शिस्त आणि संस्कार

    19-Jan-2024
Total Views | 36
arvindrao

अरविंदराव गोखले रोज संध्याकाळी शाखा वेषात शाखेवर पूर्ण वेळ उपस्थित असायचे. बाल-तरुणांचे विविध खेळ, शारीरिक कार्यक्रम ते घेत असत. त्यात स्वत:ही आवर्जून सहभागी व्हायचे. सांघिक गीत हा त्यांच्या आवडीचा विषय. 
अरविंदराव म्हणजे खरेतर एक लोभस, रुबाबदार व्यक्तिमत्त्व. प्रारंभी खडकी येथील ‘किर्लोस्कर ऑईल इंजिन्स’ येथे त्यांनी नोकरी केली. त्या नोकरीतून निवृत्ती पत्करल्यानंतर ‘डीएसके’ यांच्या ऑफिसमध्येही नोकरी केली आणि नोकरी करत असतानाच त्यांनी तितक्याच सक्रियपणे संघाचेही काम केले.
 
दैनिक शाखा- विशेषत: सायं शाखा हा त्यांच्या जिव्हाळ्याचा, आवडीचा विषय. रोज संध्याकाळी शाखा वेषात (तेव्हा संघात अर्धी खाकी विजार शाखेत आले असताना वापरत असत) शाखेवर पूर्ण वेळ उपस्थित असत. बाल-तरुणांचे विविध खेळ, शारीरिक कार्यक्रम घेत असत. त्यात ते स्वत:ही आवर्जून सहभागी व्हायचे. सांघिक गीत हा त्यांच्या आवडीचा विषय. त्यांना अनेकविध पद्ये अगदी तोंडपाठ होती. ती त्यांच्या सुवाच्य अक्षरात त्यांच्याकडे लिखित स्वरुपातही असायची. अभिजित, अनिकेत या दोन्ही मुलांच्या समवेत ते सायं शाखेवर आवर्जून उपस्थित असायचे.
 
मी अनेक वेळा त्या तिघांना एकावेळी सायं शाखेवर पाहिले आहे. शाखेतील शिस्त, स्वभावातील कडकपणाचा संस्कार दोन्ही मुलांवर त्यांनी केला. त्यामुळेच दोन्ही मुले आजही संघकार्यात व्यग्र आहेत. अभिजित तर सध्या ‘संस्कार भारती’चे संघटनमंत्री म्हणून कार्यरत आहेत. अनिकेत उत्कृष्ट घोषवादक, घोषप्रमुख म्हणून संघाच्या कामात आहे.
 
अरविंद यांचे हस्ताक्षर हे अतिशय अप्रतिम होते. अनेकविध फौंटन पेनचा त्यांचा संग्रह होता. संघाची अनेक पत्रे ही त्यांच्या उत्तम हस्ताक्षरात असायची. मुकुंदराव पणशीकर तसेच सध्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्य असलेले मा. सुहासराव हिरेमठ अनेक प्रकारची पत्रे त्यांच्याचकडून लिहून घेत असत. मा. सुहासरावांची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांनी डॉ. नितीन पत्कींना अरविंदरावांच्या हस्ताक्षरात पत्र पाठवले. ते डॉक्टरांनी त्यांच्या क्लिनिकमध्ये आजही जपून ठेवले आहे.
 
संघ शिक्षा वर्गात, फलक लेखन, बोधकथा, अमृतवचन, सुभाषित, पद्य लेखन अरविंदराव अनेक वर्षे करीत असत. संघ शिक्षा वर्गाच्या कार्यालयाचे काम-पत्रव्यवहार अरविंदराव आवर्जून वेळ काढून करायचे. संघ शिक्षा वर्गात तीन आठवडे त्यांचा निवास असे. सर्व खाते प्रमुखांबरोबर त्यांच्या गप्पा, चेष्टामस्करी ही तशी नित्याचीच. अगदी दिलखुलास हसायचे ते. सर्वांशी मैत्री, जिव्हाळ्याचे संबंध हे त्यांचे स्वभाववैशिष्ट्य. संजीव शिवदास, गिरधारी बुचडे त्यांचे त्यावेळचे सहकारी. आपला स्वतःचा व्यवस्थितपणा, टापटीपपणा या बाबतीत कुठलीही तडजोड न करता सर्वांसमवेत हसत, खेळत काम करून हलके वातावरण ठेवण्याची त्यांची हातोटी होती.
 
जीवनात त्यांनी सदैव संघकार्य, कार्यक्रम याला प्राधान्य दिले. त्यात कधीही कुचराई केली नाही. त्यांच्या पत्नीचे दुःखद निधन झाले. त्यापूर्वी अभिजित यांचा प्रचारक म्हणून काम करण्याचा निश्चय झाला होता. त्या दु:खद घटनेनंतर मी व मा. सुहासराव त्यांना भेटायला गेलो होतो. त्या घटनेसंबंधी सांत्वनपर बोलणे झाल्यावर ते आम्हा दोघांना सोडायला आले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, अभिजितचा प्रचारक म्हणून काम करण्याचा निर्णय कायम आहे. त्यात कोणताही बदल होणार नाही. इतक्या दु:खद प्रसंगी अरविंदराव झालेल्या निर्णयासंबंधी इतके पक्के होते, हे पाहून मन भरून आले. अशा ध्येयनिष्ठ कार्यकर्त्या, स्वयंसेवकांमुळेच संघाचे काम गेली ९८ वर्षे अविरत सुरू आहे. ते केवळ सुरू नाही, तर वर्धिष्णू आहे, अशा निष्ठावान अरविंदराव यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

विनायकराव डम्बीर
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121