बाळबोध अक्षर। घडसुनी करावे सुंदर।
जे देखताची चतुर समाधान पावती।
समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेला हा अक्षरबोध आपल्या अंगी 100 टक्के उतरविण्याचा प्रयत्न करणारे असे अनेक अक्षरव्रती आहेत, त्यांच्यात अग्रणी ठरावेत, असे पांडुरंग तथा अरविंदराव गोखले होते. ‘होते’ म्हणण्याचे कारण, या अक्षरब्रह्माच्या उपासकाने दि. 20 डिसेंबर, 2023 रोजी या जगाचा निरोप घेतला, एका प्रकारे कळत्या वयापासून घेतलेल्या सुंदर अक्षराच्या एका व्रताची सांगता झाली.
‘अरविंदराव गेले’ ही वार्ता सांगणारे फोन येत होते. एक फोन आला, “बोरकर कळलं का तुम्हाला? अहो ते ‘अक्षर वाले’ गोखले गेले!” अरविंदरावांनी आयुष्यभर जोपासलेल्या अक्षरव्रताचा महिमाच जणू त्या बाईंनी अगदी सहजपणे सांगून टाकला होता. ‘सुंदर हस्ताक्षराचा ध्यास घेतलेला एक व्रती गेला.’ ‘पांडुरंग रामचंद्र गोखले’ असं दप्तरी नोंदीचं नाव असलं तरी ते सर्व परिवारात ‘अरविंदराव’ म्हणूनच परिचित होते. अरविंदरावांचा जन्म सातार्याजवळच्या मेढा गावचा. सज्जनगडाच्या कुशीत असलेल्या या गावातल्या आपल्या जन्माविषयी त्यांना खूप अभिमान होता. त्यांच्या लहानपणी कुणी वडीलधार्याने त्यांना सांगितले होतं की, ‘अक्षर चांगलं काढशील, तर खूप मोठा होशील. अक्षर चांगले तर सगळे चांगले. सुंदर अक्षर हा अनमोल दागिना आहे’ आणि त्या वडीलधार्यांनी सांगितलेली शिकवण, त्यांनी दाखविलेला हा दागिना अरविंदराव यांनी अक्षरशः आयुष्यभर जपला, वागविला, तेजाळून टाकला. अक्षराची उपासना त्यांनी अगदी आयुष्यभर केली. सुंदर छान अक्षरासाठी स्वतः खूप प्रयत्न केले आणि इतरांनाही करायला शिकवले. त्यांनी घडवलेले सुंदर अक्षरांचे यात्री अक्षरशः हजारोंच्या संख्येत आहेत.
अरविंदराव संघ स्वयंसेवक, अगदी निष्ठावान, नियमित शाखेत जाणारे, काहीसे कर्मठ वाटावे असे! करड्या शिस्तीचे अन् थोडेसे तापटच! पण, राहाणं एकदम टापटीप, नेटकं, छान, सुंदर. सारं काही एकदम उत्तम, अगदी त्यांच्या हस्ताक्षरासारखं असायचं. सुंदर हस्ताक्षरामुळे आत्मविश्वास वाढतो आणि सारं काही सुंदर होतं, असं ते म्हणायचे आणि इतरांनाही तसेच राहायला, वागायला शिकवायचे. त्यांचं मूळ गाव कोकणातलं गोरेगाव, जन्म मेढ्यातला. बालपण - शिक्षण कराड, नगरला व नोकरी कर्मभूमी पुण्यात. ‘किर्लोस्कर ऑईल इंजिन’ आणि ‘डीएसके’मध्ये त्यांनी काम केले. नोकरी करत असतानाच त्यांनी संघाचे काम आणि सुंदर हस्ताक्षर घडवून आणण्याचे कामही खूप मोठे केले. अरविंदरावांचे अक्षर अगदी सुंदर-छान अप्रतिम होते. त्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले होते, असे ते नेहमी सांगायचे. त्यांचे देवनागरी आणि रोमन लिपीचे ज्ञानही खूप होते.
