ज्याचा त्याचा ‘राम’

    18-Jan-2024
Total Views |
modi in kerla

लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ’मिशन दक्षिण’ सुरू केले आहे. याच क्रमाने पंतप्रधान मोदी शुक्रवारी म्हणजेच दि. १९ जानेवारीला तामिळनाडूला भेट देणार आहेत. राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी चार दिवसांत पंतप्रधान मोदी तिसर्‍या दक्षिणेकडील राज्याचा दौरा करणार आहेत.
 
अवघ्या तीन दिवसांनी अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिरात श्रीरामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासाला कलाटणी देणार्‍या या देदिप्यमान सोहळ्याचा मोठा परिणाम साहजिकच देशाच्या राजकारणावरही दिसून येईल. भाजपने श्रीराम मंदिराचा मुद्दा नेहमीच आपल्या जाहीरनाम्यामध्ये अग्रस्थानी ठेवला आणि त्यासाठी प्रसंगी कित्येक वर्षे टीका-खिल्लीही सहन केली. आता अखेरीस श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा होत असताना, देशातील नागरिकांना भाजपचे या ऐतिहासिक घटनेतील योगदान आठवणे आणि भाजपनेही त्याची आठवण लोकांना करून देणे, यामध्ये वावगे काहीच नाही. त्यामुळे श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा हा मुद्दा भाजपने राजकीय बनवून टाकला, असे गळे काँग्रेस आणि त्यांच्या इकोसिस्टीमने काढण्याला कोणताही अर्थ उरलेला नाही. कारण, श्रीरामजन्मभूमी आंदोलन आणि त्यानंतरही या विषयामध्ये कोणत्या पक्षाने काय भूमिका घेतली होती, हेदेखील देशाने बघितले आहे.
 
त्यामुळे भाजपने या मुद्द्याचा राजकीय फायदा घेतला किंवा घेण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये काहीही वावगे नाही. कारण, या मुद्द्यावर भाजपची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. गोंधळ आहे तो काँग्रेसचा. काँग्रेस कधी म्हणते की, राजीव गांधी सरकारच्या काळातच श्रीरामललाचे कुलूप उघडले, तर कधी श्रीराम अस्तित्वातच नव्हते, असे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल करते आणि आता प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण मिळूनही पायावर कुर्‍हाड मारून घेऊन, ते नाकारण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. त्यामुळे श्रीराम या मुद्द्यावर जो काही गोंधळ आहे, तो काँग्रेसचा आहे. त्यातही काँग्रेसच्या इकोसिस्टीमचा गोंधळ आणखी वेगळ्याच उंचीवर पोहोचला आहे. कथितरित्या नेहरूवाद म्हणजेच विज्ञानवाद असे मानणारी एक खुळचट पुरोगामी जमात या इकोसिस्टीमच्या केंद्रस्थानी आहे. या मंडळींनी दीर्घकाळपर्यंत ’मंदिर वहीं बनाएंगे, तारींख नहीं बताएंगे’ असे म्हणून भाजपला लक्ष्य केले. भाजपने मंदिर नव्हे, तर शाळा आणि रुग्णालये बांधावी असे सल्ले दिले. हिंदू धर्म कसा खुळचट आणि मागास आहे, असे सांगितले. तेच लोक आता मात्र भाजप राजकारणासाठी धर्मशास्त्राचे पालन न करता, शंकराचार्यांना न बोलावताच, श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा करत आहे, अशा बोंबा ठोकत आहेत. मात्र, या सर्व प्रकारामुळे या मंडळींचे दररोज बुरखे फाटत आहेत. या मंडळींच्या अशा भूमिकांमुळे अंतिमतः राजकीय लाभ भाजपलाच होणार आहे, यात कोणतीही शंका नाही.
 
हे सर्व सुरू असतानाच, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ’भारत जोडो यात्रे’चा दुसरा टप्पा ’भारत जोडो न्याय यात्रे’स प्रारंभ केला. पूर्व ते पश्चिम अशा राज्यांमधून राहुल गांधी यांची ही यात्रा जाणार आहे. यात्रा सुरू होऊन आता जवळपास आठवडा झाला. मात्र, यात्रेने हवी तशी उभारी घेतल्याचे अद्याप दिसलेले नाही. यात्रेच्या प्रारंभीच एके काळच्या ‘टीम राहुल’चे सदस्य असलेले मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आता या टीममधील केवळ सचिन पायलट हेच काँग्रेसमध्ये उरले आहेत. मात्र, श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारून, ‘भारत जोडो यात्रे’द्वारे जनाधार प्राप्त करण्याचे राहुल गांधी आणि काँग्रेसचे प्रयत्न कितपत फळास येतील, हे अवघ्या चार महिन्यांत लागणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होणार आहे.
 

modi in kerla
 
या पार्श्वभूमीवर भाजप मात्र आपल्या रणनीतीद्वारे निवांत वाटचाल करत आहे. भाजप एकाचवेळी अनेक आघाड्यांवर काम करत आहे. श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा, लोकसभा निवडणुकीसाठीची रणनीती आणि त्यासाठी पक्षसंघटनेस कार्यक्रम देणे; यासाठी भाजप एकाचवेळी कार्यरत आहे. देशातील महिला मतदारांना अधिक भक्कमपणे जोडण्यासाठी भाजपने आता महिला बचत गटांसाठी विशेष ’शक्ती वंदन’ मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे लोकसभा निवडणूक-२०२४ मध्ये भाजप मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत दहा टक्के मते वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. नवीन मतदारांसह तरंगत्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी, पक्षाने रणनीती आखली आहे. मंगळवारी नवी दिल्लीतील भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात झालेल्या पक्षाच्या बैठकीत गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी क्लस्टर प्रभारींना निवडणुकीचा रोडमॅप सुपुर्द केला आहे. यावेळी विविध समुदायाच्या संमेलनासह युवक, महिला आणि लाभार्थी संपर्कावरही भर देण्यात येणरा आहे. तसेच अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय युवक-युवतींशी सतत संवाद साधला जाईल. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोन नवमतदार संमेलने घेऊन, युवकांना भाजपच्या विचारधारेशी जोडण्याची योजना आहे.
 
