समाज-धर्म सुरक्षिततेसाठी...

    15-Jan-2024   
Total Views |
Gautam Rawaria

यशापयश, चढ-उताराच्या अनेक गाथा-कथांनी भारावलेले गौतम रावरीया यांचे जीवन. एक यशस्वी उद्योजक ते धर्मप्रेमी नागरिक म्हणून लौकिक असणार्‍या गौतम यांच्या जीवनाचा परिचय करुन देणारा हा लेख...

अवघे सातवी शिकलेले गौतम रावरीया आज ’एनजीएम हायजिनकेअर प्रा. लि. कंपनी’चे सर्वेसर्वा आहेत. पण, हे उद्यमी ऐश्वर्य सहज उभे राहिलेले नाही, तर त्यासाठी गौतम यांना प्रचंड टक्केटोणपे खावे लागले. पैशांच्या पुढे विश्वास, माणुसकी कशी गुडघे टेकते, हे कू्रर सत्य त्यांनी अनुभवले. मात्र, तरीही गौतम यांच्या मनातले धर्मप्रेम आणि निखळ माणुसकी जीवंत आहे. आयुष्यभराचे संचित, उर्जेने एखादा व्यवसाय उभा करावा, तो व्यवसाय तेजीत चालावा आणि कुणीतरी स्वार्थाने त्या व्यवसायातून गौतम यांनाच बाहेरचा रस्ता दाखवावा, असे अनेकदा घडले. मात्र, त्यांनी विश्वासघात करणार्‍या, माणसांबद्दल जराही कटुता न बाळगता, सातत्यपूर्ण कष्टाची प्रामाणिक घोडदौड सुरूच ठेवली.
 
रावरीया कुटुंब मूळचे कच्छचे. कानजी आणि रानीबेन यांना सहा मुलं. त्यापैकी एक गौतम. रावरीया दाम्पत्य शेती काम करे. कानजी शेतीसोबतच अनेक उद्योग-व्यवसाय करून पाहत. पण, त्यातून कधीच पुरेसे अर्थार्जन होत नसे. मात्र, कानजी म्हणत हिंमत कधीच हारायची नाही. आता जे केले, त्यापेक्षा पुढे आणखी चांगले करण्याची जिद्द ठेवायला हवी. हाच मंत्र ते लहानग्या गौतम यांनाही सांगत, तर रानीबेन प्रचंड कुटुंबवत्सल. आपल्या लेकरांमध्ये कायम प्रेम, स्नेह राहावा असे तिला वाटे. ती गौतम यांना सांगे की, ‘तुझ्या सगळ्या भावंडांची काळजी तुला घ्यायची आहे. त्यामुळेच तुला देवीमातेने सगळ्यात हुशार बुद्धिमान बनवले आहे.’ असो. कच्छच्या गावात गौतम यांचे लहानपण गेले. गौतम त्यावेळी सातवीला होते. एके दिवशी गौतम शाळेत जाण्यासाठी बसमध्ये बसले. मात्र, गौतम यांचा चालक, वाहकाशी वाद झाला. किशोर वय होते. रागाने गौतम यांनी एसटीवर दगड मारला. पोलीस आले. कानजी यांनी प्रकरण कसेबसे मिटवले. मात्र, मुलाच्या कृत्याने ते व्यथित झाले. रागाने त्यांनी १३ वर्षांच्या गौतम यांना मुंंबईतील भांडूप येथे नातेवाईकांकडे राहण्यास पाठवले.

