"वरळीच्या डोम सभागृहात वेड्यांची जत्रा"; नितेश राणेंचा घणाघात

    17-Jan-2024
Total Views |

Rane & UBT


मुंबई :
वरळीच्या डोम सभागृहात वेड्यांची जत्रा भरली होती, असा घणाघात भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेवर केला आहे. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी दिलेल्या आमदार अपात्रतेच्या निकालाविरोधात उद्धव ठाकरेंनी मंगळवारी महापत्रकार परिषद घेतली होती. यावर आता नितेश राणेंनी टीका केली आहे.
 
नितेश राणे म्हणाले की, "काल मुंबईतील वरळीच्या डोम सभागृहात वेड्यांची जत्रा भरली होती. सगळे वेडे एकत्र येऊन बाजूच्यापेक्षा मी किती वेडा आहे हे सांगण्याची स्पर्धा सुरु होती. जनतेच्या न्यायालयाच्या नावाने धमक्या देणं, शिव्याशाप देणं एवढा एककलमी कार्यक्रम सुरु होता."
 
"उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीची केसदेखील जनतेच्या न्यायालयात चालवतील का? जयदेव ठाकरेंची बाजू यापुढे अशा प्रकारे डोम सभागृह बुक करुन जनतेच्या पुढे चालवा. दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूतची केस आपण जनतेच्या न्यायलयात चालवायची का? की जनतेच्या न्यायालयात फक्त निवडकच केस चालणार?," असा सवालही त्यांनी केला.
 
ते पुढे म्हणाले की, "आमच्या राहूल नार्वेकरांनी अध्यक्ष म्हणून सुप्रीम कोर्टाच्या चौकटीत राहून निकाल दिला. संजय राऊत आता त्यांची डिग्री तपासायची भाषा करतात. तुमच्या मालकाचा मुलगा राहूल नार्वेकरांकडे कायद्याचे धडे घेत होता तेव्हा त्यांची डिग्री दिसली नाही का? तुम्ही जे घटनेत बदल केलेत ते त्या त्या संस्थेला कळवावे लागतात. कपिल सिब्बल आणि अनिल परब यांना या गोष्टी कळणार नाही. ज्या उद्धव ठाकरेंना मानेवरचं मच्छर मारता येत नव्हतं ते जेव्हा धमकीची भाषा करतात तेव्हा शाळेतला मुलगादेखील त्यांना घाबरत नाही," असा निशाणा त्यांनी साधला.
 
वकील असिम सरोदेंविषयी बोलताना ते म्हणाले की, "शिवरायांच्या स्मारकाला विरोध करणारा वकील आता उद्धव ठाकरेंचा वकील बनला आहे. पुढच्या जनता न्यायालयात पहिली केस बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीची होऊ द्या आणि दुसरी केस ही दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूतच्या मर्डरची होऊ द्या. जे काही आहे ते जनतेसमोरच होऊ द्या," असेही ते म्हणाले.