श्रीकृष्ण जन्मभूमीच्या सर्वेक्षणास तूर्त स्थगिती! सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
ज्ञानवापीच्या कथित वजुखान्याची स्वच्छता होणार
16-Jan-2024
Total Views |
नवी दिल्ली : श्रीकृष्ण जन्मभूमी - शाही इदगाह मशीद वादाच्या संदर्भात मशिदीच्या परिसराची पाहणी करण्यासाठी न्यायालयीन आयुक्त नेमण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्थगिती दिली आहे. त्याचवेळी अन्य एका खटल्यास ज्ञानवापीमधील कथित वजुखान्याची स्वच्छता करण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयात खटल्याची सुनावणी करताना न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्या. दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या या खटल्याशी संबंधित सर्व प्रकरणे सुनावणीसाठी स्वत:कडे वर्ग करण्याच्या आदेशावर प्रश्न उपस्थित केला. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना उच्च न्यायालयाने हे प्रकरण स्वत:कडे कसे वर्ग केले, असा सवाल न्यायालयाने यावेळी विचारला.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, अलाहाबाद उच्च न्यायालय गुणवत्तेवर या प्रकरणाची सुनावणी करू शकते, परंतु उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आयुक्तांच्या नियुक्तीविषयी कोणताही आदेश पारित करू शकणार नाहीत. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने हिंदू पक्षाच्या युक्तिवादावर प्रश्न उपस्थित करून त्यांची मागणी अस्पष्ट असल्याचेही नमूद केले. याप्रकरणी पुढील सुनावणी २३ जानेवारी रोजी होणार आहे.
ज्ञानवापीतील वजुखान्याविषयी महत्त्वाचा निर्णय
शिवलिंग आढळलेल्या ज्ञानवापीतील कथित वजुखान्याची स्वच्छता करण्याची हिंदू पक्षाची मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य करून जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तसे करण्याचे आदेश दिले आहेत. वजुखान्यात असलेले मासे मरण पावल्यानंतर हिंदू पक्षाने स्वच्छतेची मागणी केली होती. वजुखान्यात असलेले शिवलिंग हिंदूंसाठी अत्यंत पवित्र आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची धूळ, घाण आणि मृत जनावरांपासून ते दूर ठेवण्यात यावे. मात्र सध्या त्यास मृत माशांनी वेढले असून, त्यामुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या जात असल्याचे हिंदूंनी आपल्या याचिकेत म्हटले होते.