येथे ते एका किराणा मालाच्या दुकानात काम करू लागले. दोन वर्षांनी ते बीकेसी येथे एका झेरॉक्सच्या दुकानात कामाला लागले. पुढे दोन वर्षांनी त्यांनी झेरॉक्स काढून देण्याचे दुकान सुरू केले. दुकानाचा व्याप इतका वाढला की, गौतम यांना महिन्याला एक लाखांवर नफा होऊ लागला. या सगळ्या काळात आई-बाबांनी गौतम यांना घरी येण्यासाठी खूपदा विनवलेही. पण, यशस्वी झाल्याशिवाय गावी येणार नाही, असे गौतम यांनी ठामपणे सांगितले. १६व्या वर्षांत गौतम यांनी यशस्वी उद्योग सुरू केला; पण पितृछत्र हरपले.आता धाक देणारे कुणी उरले नव्हते. त्यातच वाईट संगत लागली आणि गौतम यांनी सगळी संपत्ती फुंकून टाकली. १७व्या वर्षांत ते पूर्ण कफल्लक झाले. दुकान बंद पडले. ते फूटपाथवर राहू लागले. याच काळात एका मित्राने ४० टक्के भागीदारीमध्ये व्यवसाय करण्यासंदर्भात विचारणा केली. झेरॉक्स मशिन्स भाड्याने देण्याचा व्यवसाय होता. गौतम यांनी होकार दिला आणि प्रचंड मेहनत करत त्यांनी मित्राच्या व्यवसायात बरकत आणली. मित्राचा व्यवसाय भरभराटीस आला. आता गौतम असले काय नसले काय, काही फरक पडणार नाही, असे वाटून मित्राच्या नातेवाईकांनी गौतम यांना कंपनीतून बाहेर काढले.

गौतम यांनी स्वतःचा झेरॉक्स मशीन भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी परदेशातून झेरॉक्स मशीन मागवल्या होत्या. त्यासाठी कोट्यवधी रूपयांचे कर्ज घेतले. मात्र, तत्कालीन सरकारी निर्णयामुळे सर्वच मशीन कस्टममध्ये अडकल्या. त्या मशीन कशाबशा सोडवल्या. मात्र, नुकसान इतके झाले की, घरदार विकावे लागले. पुन्हा कफल्लक परिस्थिती आली. या काळात पत्नी शांतीबेन यांनी खूप साथ दिली. इतके सगळे होऊनही गौतम यांचा देवा-धर्मावरचा विश्वास अढळ होता. ते आता दिवस-रात्र गोरेगावच्या राम मंदिरात नामस्मरण करू लागले. तिथेच माओजी पटेल भेटले. दोघांनी मिळून भांडवलदार गाठून पुन्हा व्यवसाय सुरू केला. मात्र, पुढे इथेही गौतम यांच्यासोबत विश्वासघातच झाला. तरीही ते डगमगले नाहीत. त्यांनी स्वतःच कंपनी सुरू केली. विशेष म्हणजे, कंपनीचा नफा हा पूर्वीच्या भागीदारीतल्या कंपनीपेक्षा कैकपटीने जास्त आहे. याच काळात ते धर्मकार्यासाठीही संघर्ष करत होते. विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाशी संपर्क आला. ’बोलो वीर बजरंगी’, ’हर हर महादेव’च्या घोषणेत त्यांनी धर्मसंस्कृती कार्य सुरू केले.

त्यांना वाटू लागले की, अयोध्येतले भव्य राम मंदिर उभे राहत आहे. मात्र, वस्ती पातळीवरील मंदिरांचे काय? त्यामुळेच कच्छ येथे अनेक मंदिरांचे त्यांनी पुनर्निर्माण केले. आरे कॉलनीमधल्या राम मंदिरामध्ये भजन-पूजन व्हावे, सेवाभावी उपक्रम व्हावे, यासाठी त्यांनी सहकार्‍यांसोबत ’बजरंग सत्संग मंडळ’ सुरू केले. या राम मंदिराशेजारी कब्रस्तान व्हावे, अशी काही लोकांची मागणी होती. मात्र, राम मंदिर ५० वर्षं जुने असून, तिथे आता भजन-पूजन सुरू झाल्याने, परिसरात १०० मीटरच्या अंतरावर कब्रस्थान नको, अशी मागणी गौतम आणि सहकार्‍यांनी केली. त्यासाठी जनजागरण केले. कब्रस्तानला विरोध करतो, हा राग मनात ठेवून एका टोळक्याने त्यांच्यावर हल्लाही केला. मात्र, गौतम ठाम आहेत. ते म्हणतात की ”अयोध्येतले राम मंदिर सुरक्षित आहे. आपण आपले घर आपल्या वस्तीतली मंदिरं आणि समाज सुरक्षित ठेवूया. त्यासाठी नव्या पिढीमध्ये जागृती करणे, हेच माझ्या आयुष्याचे ध्येय!” हे धर्मशील विचारकार्य नव्या पिढीला जागृत करणारे आहे, हे नक्की.बोलो वीर बजरंगी, हर हर महादेव!





आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.