
संगाशी संग प्राणाशी गाठ’ ही म्हण उद्धव ठाकरेंना अगदी तंतोतंत लागू पडते. दुर्जनांच्या सान्निध्यात राहिले तर नुकसान होतेच, प्रसंगी जीवही गमवावा लागू शकतो, असा या म्हणीचा गर्भितार्थ. काँग्रेस आणि शरद पवारांसारखे अनैसर्गिक मित्र जोडून ठाकरेंनी असंगाशी संग केला आणि राजकीय विजनवासच पदरात पाडून घेतला. असो. परवा ’वरळी डोम’मध्ये भरलेल्या या जनतेच्या न्यायालयात उपस्थित कोण होते? तर यांचेच चेलेचपाटे. या कार्यक्रमाला ‘महापत्रकार परिषद’ असेही नाव दिले गेले. पण, ती पत्रकार परिषद कमी आणि दसरा मेळाव्यातील टोमणेबाज भाषणांची मालिकाच अधिक वाटली! पक्षांतरबंदी कायदा, शिवसेनेची घटना, पक्षप्रमुखांचे अधिकार आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अशा अनेक मुद्द्यांवर ठाकरेंच्या वकिलांनी या लघु दसरा मेळाव्यात पोपटपंची केली; पण त्याचा उपयोग काय? हे वकिली कौशल्य सर्वोच्च न्यायालयात आणि नंतर विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणीवेळी का वापरले गेलेले दिसले नाही? कारण, ठाकरेंच्या कुठल्याही युक्तिवादाला कायद्याची किनार अजिबातच नव्हती. म्हणूनच ठाकरेंच्या या महारटाळ पत्रकार परिषदेनंतर विधानसभा अध्यक्षांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन, ठाकरे गटाच्या सर्व दाव्यांची चिरफाड करुन हवाच काढून टाकली. खरं तर कुठलाही निकाल स्वतःच्या विरोधात गेला की, तो यांना अमान्यच. मुळात लोकशाही, न्यायालय, विधिमंडळावर ज्यांचा विश्वासच नाही, ते आता तोंड वर करून देशात लोकशाहीचा खून होतोय, म्हणून बोंबलत फिरताहेत. अनिल परब यांनीही लघु दसरा मेळाव्यात अनेक चित्रफिती आणि कागदपत्रे भल्या मोठ्या स्क्रीनवर दाखवली. पण, निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या पत्रातील मजकूर जनतेच्या न्यायालयात वाचून दाखविण्याची हिंमत त्यांनी केली नाही. कारण, त्यांची लबाडी उघडी पडली असती. मुळात या परिषदेचा घाटच विरोधकांवर तोंडसुख घेण्यासाठी होता. आता ठाकरेंना जनता का आठवली? भाजपशी दगा करुन महाविकास आघाडीत प्रवेश करताना जनता, जनतेचे न्यायालय वगैरे ठाकरेंना का आठवले नाही? त्यामुळे ठाकरेंना स्वबळाची इतकीच खुमखुमी असेल, तर त्यांनी पक्षाचे नाव, चिन्ह सगळे सोडून निवडणुका जिंकून दाखवाव्यात, तरच हे शिवसेनाप्रमुखांचे नाव लावण्यास पात्र म्हणवतील!
‘वर्षा’चा मुंबई काँग्रेसला ‘ताप’
हुल गांधींचे निकटवर्तीय मानल्या जाणार्या मिलिंद देवरांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे, मुंबईत काँग्रेसला मोठे खिंडार पडले. पण, देवरांच्या या निर्णयाला केवळ लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी नसून, पक्षांतर्गत सुंदोपसुंदीही तितकीच कारणीभूत. वर्षा गायकवाड यांच्या गळ्यात मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची माळ पडली. पण, वर्षाताईंच्या एकहाती कारभारामुळे प्रिया दत्त, संजय निरुपम, भाई जगताप, मिलिंद देवरा असे मुंबई काँग्रेसमधील अनेक नेते दुखावले गेले. मुंबई काँग्रेसला अर्थबळ देणारे घराणे म्हणून देवरा कुटुंबाची ओळख. काँग्रेस शिखरावर असल्यापासून पडत्या काळातील संघर्षातही देवरांनी पक्षाची साथ दिली. परंतु, अलीकडच्या काळात त्यांना पक्षाकडून हवी तशी साथ मिळणे बंद झाले. त्यामुळेच त्यांनी पक्षबदल करण्याचा निर्णय घेतला. देवरांनी पक्ष सोडल्यामुळे, मुंबई काँग्रेसमधील गायकवाड यांचा गट भलताच खूश झाला. मिलिंद देवरांनी काँग्रेस सोडण्यामागील कारणांची मीमांसा करण्यासाठी हायकमांडच्या सूचनेनुसार त्यांनी नुकतीच एक बैठक बोलावली. पण, त्याचे निमंत्रण अनेकांना दिले गेले नाही. भाई जगताप हे त्यापैकीच एक. मिलिंद देवरांनी काँग्रेस सोडताना, मुंबई काँग्रेसमधील निम्म्याहून अधिक कार्यकर्ते सोबत घेण्याचे नियोजन केले होते. परंतु, जगताप यांनी त्यातील बहुतांश जणांची मनधरणी करून मोठे बंड थोपवले. त्याबद्दल कौतुक होईल आणि पक्षात मोठी जबाबदारी मिळेल, अशी त्यांची अपेक्षा असावी. पण, मुंबई अध्यक्षांनी त्यांना साधे बैठकीचे निमंत्रणही पाठवण्याचे सौजन्य दाखविले नाही. जगताप यांची खुर्ची काढून, हायकमांडने गायकवाड यांना अध्यक्षपदावर बसवले. तेव्हापासून या दोघांमध्ये सुप्त संघर्ष सुरुच आहे. भाईंना पुन्हा खुर्चीची लालसा, तर वर्षाताईंना खुर्ची जाण्याची भीती. यावरून सुरू झालेले कुरघोडीचे राजकारण एकमेकांचा काटा काढण्यापर्यंत पोहोचले. देवरांनी काँग्रेस का सोडली, याचा गुप्त अहवाल रविवारी रात्रीच काँग्रेस हायकमांड आणि काँग्रेस अध्यक्षांकडे पोहोचवण्यात आल्याचे समजते. गायकवाड यांच्या मनमानी कारभारावर त्यात म्हणे नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असताना, मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष पक्षाची उरलीसुरली ताकदही क्षीण करेल, हे निश्चित!
सुहास शेलार