खऱ्या सावित्रीच्या लेकी...

    02-Jan-2024   
Total Views |
Savitribai Phule Birth Anniversary

प्रचंड सेवाशील आणि तितक्याच विचारशील कर्तृत्ववान असलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. सावित्रीबाईंच्या विचारकार्याची प्रेरणा घेऊन आज समाजात स्त्री शक्तीचा जागर होत आहे. आज दि. ३ जानेवारी, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. त्यानिमित्ताने सावित्री आईच्या नावाने समाजात विविध कार्यविचारही सुरू आहेत. त्या काही मतप्रवाहांचा आणि समाजातील काही सावित्रीच्या लेकींच्या कार्याचा घेतलेला मागोवा...

ज्ञान नाही विद्या नाही,ते घेणेची गोडी नाही
बुद्धी असूनी चालत नाही, तयास मानव म्हणावे का?
सावित्रीबाईंनी कुणाला मानव म्हणू नाही हे सांगताना कोण मानव आहे, याची व्याख्या केली आहे. अण्णा भाऊ साठे नगरच्या सुनीता साठे यांचे व्यक्तिमत्त्व सावित्रीबाईंच्या ’मानव कुणाला म्हणावे’ याचे जिवंत उदाहरण म्हणावे लागेल. वयाच्या १३ वर्षी सातवीत असताना सुनीता यांचा विवाह झाला. त्यांना वकील व्हायचे होते, खूप शिकायचे होते. पण त्यांचे बाबा म्हणाले, ”पोटापुरती शिकलीस बस झालं. शिकून काय करणार दुसर्‍याच्या घरी जायचेच आहे.” लग्न म्हणजे काय? हे न कळण्याच्या वयात त्या मोठ्या साठेंच्या संयुक्त कुटुंबात सगळ्यात धाकटी सून म्हणून आल्या. चार जावा आणि त्यांचा कुटुंबकबिला. धाकटी म्हणून सगळ्यांचा मानमरातब राखत पडेल ते काम करण हे ओघाने आलेच.

लग्नाला चार महिने झाले आणि साडेतेरा वर्षांच्या सुनीता यांना आईपणाची चाहूल लागली. त्यावेळी पहाटे ४ वाजता उठून अर्धा तास चालत जाऊन दोन हंडे पाणी मानखुर्दहून आणावे लागे. सात-आठ खेपा केल्या की पाण्याचा एक ड्रम भरे. सुनीता तेव्हा सहा महिन्यांच्या गरोदर होत्या. एक हंडा कंबरेवर, एक हंडा डोक्यावर आणताना त्यांचा पाय घसरला त्या पडल्या. दवाखान्यात नेले. बाळ वेळेआधी जन्मले. पण, दहा दिवसांत वारले. स्वतःच बालिका असलेल्या सुनीता यांना प्रचंड धक्का बसला. याचकाळात अण्णा भाऊ साठे नगर वसत होते. सुनीता यांनी तिथे चार पत्र्यांचा आडोसा बांधला. वर छप्पर नव्हते की खाली जमीन नव्हती. सुनीता यांनी मोठ्या हिमतीने स्वतःला आणि घराला सावरले. शेजारची महिला शिवणकाम करायची. तिचे शिवणकाम बघून त्या शिवणकाम शिकल्या. पहाटे पाणी भरायचे, तिथून गोवंडी डम्पिंग ग्राऊंडला जाऊन कचरा, लाकूड गोळा करून आणायची. कारण, चुलीवर स्वयंपाक बनवायचा, तर जळण हवे. परत आले की, घरातले सगळे आटपून, शिवण मशीनवर बसणे, पुन्हा संध्याकाळी परिसरातील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची शिकवणी घेणे.

