष्टीचा विशेष उल्लेख मला करावासा वाटतो, तो म्हणजे उस्ताद राशिद खान हे इतके मोठे कलाकार आहेत की, ते म्हणू शकले असते की, माझी संगीतबद्ध केलेली बंदिश ते ज्या प्रकारे गात आहेत, तेच बरोबर आहे; पण त्यांनी तसे न म्हणता माझ्या मनाप्रमाणे, मला योग्य वाटेल व समाधान होईल, तोपर्यंत ते आठ तास गात होते.हे एक विलक्षण प्रतिभा आणि सिंहासारखी छाती असलेला कलाकारच करू शकतो. म्हणूनच मी त्यांना ‘The lion of Indian classical music’ म्हणतो.
रसनिर्मिती हे एक राशिद भाईंसारख्या कलाकाराचे वैशिष्ट्य आहे. ‘खाना और गाना दोनो जमके करनेवाला कलाकार’ म्हणजे राशिद खान! मी त्यांच्या घरी असताना, त्यांनी माझ्यासाठी बनवलेली बिर्याणी आणि कबाब खाण्याचा योग आला. राशिद भाई हे उत्तम जेवण बनवत. त्यांनी बनवलेल्या जेवणाचा स्वाद हा आलौकिक असून ‘जैसा गाना वैसा खाना‘ ही म्हण त्यांना शोभून दिसली. म्हणूनच जेव्हा ते माझ्या घरी आले, तेव्हा मी त्यांना माझ्या हातचे मासे खाऊ घातले. जे त्यांना प्रचंड आवडले.
मला असे वाटते की, प्रत्येक श्रेष्ठ आणि उत्तम दर्जाच्या कलाकारामध्ये एका लहान बाळाचे चित्त दडलेले असते आणि ते लहान बाळाचे दडलेले चित्त कायम जो कलाकार जीवंत ठेवतो, त्याच्या कलेतला निरागसपणा हा कायम त्या परमतत्त्वाला गवसणी घालत असतो.
मला प्रत्येक वेळी राशिदभाईंना भेटल्यानंतर, त्यांच्या सोबत बसून गायल्यानंतर नेहमीच त्यांच्यात दडलेल्या त्या निरागस बाळाच्या चित्ताचा प्रत्यय त्यांच्या स्वरांतून येत असे. आता उस्ताद राशिद खान देहाने जरी आपल्यामध्ये नसले, तरी रागरुपाने त्यांनी निर्माण केलेले त्यांचे अस्तित्व हे सदैव श्रोत्यांना आणि संगीत कला साधकांना खुणावत राहील, अशी माझी आस्था आहे. त्यांनी गायलेले ‘दरबारी’, ‘मारवा’, ‘सोहोनी’, ‘छायानट’, ‘बिलावल’, ‘गोरखकल्याण’, ‘हंसध्वनी’, ‘यमन’, ‘मालकंस’, ‘पुरियाधनाश्री’ असे अनेक राग त्यांना आपल्यात सदैव जीवंत ठेवतील, अशी माझी खात्री आहे.
मी स्वतःला भाग्यवान समजतो की, मला त्यांचे गाणे समोर बसून ऐकता आले आणि जेव्हा केव्हा माझी त्यांची भेट होत गेली, तेव्हा त्यांचे प्रेम आणि स्नेह मी अनुभवू शकलो. राशिदभाईंची खरी संपत्ती म्हणजे त्यांचे शिष्य! मला आशा आहे की, राशिदभाईंची गायकी पुढे जाऊन त्यांचे शिष्य गातील, प्रचार करतील आणि राशिदभाईंच्या पवित्र स्मृतीस जागृत करतील.शेवटी मला कवी डॉ. घनश्याम बोरकरांच्या काही ओळी आठवतात.
चैतन्याचे स्वर जागले हे मनी
चला चक्रपाणी गाऊ दोघे
तुझ्या अनुरागी भाव सारे लीन
बंदिश नवीन बांधू दोघे
तांबोरा छेडीत आत्म्याच्या लयीत
परेच्या तालात ठेका बांधू
तुझ्यारे कृपेची येऊ दे आमद
माझे स्वरशब्द तुझे होवो
आलाप नी ताना स्त्रवो अतिरस
मी तू समरस गाऊ जेव्हा
स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली
swaradhishbharatbalvalli@gmail.com