सुमारे ४४५ पतंगांच्या जाती उत्तर महाराष्ट्रातून संशोधित करणार्या संशोधक डॉ. सचिन अर्जुन गुरुळे यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकणारा हा लेख...
डॉ. सचिन अर्जुन गुरुळे हे नाशिक जिल्ह्यातील ’मराठा विद्या प्रसारक समाज संस्थे’च्या श्री स्वामी षटकोपाचार्यजी महाराज कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, सायखेडा येथे साहाय्यक प्राध्यापक आणि प्राणिशास्त्र विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. सचिन यांचे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मराठा विद्या प्रसारक समाजाचे लोकनेते शंकरराव बालाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथे झाले. त्यांचा जन्म हा कांजूरमार्ग-मुंबईचा. मात्र, शिक्षणासाठी त्यांना उत्तर महाराष्ट्रात यावे लागले. सिन्नर महाविद्यालयातून ‘प्राणिशास्त्र’ विषयातून त्यांनी ’बीएससी’ पूर्ण केली. पुढील शिक्षण ’एमएससी प्राणिशास्त्र’ विषयात आणि ‘पीएचडी’ ’कीटकशास्त्र’ विषयात महाराष्ट्रातील अग्रगण्य अशा केटीएचएम महाविद्यालय, नाशिक येथून पूर्ण केली.
अशा या उच्चशिक्षित तरुणाने अगदी तन्मयतेने आपले कीटक तसेच प्राण्यांविषयीचे प्रेम कौशल्य आणि कृतीतून जगासमोर आणले. मूळात त्यांचे वडील प्रा. अर्जुन गुरुळे हेदेखील प्राणिशास्त्र विषयाचे प्राध्यापक असल्यामुळे, लहानपणापासूनच त्यांच्याकडून विविध प्राण्यांविषयी माहिती त्यांना मिळत होती. बर्याच वेळा ते आपल्या वडिलांसह सिन्नर महाविद्यालयात जात आणि प्राणिशास्त्र विभागाच्या प्राणिसंग्रहालयात असलेले विविध प्राणी बघून, त्यांची माहिती प्राध्यापकांकडून समजून घेत असत. बारावीत असताना ‘जीवशास्त्र’ विषयासाठी बर्वे आणि कढणे सरांच्या मार्गदर्शनात त्यांनी वाटचाल सुरू ठेवली आणि ‘प्राणिशास्त्र’ विषयात मग आविष्कार घडविले.
‘प्राणिशास्त्र’ विषयाचे प्राध्यापक डॉ. आर. डी. पवार, प्रा. ए. एस. गुरूळे, प्रा. एस. टी. पेखळे, डॉ. पी. आर. कोकाटे तसेच वनस्पती शास्त्राचे डॉ. डी. एम. जाधव यांचे तसेच प्राध्यापक डॉ. बी. एम. देवरे, डॉ. एस. एम. निकम, डॉ. वाय. डी. बेडसे, डॉ. ए. इ. देसाई, डॉ. पी. आर. भामरे आणि डॉ. सुजाता मगदूम यांच्या बहुमोल मार्गदर्शनात त्यांनी ‘प्राणिशास्त्र’ विषयात पुणे विद्यापीठात चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन, आपली या क्षेत्रातील घोडदौड सुरू ठेवली.
कीटक वर्गीकरणतज्ज्ञ डॉ. संतोष निकम यांच्या मार्गदर्शनात ‘पतंगांचे वर्गीकरण’ या विषयाचा प्रकल्प स्वीकारून, ‘पतंगांचे वर्गीकरण’ या विषयातील अभ्यासाच्या पद्धती, कीटक ओळखण्याचे तंत्र, बारकावे अतिशय उत्तमरित्या शिकून घेतले. पतंग हे निशाचर असल्यामुळे त्यांचा अभ्यास रात्रीच्या वेळी घनदाट जंगलात आणि डोंगर माथा व घाटात विशिष्ट पद्धती वापरून त्यांनी केला. यात त्यांना त्यांचे वर्गमित्र स्वप्निल थोरात, सचिन उगले, एकनाथ पाटील यांनी पतंगांच्या अभ्यासासाठी रात्रीच्या वेळी सोबत देऊन सर्वतोपरी सहकार्य केले. यासंदर्भात इंटरनेटवर माहिती घेत असताना, त्यांना या क्षेत्रातील फ्लिकर फोटो शेअरिंग संकेतस्थळावर स्वतःचे अकाऊंट तयार करून, पतंगांचे फोटो या संकेतस्थळावर एकदा शेअर केले.