रात्रीचा स्वयंपाक आणि सगळे आटपता बारा एक सहज वाजत. पैशाला पैसा जोडत त्यांनी संसार सावरला. ९०चे दशक होते पण त्यावेळीही या समाजात इथे संतती नियमन करणे, शस्त्रक्रिया करणे वगैरे याबाबतीत अज्ञानच होते. महिलांनी काय घरातल्या पुरुषांनीही संततीनियमानाबाबत काही निर्णय घ्यावा, हे ९०च्या काळातही इथे अभिप्रेत नव्हते. सुनीता यांना सहा मुली झाल्या. लोक म्हणत, मरताना मुखात पाणी देणारा मुलगा होत नाही हिला, दुसरी सून घरात आणायला पाहिजे. नातेवाईकांच्या टोमण्यांनी हैराण होत सुनीता यांना वाटे मुलगा होणे खरेच महत्त्वाचे आहे का? माझ्या लेकींना मी इतक कार्यक्षम बनवीन, इतकं सक्षम बनवीन की सगळे बोलले पाहिजेत की, सुनीताच्या लेकींनी नाव काढलं. मुलींचे संगोपन व्यवस्थित व्हावे म्हणून दिवसरात्र मेहनत करू लागल्या. मुलगी काय करणार? समाजाचा हा गैरसमज दूर करण्यासाठी सुनीता यांनी मुलींना खूप शिकवण्याची प्रतिज्ञा केली. त्यांना स्वप्न दिली, त्यांना आधार दिला. पुढे सुनीता यांना मुलगाही झाला. आज सुनीता यांच्या सर्व मुली उच्चशिक्षित आहेत. प्रत्येकीने त्यांच्या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला आहे. सुनीता या ‘दिशा ज्योत फाऊंडेशन’च्या अध्यक्ष आहेत.
 
त्यांच्या वस्तीतल्या महिला या घरकाम करणार्‍या किंवा कचरावेचक महिला. या सगळ्या आयाबायांना त्या सांगू लागल्या की, आपलं तर झालं गेलं, पण लेकींना शिकवू या. त्यांचे जीवन सुखी होईल. त्याचा परिणाम असा झाला की, परिसरात मुलींच्या शिक्षणाचा टक्का वाढला. आता त्यांनी वस्तीत एक नवीन संकल्पना सुरू केली आहे. तो म्हणजे वस्तीतील अल्पशिक्षित महिलांनी उच्चशिक्षण घ्यावे त्याचबरोबर स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण घ्यावे यासाठी जागृती करणे. त्यासाठी त्यांनी स्वतः शाळेत नाव टाकले. यंदा वयाच्या ४८व्या वर्षी सुनीता दहावीची परीक्षा देत आहेत. त्यांच्यासोबत वस्तीतील चार-पाच जणींही पुन्हा शिक्षणाच्या वाटेवर आहेत. आयुष्यात प्रचंड कष्ट असताना चेहर्‍यावर नेहमीच हसू असलेल्या सुनीता म्हणतात, “सावित्रीबाईंना तर शेणगोटे मारले गेलेे. आज तसे नाही. समाज खूप चांगला आहे. वस्तीतील महिला शिकाव्यात या आमच्या ध्यासाला समाज प्रोत्साहन देतो.”
असो, सावित्रीबाई फुलेंचे स्वावलंबनाबाबतचे विचारही स्पष्ट आहेत त्या म्हणतात,

स्वावलंबनाचा। उद्योग प्रपंच
ज्ञान धन संच। करी यत्ने
सावित्रीबाईंच्या या विचारांचे उत्तम प्रतिनिधित्व ‘सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळा’च्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या शेकडो महिला करतात. त्यापैकी दोनजणींच्या जीवनाचा मागोवा घेऊया. एक आहेत ‘लय भारी स्नॅक्स कॉर्नर‘च्या मिरा कांबळे. त्यांचे पती पती छोटीमोठी नोकरी करत.

