नवी दिल्ली : समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्ती व नेते राष्ट्रवादाच्या प्रवाहात येण्यात इच्छुक आहेत. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने अशा व्यक्तींच्या संपर्कात रहावे, असा कानमंत्र केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी भाजपच्या ३०० कार्यकर्त्यांना मंगळवारी दिला.
लोकसभा निवडणुक व्यवस्थापनामध्ये कार्यरत भाजपच्या ३०० कार्यकर्त्यांची बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पक्षाध्यक्ष जगतप्रकाश नड्डा आणि राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
ते म्हणाले की, "समाजातील विविध स्तरातील व्यक्ती आणि नेत्यांना राष्ट्रवादी प्रवाहात सामील होण्याची इच्छा आहे. अशा व्यक्तींशी भाजपच्या निवडणूक व्यवस्थापनातील प्रत्येक कार्यकर्त्याने संपर्कात राहण्याची गरज आहे. केवळ निवडणुक जिंकणे हा भाजपच्या उद्देश नसून समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून पं. दीनदयाल उपाध्याय यांची अंत्योदयाची कल्पना साकारणे हा भाजपचा उद्देश आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कठोर परिश्रमांचा नवा आदर्श घालून दिला आहे," असेही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
भाजपचे ‘रिव्हर्स वेळापत्रक’- विनोद तावडे
बैठकीत लोकसभेच्या सर्व जागांवर चर्चा करण्यात आली आणि भाजप आणि मित्रपक्षांच्या उमेदवारांचा विजय निश्चित करण्यासाठी विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या आणि मतमोजणीच्या तारखेनुसार आजपर्यंतचे ‘रिव्हर्स वेळापत्रक’ तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये नवीन मतदार संपर्क अभियान, लाभार्थी संपर्क, मागासवर्गीय, दलित, आदिवासी युवक, आणि विशेषतः महिला संपर्कावर विशेष भर देण्यात आला आहे, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी दिली आहे.