सौंदर्यजतन,सौंदर्यवर्धन आयुर्वेदासंगे...

    15-Jan-2024
Total Views |
1
 
केसांची सर्वाधिक कोणती तक्रार घेऊन दवाखान्यात रुग्ण येत असतील, तर ती तक्रार म्हणजेकेस गळण्याची समस्या. लहान-मोठे, मुलं-मुली अशा सगळ्यांमध्येच केस गळणे ही तक्रार बघायला मिळते. केस गळणे, केस पातळ होणे, केस विरळ होणे, टक्कल पडणे ही उत्तरोत्तर क्रमाक्रमाने दिसणारी लक्षणे आहेत. म्हणजे पहिल्या टप्प्यातच जर याची काळजी घेतली, उपाय केले, तर पुढील लक्षणे उत्पन्न होणार नाही. त्याबद्दल आजच्या लेखातून सविस्तर जाणून घेऊयात.
 
विविध वयात, ऋतूत आणि स्त्रियांमध्ये /पुरुषांमध्ये केस गळण्याची विविध कारणे आढळतात. त्यानुसार केस गळण्याचे पॅटर्नही भिन्न भिन्न असते. उदा. घट्ट केस बांधल्यामुळे दिवसभर घट्ट केशरचना आणि असे अनेक दिवस/महिने सुरू असल्यास ज्या केसांवर ताण बसतो, जे केस खेचले जातात, ओढले जातात, त्या भागातील केस जास्त तुटतात. घट्ट वेण्या घालणे, HIGH PONY TAILS आणि विविध केशश्रृंगार (HAIR STYLES) ज्यात खूप सार्‍या घट्ट पिना लावल्या जातात किंवा खरे केस घट्ट आंबाड्यात बांधून त्यावर खोट्या केसांची संरचना करणे इ. काही वेळेस व्यवसाय/व्यवसायामुळे सतत केस घट्ट बांधून आंबाडा घालावा लागतो.(परिचारिका, पोलीस महिला, एअर होस्टेस, शेफ)इ. किंवा धर्मांमध्ये (शीख धर्मात पगडी घालावी लागते) या सगळ्या कारणांनी केसांवर सतत अतिरक्ति ताण बसतो - काही वेळेस पुढच्या केसांच्या HAIR LINE वर आणि काही वेळेस मागील केसांवर तर कधी क्राऊन रिजनवर. मग त्या-त्या भागावरील केस तुटतात. बरेचदा समूळ (मुळासकट) हे केस निघतात आणि परत केस येत नाहीत. आता केस गळणे म्हणजे ‘अ‍ॅलोपेसिया’ आणि ताणामुळे, खेचल्यामुळे होणार्‍या केसगळतीला ’'TRACTION ALOPECIA’ म्हणतात. जर मुळांशी कायमस्वरूपी इजा झाली नसेल, तर केस पुन्हा उगवू शकतात. यासाठी जरा सैलसर केस बांधणे गरजेचे आहे.
 
दुसर्‍या पद्धतीची केसगळती ही चुकीच्या आहार-विहाराच्या सवयींमुळे होते. डाएटिंगचे खूळ, स्लिमिंग शेक इ. मुळे संतुलित आहाराचे सेवन केले जात नाही. बारीक होण्याच्या, वजन कमी करण्याच्या अट्टाहासापायी तुपाचा व तेलाचा वापर बंद केला जातो. पोळी-भात खाल्ले जात नाही. आपले (भारतीय पद्धतीचे) ताट हे संतुलित अन्नाचे सगळ्यात उत्तम उदाहरण. फूड पिरॅमिडमध्ये जसे कार्बोहायड्रेटचे प्रमाण सगळ्यात जास्त असल्याने अधिक खावे असे सांगितले जाते, त्याचप्रमाणे आपल्या ताटात भात, पोळी, भाकरी यांचे प्रमाण अधिक असते. प्रोटीन्सचा फूड पिरॅमिडमध्ये दुसरा क्रमांक. याचे प्रमाण ‘कार्बोहायड्रेट’पेक्षाकमी पण, मिनरल्स, जीवनसत्त्वे, चरबीपेक्षा जास्त. तसेच, डाळी आणि भाज्या, कोशिंबिरीचे प्रमाण आपल्या जेवणात असते. लिंबू, चटणी, तूप याचे अत्यंत कमी प्रमाण आहार असते. (जीवनसत्त्वे, मिनरल्स आणि चरबी) पण, संपूर्ण संतुलित आहार म्हणजे हाच होय. त्यातील काही जिन्नसे संपूर्णतः आहारातून नाहीशी केल्यास हे संतुलन बिघडते. बर्‍याचशा डाएटमधून हे संतुलन बिघडते. त्यामुळे कितीही पौष्टिक जिन्नस असले, तरी त्याचा अर्थ ते सुसंतुलित आहे, असे होत नाही.
 