मात्र, अचानक पतीचा मृत्यू झाला. घरावर उपासमारीची वेळ आली. मिरा यांचे आईबाबा वृद्ध तर भाऊ मुकबधिर. कोण कोणाला सांभाळणार? अशावेळी मिरा यांनी छोटी मोठी काम करता करता स्वयंरोजगार प्रशिक्षण घ्यायचे ठरवले. त्यांनी वर्षा पाटील यांच्याशी संपर्क साधत ‘सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळा‘च्या माध्यमातून ‘फुड टेक’ कोर्स पूर्ण केला. पहिल्यांदा समोसा विक्रीचा स्टॉल लावला. दोन-तीन दिवस १५ ते २० समोसेच विकले गेले. मात्र, मिरा यांनी घेतलेल्या स्वयंरोजगार प्रक्षिणातून अन्नपदार्थ बनवण्याचे कौशल्य, ठापठेप आणि स्वच्छता यामुळे बघता बघता मिरा यांचे दिवसाला ४०० ते ५०० समोसे विक्री होऊ लागले. आज मोठमोठ्या कॉर्पोरेट क्षेत्रातून त्या केटरींगच्या ऑडर्स घेतात. यात काही नवीन वाटत नाही हो ना? पण मिरा यांचे वेगळे पण हे की त्यांच्या वृद्ध आईबाबांना पाहणारे कुणीच नव्हते. मिरा यांनी मुकबधिर भावाला त्यांच्या ‘लय भारी स्टॉल’वर मदतनीस म्हणून सोबत घेतले. त्याला स्वतंत्र पाणीपुरीचा व्यवसाय उभा करून दिला. त्याच्यासोबत अनेक जणांना उद्योग व्यवसायाला लावले. ‘लय भारी स्नॅक्स सेंटर’नावारूपाला आणले. त्या रडत बसल्या नाहीत, तर त्यांनी परिस्थितीचे आवाहन स्वीकारले. सावित्रीबाई फुल्यांनी परिस्थितीचे आवाहन स्वीकारले.

दुसर्‍या महिला आहेत लता आहेर. लता यांच्या पतीचा पारंपरिक व्यवसाय. केषकर्तनालय ते चालवायचे. सोबत भिशीही चालवायचे. पतीच्या इच्छेखातर लता कधीही घराबाहेर पडल्या नाहीत. मात्र, एक दिवस असा उजाडला की भिशीच्या प्रकरणात पतीची फसवणूक झाली. लाखोचे कर्ज झाले. ते फेडण्यासाठी राहते घर विकावे लागले आणि केशकर्तनालयही बंद करावे लागले. पती या धक्क्यातून सावरले नाहीत. त्यामुळे लता यांनी घराबाहेर पडून काम शोधण्यास सुरुवात केली. पण कधी घराबाहेर गेल्याच नसल्याने सुरुवातीला खूप अवघड झाले. कालपर्यंत पडद्यातच असलेली ही देखणी स्त्री कशीकाय धुणीभांडी करेल? असे म्हणून लता यांना धुणीभाड्यांचीही काम कुणी दिली नाहीत. शेवटी काजबटण करण्याच काम त्यांनी सुरू केलं. आपल्याला शिवणकामात रस आहे, असा शोध त्यांना लागला. शिवणकामातून पैसे मिळवू शकतो.

पण त्यासाठी प्रशिक्षण घेणे आवश्यक होते असे त्यांना वाटू लागले. वर्षा पाटिल यांच्या मार्गदर्शनाने सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या माध्यमातून त्या अद्यावत शिवणकाम शिकल्या. स्वतचे ‘स्वप्नलता लेडिज टेलर्स’ नावाचे दुकान सुरू केले. लता महिलांच्या पसंतीचे कपडेच शिवून देत नाहीत तर त्यांना कोणते कपडे चांगले दिसतील? कोणत्या पद्धतीने शिवणकाम केले तर कपडे उठून दिसतील याबाबत मार्गदर्शन करू लागल्या. दिलेल्या वेळेतच कपडे शिवून देऊ लागल्या. काही काळातच त्यांचे स्वप्नलता लेडिज टेलर्स दुकान परिसरात प्रसिद्ध झाले. लता यांनी मदतीसाठी सोबत काम करण्यासाठी गरजू महिलांना घेतले आहे. आज याच ‘स्वप्नलता लेडिज टेलर्स’ दुकानाच्या अर्थाजनातून त्यांची दोन मुल उच्चशिक्षण घेत आहेत. त्यांनी नगरात टोलेजंग घर बांधले आणि पतीचे सगळे कर्जही फेडले. त्यांची प्रेरणा घेऊन आज वस्तीतील अनेक महिला स्वयंरोजगाराच्या दिशेने पाऊल टाकत आहेत.

