पुणे महानगर चहूबाजूंनी वेगाने विकसित होत आहे. त्याचबरोबर आता मेट्रो सेवेलाही चहूबाजूंनी विस्तारण्याचे वेध लागले आहेत. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा झेंडा दाखवला. त्याच कार्यक्रमात प्रस्तावित नव्या मेट्रो लाईन्सचे सूतोवाचदेखील झाले होते. आता त्याच्या आराखड्याची तयारी होत आहे. त्याचसोबत जे मार्ग मंजूर झाले आहेत आणि ज्यांची कामे प्रत्यक्ष भूमिपूजनानंतर सुरू झाली आहेत, ती वेगवेगळ्या टप्प्यांत आहे. वनाझ ते रामवाडी या ‘ब्ल्यू लाईन’चा विस्तार रुबी हॉल स्थानकापलीकडे रामवाडीच्या दिशेने होण्यात बंड गार्डनजवळील पूल हा महत्त्वाचा भाग होता. त्यावर आणखी सुरक्षाविषयक चाचण्या होतील, त्यानंतर ती लाईन नगर रस्त्यावरून मार्गस्थ होईल. हा मार्ग रामवाडीपर्यंत विस्तारला आणि त्याला विमानतळावरून फीडर सेवेची व्यवस्थित जोड मिळाली, तर मग विमान प्रवाशांनाही शहरात कोथरूडपर्यंत किंवा इंटरचेंज स्थानकाद्वारे पिंपरी-चिंचवड महापालिकेपर्यंत मेट्रो कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल. पिंपरीतील सध्याचा सुरू असलेला मार्ग आणखी काही स्थानके वाढवून, निगडीपर्यंत नेण्याची योजना सुरू आहे, तर त्याच ‘मॅजेंटा लाईन’चे दुसरे टोक स्वारगेटपर्यंत सेवा देण्यास सज्ज होत आहे. त्या ठिकाणची बुधवार पेठ, मंडई ही भुयारी स्थानके आणि स्वारगेटचे मल्टिमोडल स्थानक सज्ज होते आहे. त्यापुढच्या स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गाच्या कामालाही लवकरच हिरवा कंदील मिळणे अपेक्षित आहे. त्याशिवाय हिंजवडी मेट्रो मार्गाचे काम वेगात सुरू आहे. त्याखेरीज इतर मार्गांच्याही कामांविषयी बातम्या सातत्याने चर्चेतआहेतच. हे सगळे मेट्रो मार्ग जसजसे पूर्ण होतील, प्रवाशांसाठी खुले होतील, तसतशी शहराची कनेक्टिव्हिटी वाढेल. अनेक प्रगत देशांत कितीतरी वळणदार लाईन्सनी महानगरांची आकाशरेषा व्यापलेली असते. अधिकाधिक प्रकारे कनेक्टिव्हिटी देण्यासाठी एलेव्हेटेड मार्ग वापरले जातात. कारण, खाली रस्त्यांवर खासगी वाहनांच्या अत्याधिक संख्येने सार्वजनिक वाहतुकीत आणखी कोणत्याही प्रकारे भर टाकणे कठीण केलेले दिसते. आपल्या महानगरांमधून ती वेळ येण्याआधीच मेट्रो मार्गांनी लांब पल्ल्याचा शहरांतर्गत प्रवास सुखकर करायचे ठरवलेले दिसते. तेव्हा शहरी प्रवाशांना मेट्रोसारखे किफायतशीर आरामदायी पर्याय जितके लवकर उपलब्ध होतील, तितकीच पुण्याची वाहतूककोंडी कमी होण्यास हातभार लागेल.
आनंदोत्सवातली अथश्री
आता ‘भारत का बच्चा बच्चा’ जेव्हा ‘जय श्रीराम’ म्हणू लागला आहे, तेव्हा मुळा-मुठा काठही त्यात जोरदारपणे सहभागी होणार, हे ओघानेच आले. अयोध्येत श्रीराम मंदिरासाठी झालेल्या आंदोलनांत पुणेकर सहभागी होते. श्रीराम मंदिराच्या उभारणीतही पुणेकरांचा सहभाग सुविख्यात. आता जेव्हा दि. २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार आहे, तर अशा मुहूर्तावर किंबहुना त्याआधीच वेगवेगळे सोहळे आणि उपक्रम पुण्यात मोठ्या प्रमाणात होताना दिसतात. संस्कृतिक संघटनांतर्फे गायनाचे, नृत्याचे आणि अन्य भरघोस सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. अतिभव्य रांगोळीसारख्या लक्षवेधी उपक्रमांनी त्यात आणखी भर घातली. काहींनी प्रबोधनाची आघाडी सांभाळत श्रीरामकथा आणि व्याख्याने आदी आयोजित केली आहेत. रामचरित्रावरील दुर्मीळ पुस्तकांचे प्रदर्शन संशोधनातील मंडळींनी भरवले आहे. मॉल्स आणि बाजारपेठांनी विविध प्रकारे श्रीरामकथेच्या संकल्पनेवर सजावट केलेली पाहायला मिळते. फेरीवाले श्रीरामांचे भगवे ध्वज, पताका शेले आणि बॅजेस यांसारख्या असंख्य गोष्टी घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. रस्त्यांवरील दुकानांचे दर्शनी भाग सजले आहेत... महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात हे सगळे होणे अपेक्षितच. या पलीकडे जाऊन एक महत्त्वाची गोष्टही घडताना दिसली. ती म्हणजे यानिमित्ताने मंदिरे परिसरांची साफसफाई हाती घेण्यात आली. खरे तर कुठलीही स्वच्छता ही सहजपणे होणारी, नैसर्गिक स्वरुपाची हवी. मात्र, आपल्याकडे त्यासाठी मोहिमा आणि उपक्रम राबवावे लागतात. मंदिरे आणि त्यांचे परिसर कायमस्वरुपी स्वच्छ असायला हवेत. लोक जिथे श्रद्धेने मस्तक ठेवण्यासाठी येतात, तो परिसर स्वच्छच असला पाहिजे. स्वच्छता आणि पावित्र्याचे, निर्मळता आणि देवत्वाचे नाते जगभरातल्या मानवी संस्कृतींनी जपले आहे, त्यांची महती गायली आहे. अनेक म्हणी, वाक्प्रचार आणि वाचनांतूनही ते दिसते. आपल्याकडेही अलीकडच्या काळात अनेक ठिकाणी स्वच्छता मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहे. श्रद्धास्थानांच्या परिसरांच्या स्वच्छतेचा हा उपक्रम न राहता, चिरंतन सवय व्हावी. त्याची ही अथश्री ठरावी, हीच आशा...