भाजपचे ‘मिशन दक्षिण’
 
त्याचवेळी लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ’मिशन दक्षिण’ सुरू केले आहे. याच क्रमाने पंतप्रधान मोदी शुक्रवारी म्हणजेच दि. १९ जानेवारीला तामिळनाडूला भेट देणार आहेत. राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी चार दिवसांत पंतप्रधान मोदी तिसर्‍या दक्षिणेकडील राज्याचा दौरा करणार आहेत. यापूर्वी दि. १६-१७ जानेवारीला पंतप्रधान मोदींनी आंध्र प्रदेश आणि केरळचा दौरा केला होता. लोकसभा निवडणुकीत भाजपने ४०० जागांचे लक्ष्य ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भाजपला उत्तरेसह दक्षिणेतही यश मिळविण्याची गरज आहे. ही तीच राज्ये आहेत, जिथे भाजपची कामगिरी आतापर्यंत चांगली राहिलेली नाही. यामुळेच पंतप्रधान मोदी वर्षाच्या सुरुवातीपासूनच दक्षिणेकडील राज्यांकडे वळलेले दिसतात. येथे त्यांनी विविध योजनांची केवळ उद्घाटने आणि पायाभरणीच केली नाही, तर प्रमुख मंदिरांना भेटी देऊन पूजाही केली. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आघाडीला दक्षिणेतील १३२ पैकी ३१ जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसला ६५ तर इतरांना ३६ जागा मिळाल्या होत्या.
 
श्रीरामलला प्राणप्रतिष्ठेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण भारतातील प्रमुख मंदिरांच्या दौर्‍यावर आहेत. पंतप्रधान मोदी गुरुवारी केरळमध्ये पोहोचले होते. येथे त्यांनी त्रिशूर येथील गुरुवायूर मंदिरात प्रार्थना केली. या मंदिरात श्रीकृष्णाची पूजा केली जाते. यानंतर पंतप्रधानांनी दक्षिण भारताचे पारंपरिक वस्त्र परिधान करून, त्रिशूरमधील त्रिप्रयारच्या रामास्वामी मंदिरात जाऊन पूजा केली. पूजेनंतर पंतप्रधान मोदींनी चार हजार कोटी रुपयांच्या योजनांचा शुभारंभ केला आणि त्यानंतर रॅलीला संबोधित करताना अयोध्येच्या राम मंदिर आणि केरळच्या नात्याचा उल्लेख केला.
 
याआधी मंगळवारी पंतप्रधान मोदींनी आंध्र प्रदेशातील लेपाक्षी येथील वीरभद्र स्वामी मंदिरात प्रार्थना करून, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आशीर्वाद मागितले होते. या दरम्यान, पंतप्रधान मोदींनी तेलुगूमधील रंगनाथ रामायणातील श्लोक ऐकले आणि ‘थोलू बोम्मलता’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या आंध्र प्रदेशातील पारंपरिक छाया कठपुतळी कलेद्वारे सादर केलेली जटायूची कथा पाहिली. त्यानंतर आज पंतप्रधान मोदी शुक्रवारी चेन्नईला पोहोचणार आहेत. येथे पंतप्रधान तामिळनाडूतील प्रमुख मंदिरांना भेट देतील आणि पूजा करतील. यानंतर ते रामेश्वरमलाही जाणार आहेत. पंतप्रधान मोदी शनिवारी सकाळी श्रीरंगनाथस्वामी मंदिर तिरुचिरापल्ली येथे एका कार्यक्रमात सहभागी होतील. ते रामेश्वरममधील श्रीअरुल्मिगु रामनाथसामी मंदिरात स्मरण आणि दर्शन घेतील. पंतप्रधान मोदी शनिवारी श्रीरामकृष्ण मठातही दर्शनासाठी जाणार आहेत. ’मिशन ४००’ पूर्ण करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. दक्षिणेत कर्नाटक वगळता भाजप कोणत्याही राज्यात मजबूत स्थितीत नाही. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी केवळ विकास योजनांच्या माध्यमातून या राज्यांमधील परिस्थिती मजबूत करण्यात व्यस्त नाहीत, तर त्यांनी हिंदुत्व कार्डही अजेंड्यावर ठेवले आहे.
 
श्रीरामलला प्राणप्रतिष्ठेपूर्वी पंतप्रधान मोदी दक्षिण भारताचे श्रीरामाशी असलेल्या संबंधांना उजाळा देत आहेत. ९०च्या दशकात श्रीरामजन्मभूमी आंदोलनात दक्षिण भारताने मोठी भूमिका बजावली होती, हे विसरता येणार नाही. आता प्राणप्रतिष्ठेच्या काळात अयोध्येचा हा संदर्भ पंतप्रधान नरेंद्र मोदी खुबीने मतदारांपुढे ठेवत आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.