ठाणे : ठाण्यात दहशतवादी हल्ला झाल्यास त्याच्याशी दोन हात करण्यासाठी सज्ज असलेल्या ठाणे पोलीस दलाला ठाणेकरांनी सलाम केला. महाराष्ट्र पोलीस दल 'वर्धापन दिन' निमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून पोलीस कवायत मैदानात मंगळवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पोलीस दलातील कमांडोनी बॉम्ब स्फोट झाल्यास, दहशतवादी हल्ला अथवा स्कूल बसचे अपहरण केल्यावर त्याला कशाप्रकारे चोख प्रत्युत्तर द्यायचे याची प्रात्यक्षिके विद्यार्थी तसेच, नागरिकांसमोर दाखवली.
महाराष्ट्र पोलीस दल 'वर्धापन दिन' निमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून पोलीस मैदानात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांच्यासह अनेक सिनेनाटय अभिनेते व कलाकार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर श्वानपथकानी प्रात्याक्षिक दाखवले. एखाद्या इमारतीत दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या दहशतवाद्यांना जेरबंद कसे करावे, दहशतवादी मारले गेले की जिवंत आहेत हे तपासणे तसेच, बॉम्ब शोधक पथकाची जोखमीची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. शाळेच्या बसचे अपहरण झाल्यास विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
यासोबतच आर्थिक गुन्ह्या मधील बँकींग फ्रॉड, जनरल चिटींग फ्रॉड, हाऊसिंग फ्रॉड व इतर फ्रॉडबाबत माहिती देण्यात आली. वाहतुक शाखेकडून रस्ते अपघात सुरक्षा व इतर माहिती देण्यात आली. अनैतिक मानवी प्रतिबंध कक्ष, ठाणे या बुथमध्ये लहान मुलांची विक्री, तस्करी कशा प्रकारे होते याबाबत माहिती देवून नागरिकांना जागरूक करण्यात आले. बालकांचे संरक्षण कक्ष (सीपीयू), महिला तकार निवारण कक्ष (भरोसा सेल), अंमली पदार्थ विरोधी कक्षामार्फत मादक द्रव्ये व नशा यांचा मानवी शरीरावर होणारा परिणाम तसेच जनतेचे नुकसान याबाबत माहिती देण्यात आली.