लग्नसराईचा काळ जवळ आला किंवा महत्त्वाचे कार्यक्रम आले की, ‘क्रॅश डायटिंग’ला जोर येतो. तात्पुरते वजनही कमी होते. विविध आहार पाककृतीमुळे आधी त्वचेवर ग्लो, तुकतुकी येते. ताजेतवाने वाटते. पण, असंतुलित आहारामुळे हळूहळू तक्रारी सुरू होतात. त्यातील केस गळणे हे पहिल्या क्रमांकाचे लक्षण/तक्रार असते. मग यावर सप्लीमेंट्स, शॅम्पू, कॉस्मॅटिक उपचार करून घेण्याचा भडिमार सुरू होता. यामध्ये एक गोष्ट लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे की, पौष्टिक, संतुलित आहाराला कुठल्याही सप्लिमेंट्स, न्यूट्रासेन्शियल्सची तोड नाही येत.
 
संतुलित आहारानेच या प्रकारच्या केसगळतीवर रामबाण उपाय शक्य होतो. या प्रकारच्या केसगळतीला ’TELOGEN EFFLUVIUM’ असे म्हटले जाते. जसे असंतुलित आहाराचा केसांवर अनिष्ट परिणाम दिसून येतो, त्याचप्रकारे चुकीच्या झोपेच्या प्रकारामुळे किंवा व्यसनांमुळेही केसांवर अनिष्ट परिणाम होतो. उदा. रात्रीचे जागरण, विशेषत: पित्त प्रकृतीच्या व्यक्तीने केले, तर त्या व्यक्तीमध्ये आरोग्याच्या विविध तक्रारी लवकर उत्पन्न होतात व त्यांची प्रखरताही अधिक असते. अधिक त्रागा करणे, चिडचिड करणे, भांडणे इ. ने ही पित्ताच्या शरीरात अतिरेक वाढ होते. चुकीच्या जीवनशैलीमध्ये फक्त चुकीच्या आहार पद्घतींचा समावेश होत नाही, तर त्यात चुकीच्या झोपेच्या प्रकारचाही आणि नित्य दिवसातले आपले वेळापत्रक या सगळ्यांचाही अंतर्भाव होतो (आहार-विहार-आचार आणि निद्रा) जेवढे शास्त्र शुद्ध, तेवढे आरोग्यदायी आयुष्य!
'TELOGEN EFFLUVIUM' मध्ये केस गळू लागतात, पातळ होऊ लागतात, विरळ होतात, खरखरीत होतात, केसांमध्ये खाज येते. यामध्ये केसांचे मूळ क्षीण झालेले असते. त्यामुळे खूप जोरात केस विंचरले किंवा खूप जोरात (चंपी) करून केसांना तेल लावले (मॉलिश केली) किंवा गरम, पाण्याने केस धुतले, तर LOOSENED HAIR ROOTS मुळे या प्रकारच्या केसगळतीचे प्रमाण खूप अधिक वाढते आणि मग भीतीपोटी तेल लावणे बंदच होऊन जाते/केले जाते. मग विविध सिरम्स आणि कॉस्मॅटिक ट्रीटमेंट्सचा भडिमार होतो. पण, कायमस्वरूपी या तक्रारीपासून आराम मिळत नाही. मग पूरक व इतर पद्धतीने केसांचा ‘व्हॉल्यूम’ वाढविण्याचा प्रयास केला जातो.
 
’'TELOGENIC ALOPECIA'’ जर आटोक्यात आणायचा असेल, तर षड्रसात्मक (आयुर्वेदाने सहा चवींचा समावेश आहारातून असावा, असे सांगितले आहे.) आहाराचे नित्य सेवन करणे अत्यंत गरजेचे आहे. याने हळूहळू केसगळती, तर कमी होतेच, पण, उत्तम पोषण जर होत असेल, तर त्यामुळे केसांवर उत्तम एक LUSTRE/SHING येते. केसांचा दर्जा, पोत सुधारतो. पण, हे होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच केस गळणे थांबल्यावर, नवीन केस आल्यावरही संतुलित आहाराचे नियमित सेवन करावे.
 
केस गळण्याचे कारण जर कोंडा असेल, तर कोंड्याची चिकित्सा आधी करून घ्यावी. आयुर्वेदात कारणानुसार व्याधीमधील चिकित्सा बदलते म्हणजे 'TELOGENIC ALOPECIA’ यावरील चिकित्सा (आभ्यंतर औषधी चिकित्सा व बाह्य तेल/लेप इ. चिकित्सा) ही 'TRACTION ALOPECIA' पेक्षा भिन्न आहे. एकच औषध प्रत्येक प्रकारच्या केसगळतीमध्ये देऊन चालत नाही- त्याचे गुण मिळत नाहीत. केसांची त्वचा जर अधिक कोरडी असली, तर केस रोज ड्राय, FLAKY DANDRUFF निर्माण होतो आणि केसही गळू लागतात. अशा वेळेस, केसांना तेल/शिरोभ्यंग तर करावेच. पण, त्याचबरोबर व्यायामही करावा. व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि घामातून स्निग्ध स्राव येत असल्यामुळे शुष्कता-कोरडेपणा कमी होण्यास मदत होते. अतिरिक्त घाम येत असल्यास, तो मुुरू देऊ नये-पुसून काढावा अन्य प्रकारच्या केसगळतीबद्दल पुढील लेखात वाचूया. (क्रमश:)

वैद्य कीर्ती देव
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
9820286429