सावित्रीबाईंच्या कर्तृत्चविचारांचा आणि आजच्या स्त्रीशक्तीचा मागोवा घेतोना सावित्रीबाईंचे पती क्रांतिसूर्य जोतिबा फुले यांच्याबाबत काय मत होते हेसुद्धा पाहूया. त्या म्हणतात की,
 
स्वामी जोतिबांच्या। लागे मी चरणी
जोतिबांचे बोल। मनात परसा
जीवाचा आरसा। पाहते मी
सावित्रीबाईं जोतिबांच्या सेवाविचार जगल्या. त्याचप्रकारे आजही अनेक महिला पतीच्या विचारकार्यात समर्थ साथ देत स्वता:चे आकाश निर्माण करत आहेत. असेच स्त्रीशक्तीचे रूप म्हणजे मूळच्या नागपूरच्या मात्र आता कल्याण येथे स्थायिक झालेल्या भाट समाजाच्या संगीता शिंदे. संगीता शिंदे सहकार क्षेत्राच्या को ऑपरेटिव्ह ऑडिट पॅनलवर त्या प्रमाणित लेखापरिक्षक म्हणून कार्यरत आहेत. संगिता यांनी ‘एमकॉम’पर्यंत शिक्षण घेतले. त्यांचा विवाह कल्याणच्या अरविंद शिंदे यांच्याशी झाला.

अरविंद शिंदे यांनी सेवकार्यात स्वतःला झोकून दिलेले. सेवाभावी पतीला साथ देण्यात संगीता जराही मागे हटल्या नाहीत. संगीता यांनी‘ शिंदे असोसिएटस फर्म’ स्थापन केले. सहकार क्षेत्रात अकाऊंट संदर्भात त्या कामे करू लागल्या. मोठमोठ्या वसाहतीचे सहकारी सोसायट्यांचे ऑडिट करतानाच संगीता पाणी व्यवस्थापन, तसेच पर्यावरण-निसर्ग व्यवस्थापनासंदर्भात जागृती करू लागल्या. ऑडिटमध्ये पूर्ण काम करता यावे म्हणून त्यांनी विवाहानंतर ‘एम.बीए’ आणि ‘गर्व्हमेंट डिप्लोमा इन कॉस्ट अकाऊंट’ (जीडीसीए), ‘डिप्लोमा इन को ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट’ चे शिक्षण घेतले. ऑडिटमध्ये स्वतःचा जम बसवला. त्याचवेळी ‘शिंदे फाऊंडेशन‘च्या माध्यमातून गरीब वस्त्यांमध्ये शिक्षणाचा टक्का वाढावा म्हणून काम सुरू केले. संगीता यांनी पती अरविंद यांच्या साथीने १३० मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. घरदार व्यवसाय आणि सामाजिक संस्था सांभाळत कुटुंबवत्सल संगीता या त्यांच्या भाट समाजातही सक्रिय आहेत.

वस्तीपातळीवर खर्‍या अर्थाने सावित्रीबाईंच्या विचारांचा अर्थ जगणार्‍या या आयाबाया. वस्तीपातळीवरील स्त्रीशक्तीचा प्रवास सांगताना मला ’क्रांतीज्योती सावित्रीबाई आणि मुक्त स्त्रीवाद’ मांडणार्‍या त्या महिलांचीही आठवण होत आहे. सिगारेटचा कश सोडत किंवा वंचित वस्त्यामध्ये डफ वाजवत स्त्रीमुक्तीच्या व्याख्या सांगणार्‍या त्या महिला. त्यांचे विचार आहेत ”बायांनो सोडा ते कुटुंब,मुक्त व्हा. कशाला पाहिजे ते देवेदव आणि धर्म? शिकलो आता याविरोधात बंड करून उठूया. तरच सावूआईचे नाव लावू. आम्ही सावित्रीच्या लेकी” सावित्रीबाईंच्या विचारांचा असा विचित्र आणि खोटा तपशिल देणार्‍या या महिला खरंच सावित्रीच्या लेकी आहेत का? छे! मुक्ततेच्या खोट्या कल्पनेसाठी धर्मसंस्कार संस्कृतीला तोडणार्‍या महिला या सावित्रीच्या लेकी असूच शकत नाहीत. तर संघर्ष आणि समन्वय करत धर्मसंस्कार जपत जगणार्‍या,स्वता:सोबत कुटूंब आणि समाज उत्थान करणार्‍या सगळ्या आयाबाया याच खर्‍या सावित्रीच्या लेकी आहेत.

९५९४९६९६३८
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.