मुलांचे हस्ताक्षर, सुंदर उत्तम झाले पाहिजे, हा ध्यास अरविंदरावांनी घेतला होता आणि त्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम, उपक्रम शाळा, संस्थांमधून त्यांनी केले. सुरुवातीला आपल्या राहत्या सोसायटीतल्या मुलांसाठी सुरू केलेला सुलेखन, हस्ताक्षर सुधारण्याच्या वर्गाला भरघोस प्रतिसाद मिळाल्यावर विविध ठिकाणी त्यांनी कार्यशाळा, मार्गदर्शन वर्ग, क्लासेस असे एक ना अनेक उपक्रम मुलांसाठी राबविले. सार्वजनिक कार्यक्रम, शाळेतील मुलांसाठी सुलेखन वर्ग ते अगदी मोफत घ्यायचे. एकावेळी दोन-दोनशे मुलांची कार्यशाळा अगदी लीलया घेण्याची हातोटी त्यांना अवगत होती. काही थोडे शुल्क घेऊन घरीही हस्ताक्षराचा क्लास घ्यायचे. कार्यशाळेचे आग्रहाचे मानधनही त्यांना मिळायचे. मुलांच्या हस्ताक्षराची स्पर्धा घेऊन त्याच्या बक्षिसापोटी हे सारे पैसे ते सहजतेने वाटूनही टाकायचे. सुंदर हस्ताक्षराचा छान प्रेरणादायी प्रचार, प्रसार करण्याकडेही ते विशेष लक्ष द्यायचे. त्यासाठी पदरमोड करायचे.
केवळ मुलांनाच नाही, तर सर्व आबालवृद्धांनाही सुंदर हस्ताक्षरासाठी अरविंदराव नेहमी मार्गदर्शन करायचे. करारी वाटणार्या गोखले सरांचा हस्ताक्षराला वळण लावण्याचा लहान मुलांचा क्लास मात्र अगदी सहजतेने, हसत खेळत विद्यार्थ्याला रमवत, खुलवत चालायचा. प्रॅक्टिस कशी करायची, सांगताना विद्यार्थ्यांना इतके गुंगवून टाकायचे की, अक्षराला वळण देणार्या गोलाची किंवा साध्या रेघेची प्रॅक्टिस दोन-पाचशेवेळा सहज होऊन जायची. वेगवेगळे किस्से, प्रसंग सांगत अक्षराचे महत्त्व वळण गिरवणार्या मुलांना सांगायचे. नोकरी करत असताना किर्लोस्करांनी त्यांच्याकडून पत्रे हाताने लिहून घेतली आणि तशीच ती कॉर्पोरेट कंपन्यांना पाठवली. हेही ते खुमासदार पद्धतीने सांगायचे. त्यावेळचे संघाचे प्रांत प्रचारक सुहासराव हिरेमठ यांचे एक ऑपरेशन झाले होेते. ऑपरेशन करणार्या डॉक्टरांना आभाराचे पत्र अरविंदरावांनी लिहून पाठवले होते. अप्रतिम हस्ताक्षरातले हे पत्र त्या डॉक्टरांनी फ्रेम करून आपल्या दवाखान्यात लावून ठेवले होते. असे किस्से, वर्णन ऐकताना मुलं गुंग होऊन जायचीच आणि आपलंही अक्षर असचं अगदी सुंदर झालं पाहिजे, असा निश्चय करायची. रोज प्रॅक्टिस झालीच पाहिजे, असा प्रेमळ दम देणारे गोखले गुरूजी स्वतःही अक्षरांच्या या वळणदारपणाची उपासना, अभ्यास रोज करायचे. ‘दिसामाजी काहीतरी ते लिहावे’ या समर्थ आदेशाचे मूर्तिमंत पालन करणार्या अरविंदरावांनी आपल्या ‘सुंदर’ हस्ताक्षरात विपुल लेखन केले. शेकडो पत्रं, अनेक सन्मानपत्र, लेख, सुविचार माला अरविंदराव यांनी लिहून ठेवल्या. त्यांनी लिहिलेली हस्ताक्षरातील ग्रंथसंपदा पाहिल्यावर थक्क व्हायला होते. ‘काहीतरी दैवी गुण आहे हो तुमच्या हातात,’ असे कुणी त्यांना म्हटले की, गोखले सर हमखास म्हणायचे ‘या, तुमच्यातही हा दैवी गुण मी भरून देतो, गिरवा अक्षरे... प्रयत्नांनी तुम्हीसुद्धा दैवी व्हाल!’ प्रयत्न करायला लावण्याची त्यांची हातोटीही अशीच विलक्षण अशीच होती.
शेकडो बोधकथा अरविंदरावांनी आपल्या सुलेखनाने सजवून लिहून ठेवल्या आहेत. एकेका ओळीवर नजर खिळवून ठेवण्याचं सामर्थ्य त्या सुंदर हस्ताक्षराचं आहे. पण, त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे त्या बोधकथेत सांगितलेल्या बोधाशी किंवा विषयाशी आपण घट्ट जोडले जातो. ही त्यांच्या सुंदर हस्ताक्षराची किमया आहे. ही सारी अक्षरसंपदा त्यांच्या डहाणूकर कॉलनीतील घरी आपल्याला पाहायला मिळू शकते. हे सारं भांडार जतन करून पुढच्या पिढीला पोहोचवण्याचं काम त्यांचा मुलगा अनिकेतने स्वीकारले आहे.
