‘राम नामाचा अर्थ जगाला दावू चला रे, पुन्हा आता शुद्ध मनाचा भाव पाहाया, हृदयी तुमच्याही राम हवा, भक्ती श्रद्धेचा सागर हो भरला, भगवा रंग आसमंती उधळला, अयोध्येचा राजा आपला राम मंदिरी अवतरलाय.’ सोमवार, दि. २२ जानेवारी रोजी ५०० वर्षांची रामभक्तांची इच्छा पूर्ण होणार आहे. अयोध्येत प्रभू श्रीराम त्यांच्या भव्य मंदिरात विराजमान होतील. रामललाच्या स्वागतासाठी सगळेच जण सज्ज आहेत. यात मनोरंजनसृष्टीदेखील राममय झालेली दिसून येते. आपल्या गायकीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार्या शिंदेशाही घराण्यातील आदर्श शिंदे यांच्या आवाजातील ‘प्रभू श्रीराम’ हे गाणेही नुकतेच प्रदर्शित झाले आहे. त्यानिमित्ताने आदर्श शिंदे यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला हा खास संवाद...
प्रभू श्रीरामाचे गाणे म्हणजे स्वर्गसुख
आजवर आदर्श शिंदे यांनी अनेक भक्तिगीतांतून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. परंतु, ‘प्रभू श्रीराम’ हे गाणे अतिशय खास असल्याचे त्यांनी सांगितले. आदर्श म्हणाले की, “अयोध्येत दि. २२ जानेवारीला रामाचे आगमन होत आहे आणि याच निमित्ताने भक्तिगीत गाण्याची मला मिळालेली संधी मी हातची घालवूच शकत नव्हतो. बर्याच प्रसंगी भक्तिगीते येतात. पण, रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने येणारे प्रत्येक गाणे ही खासच आहे. मी कितीही चित्रपटांसाठी गाणी गायली, तरी भक्तिगीते गाण्यात मला जो आनंद आणि समाधान मिळते, तो स्वर्गाहून सुखावणारा आनंद आहे आणि मला हे सांगताना अतिशय आनंद होत आहे की, मी नुकतीच मराठीत तीन आणि हिंदीत दोन अशी रामाची गाणी रेकॉर्ड केली आहेत. शिवाय ‘प्रभू श्रीराम’ या गाण्याचे शब्द, संगीत, गीत श्रोत्यांना इतके भावले आहे की, त्यांच्या आग्रहामुळे आम्ही हिंदीत हे गाणे करण्याचा निर्णय घेतला.” आदर्श पुढे म्हणतात की, “आजवर मी कोणत्याही भक्तिगीतांना गाण्यास नकार दिला नाही. कारण, भक्तिभावाने आणि आत्मियतेने संगीत आणि गीतकार माझ्याकडे येतात. त्यांना माझ्या गायकीतून आणि आवाजातून शिंदेशाही लोकांपर्यंत पोहोचवायची असल्याकारणाने भक्तिगीत हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.”
...आणि आजोबा म्हणाले, ‘मी माझ्या नातवाचं रेकॉर्डिंग करणार’
आदर्श शिंदे यांच्या गाण्याची सुरुवात किंवा पहिले रेकॉर्डिंगदेखील भक्तिगीतापासूनच झाले होते, हे विशेष. भीमगीते, भक्तिगीते, कव्वाली गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा आवाज म्हणजे लोकसंगीताचे सुविख्यात गायक प्रल्हाद शिंदे यांचा. आपल्या आजोबांची एक खास आठवण यावेळी आदर्श यांनी सांगितली. ते म्हणाले, “ ‘पंढरीच्या नाथा’ हा अल्बम माझ्या वडिलांनी केला होता. त्या अल्बममधील गाण्यांना त्यांनी संगीतबद्ध केले होते. यात विठ्ठलाची दहा गाणी होती. यापैकी माझे आजोबा, वडील, काका आणि मी असे प्रत्येकी दोन गाणी आम्ही गाणार होतो. मुळात माझ्या वडिलांची इच्छा होती की, माझ्या आजोबांसोबत माझे एखादे गाणे रेकॉर्ड झाले पाहिजे. अगदी १३ वर्षांचा होतो मी आणि त्यावेळी हा अल्बल रेकॉर्ड केला जात होता, तर रेकॉर्डिंगच्या दिवशी माझ्या गाण्यानंतर आजोबांचे गाणे रेकॉर्ड होणार होते. पण, आजोबा कामानिमित्त बाहेर होते, तरीही माझे पहिले गाणे रेकॉर्ड होणार असल्यामुळे त्यांनी सर्व कामे बाजूला ठेवून स्टुडिओत हजेरी लावली होती आणि महत्त्वाची बाब म्हणजे, माझे वडीलही रेकॉर्डिंगला बसले होते. त्यांना बाजूला सारून आजोबा म्हणाले, “बाजूला हो, मी माझ्या नातवाचं गाणं रेकॉर्ड करणार.” तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता. आजोबांनी नेहमीच गाणं कसं गायचं, कोणत्या भावनांचा शब्दांतून उच्चार कसा करायचा, हे शिकवलं. त्यामुळे आजोबांचा तोच आशीर्वाद आजही माझ्यासोबत कायम आहे,” याचा अभिमान असल्याच्या भावनादेखील व्यक्त केल्या.
मुखातून रामनामाचे गोडवे गाण्याचे भाग्य!
रामजन्मभूमीवर अखेर प्रभू रामाचे मंदिर उभारले जात आहे ही एक अविस्मरणीय आणि भावनिक बाब आहे. सर्वत्र राममय वातावरण झाले आहे आणि आपणही या ऐतिहासिक सोहळ्याचा एक भाग आहोत आणि आपल्या मुखातूनही प्रभू रामाचे गोडवे गायले गेले आहेत याचा मला नितांत आनंद आणि अभिमान आहे.
- आदर्श शिंदे, गायक