त्यानंतर या विषयात कार्यरत भारतीय तसेच विदेशातील कीटक शास्त्रज्ञांच्या संपर्कामुळे मार्गदर्शन, प्रेरणा माहिती मिळत गेली आणि त्यांनी या कामात मग स्वतःला झोकून दिले.हे सर्व करत असताना हाँगकाँगमधील सर्वज्ञात पतंग कीटक शास्त्रज्ञ डॉ. रॉजर केंड्रिंक यांनी पेनांग, मलेशिया येथे आयोजित ’2nd Asian Lepidoptera Conservation Symposium 2008' या आंतरराष्ट्रीय परिषदेस सहभागी होण्यासाठी डॉ. सचिन यांना निमंत्रित केले. त्यावेळी त्यांनी ‘नाशिकमधील पतंगांची जैवविविधता’ या विषयावर माहितीपर व्याख्यान दिले. यामुळे त्यांच्या पतंगांवरील संशोधनकार्यास वेगळे वळण मिळाले. तेथून भारतात आल्यावर त्यांना ’Biodiversity of Lepidoptera from Nashik District' या संशोधन प्रकल्पात काम करण्याची संधी मिळाली. २००९ ते २०१३ दरम्यान त्यांनी ’पतंगांची जैवविविधता आणि वर्गीकरण’ यावर संशोधन केले आणि सुमारे ४४५ पतंगांच्या जाती उत्तर महाराष्ट्रातून संशोधित केल्या. त्यापैकी ९१ पतंगांच्या जाती प्रथमच महाराष्ट्रातून आढळल्याची नोंद घेतली गेली.
विशेष म्हणजे, सचिन यांच्या संशोधनाची माहिती आंतरराष्ट्रीय शोधनिबंधांद्वारे तसेच विविध आंतरराष्ट्रीय परिषदा आणि चर्चासत्रांमध्ये प्रकाशित झालेली आहे. ’पीएचडी’ पूर्ण झाल्यानंतर २०१६ मध्ये डॉ. सचिन यांनी नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालय येथे ‘प्राणिशास्त्र’ विषयाच्या साहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्य करताना, आपलेे पतंगांवरील संशोधन कार्य सुरू ठेवले. त्यांच्या नेतृत्वात तीन संशोधक विद्यार्थी ज्योती राजपूत, शाहरूख मनियार, गायत्री नारायणे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत डॉ. सचिन आणि डॉ. अदिती शेरे यांच्या मार्गदर्शनात पतंगावर पुढील संशोधन करीत आहेत. आजपर्यंत पतंगांच्या ६५० पेक्षा जास्त जातींची नोंद त्यांनी एकट्या नाशिक जिल्ह्यातून घेतलेली आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पतंगांच्या जातींविषयी जनजागृती आणि संशोधन करण्यासाठी ’राष्ट्रीय पतंग सप्ताह’ जागतिक स्तरावर आयोजित केला, त्यावेळी वेगवेगळे उपक्रम राबवित असतात.
यातून निसर्गप्रेमी मंडळ आणि विद्यार्थ्यांना नवे काही शिकण्यास मदत होत असते. त्यांनी ’वन्यजीव संरक्षण संस्थे’चे नाशिक शाखेचे अध्यक्ष जयेश पाटील आणि सदस्य बालकृष्ण देवरे यांच्याशी ओळख झाल्यानंतर ’वन्यजीव संरक्षण संस्थे’चे सदस्य म्हणूनही कार्य केले आहे. वन्यजीवांच्या संरक्षण साठी ’जन आंदोलन’, ’स्नेक रेस्क्यू’ या व्याख्यानांद्वारे ते जनजागृती करत असतात.त्यांच्या या कार्यास दै. मुंबई तरूण भारत’च्या शुभेच्छा.
अतुल तांदळीकर
(अधिक माहितीसाठी संपर्क ९७६४२१५०२५)