सुलेखनासाठी विविध युक्त्या, हस्ताक्षर चांगले करण्यासाठी विविध प्रकारच्या युक्त्या, प्रयोग अरविंदरावांनी विद्यार्थ्यांसाठी करून ठेवले आहेत. अक्षराला नेटकं रूप कसं द्यायचं, त्यासाठी गोल, अर्ध गोल, अकार, उकार, मात्रा, रेषा, टिंब यांचे छान सर्वांना करता-गिरवता येतील, अशी वळणं त्यांनी तयार करून ठेवली आहेत. त्याचा नियमित अभ्यास केला, तर कुणाचंही अक्षर छान होतचं आणि हा अनुभव अक्षरशः शेकडो विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत घेतला आहे. अक्षर चांगलं काढताना पेन कसा हवा, (‘बॉलपेनने अक्षर चांगले येत नाही, हाताचं वळण खराब होतं’ असे अरविंदराव नेहमी म्हणायचे) त्यामुळे चांगले अक्षर काढण्यासाठी पेन कसा हवा? कागदावर रेघा कशा मारून घ्यायच्या, पेन कसा धरायचा? अक्षरांमध्ये किती अंतर ठेवायचे? अक्षरांच्या डोक्यावर रेघ कशी मारायची? अशी सारी अक्षराच्या दुनियेतली गणिते गोखले सरांनी मुलांना मुक्त हस्ते शिकवली, त्याची मॉडेल करून ठेवली. त्याचा उपयोग करून हजारोंच्या संख्येत मुलांची अक्षरे सुधारली.
‘भारतीय विचार साधना’ या प्रकाशन संस्थेने अरविंदराव गोखलेंचे ‘अक्षरबोध’ नावाचे पुस्तकदेखील प्रकाशित केले आहे. इंग्रजी आणि मराठीच्या सुंदर हस्ताक्षरासाठी लागणारे सारे काही या पुस्तकात आहे. नव्या पिढीतल्या मुलांसह ज्यांना कोणाला आपलं अक्षर सुधारायचे आहे, त्यांचे हे पुस्तक जणू वरदानच आहे. चांगल्या हस्ताक्षरासाठी अरविंदरावांनी अनेकांना प्रोत्साहित करून मुलांमध्ये नाही, तर सर्व वयोगटातल्या माणसांमध्ये आपले हस्ताक्षर चांगले करता येते, हा विश्वास जागवला आहे.
‘ज्याचं हस्ताक्षर उत्तम तो माणूस उत्तम’ असे ते नेहमी म्हणायचे. हस्ताक्षरावरून माणसाचा स्वभाव ओळखण्याचा त्यांचा आवडीचा एक खेळ होता. साधारणपणे माणसं ओळखण्याचा त्यांचा होरा कधी चुकला नाही. सुंदर हस्ताक्षराचा संस्कार, याबरोबरच संघ संस्कारही अरविंदरावांनी अनेकांच्या मनात रूजवला, त्याची सुरुवात स्वत:च्या घरापासूनच केली. संपूर्ण गोखले कुटुंब संघकार्यात रममाण झालेले आहे. अरविंदराव स्वतः संघकामातील विविध जबाबदार्या सांभाळत होते. नियमित शाखेत जाणारे ते स्वयंसेवक. त्यांचा मोठा मुलगा अभिजित गोखले संघाचा प्रचारक आहे. ‘संस्कार भारती’ या संघटनेची अखिल भारतीय संघटनमंत्री ही जबाबदारी त्यांच्यावर आहे. धाकटा अनिकेत पुण्यात घोष शाखेची जबाबदारी सांभाळत आहे. अरविंदरावांनी आयुष्यभर जोपासलेला अक्षरसंस्कार आणि संघसंस्कार आता त्यांच्या नातवंडांमध्ये देखील उतरला आहे. संघ स्वयंसेवकाने घेतलेले व्रत तो किती निष्ठेने आजन्म पाळतो, हे अरविंदरावांनी केलेल्या अक्षरसेवेच्या रूपाने पाहता येते. अक्षरब्रह्माच्या या उपासकाला त्यांच्या मासिक श्राद्धदिनी विनम्र आदरांजली...
शैलेंद्र बोरकार