काबूल : अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट आल्यापासून पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्याच्या जागी बिघडतच आहेत. मागच्या काही काळापासून पाकिस्तानच्या सैन्य ठिकाणांवर हल्ले होत आहेत. हे हल्ले अफगाणिस्तानमधून येणारे हल्लेखोर करत आहेत, असा आरोप पाकिस्तानने केला आहे. त्यामुळे दोन्ही देशांचा तणाव शिगेला पोहोचला आहे. त्यातच आता दोन्ही देशांनी द्विपक्षीय व्यापारावर सुद्धा निर्बंध लादले आहेत.
दोन्ही देशांदरम्यान तोरखाम सीमेवरून होणारा द्विपक्षीय व्यापार सलग दुसऱ्या दिवशीही ठप्प राहिला. शनिवारपासूनच अफगाणिस्तान आणि पाकिस्तानने एकमेकांच्या सीमेवर वाहनांना प्रवेश दिला नाही. दोन्ही देशादरम्यान व्हिसा समस्येवर त्वरित तोडगा निघत नाही.
पाकिस्तानने सर्व अफगाण ड्रायव्हर आणि त्यांच्या सहाय्यकांवर व्हिसा बंदी लादली आहे. ज्यांच्याकडे कायदेशीर कागदपत्रे नाहीत. त्यांना पाकिस्तानात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. याला प्रतिउत्तर म्हणून तोरखाम सीमेवर अफगाण तालिबानच्या अधिकाऱ्यांनी सर्व पाकिस्तानी वाहतूकदारांना देशात प्रवेश करण्यापासून रोखले आहे.
पाकिस्तानकडून अचानक लागू करण्यात आलेल्या निर्बंधामुळे दोन्ही बाजूंनी ट्रकच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या कारणाने तालिबान आणि पाकिस्तानमधील संघर्ष आणखीनच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.