ख्रिस्ती धर्मगुरूची यादवीची वल्गना आणि फाळणीचे कुटील मनसुबे

    15-Jan-2024
Total Views |
Christian pastor
 
मागास जाती-जमातींसाठी जसा अत्याचार प्रतिबंधक कायदा आहे, तसा कायदा हवा, अशी मागणी तेलंगणमधील अजयबाबू या ख्रिस्ती धर्मगुरूने केली. अशा प्रकारचा कायदा निर्माण न केल्यास, देशामध्ये यादवीसारखी परिस्थिती निर्माण होईल आणि त्यातून धार्मिक आधारावर देशाची फाळणी करण्याची मागणी केली जाईल, असेही तारे या धर्मगुरूने तोडले आहेत.

तेलंगणमधील अजयबाबू मद्दीसेट्टी नावाच्या एका ख्रिस्ती धर्मगुरूने एका नव्या वादाला तोंड फोडले. त्याने तेलंगणमध्ये नवीन ख्रिस्ती आणि मुस्लीम अल्पसंख्य कायदा आणावा, अशी मागणी केली. मागास जाती-जमातीसाठी जसा अत्याचार प्रतिबंधक कायदा आहे, तसा कायदा हवा, अशी मागणी या धर्मगुरूने केली. अशा प्रकारचा कायदा निर्माण न केल्यास, देशामध्ये यादवीसारखी परिस्थिती निर्माण होईल आणि त्यातून धार्मिक आधारांवर देशाची फाळणी करण्याची मागणी केली जाईल, असे तारे या धर्मगुरूने तोडले. हा जो प्रस्तावित कायदा असेल, त्यामुळे हिंदुत्व शक्ती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि भाजप यांच्यावर दबाव येईल, असे त्याचे म्हणणे. या शक्ती ख्रिस्ती आणि मुस्लीम समाजावर मोठ्या प्रमाणात हल्ले करीत असल्याचा आरोपही त्याने केला. तेलंगण राज्याचे नवे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना असा कायदा करण्याचे आवाहन त्याने केले आहे.

आपल्या एका व्हिडिओमध्ये अजयबाबू याने ही मागणी केली. “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि भाजप यांच्यासारख्या शक्तींनी अनेक ख्रिस्ती धर्मगुरूंना ठार केले आहे. अनेकांवर हल्ले केले आहेत. देशभरात अनेक चर्चेस आणि मशिदींवर हल्ले करण्यात आले आहेत. अशा शक्तींना आळा घालण्यामध्ये सरकारला अपयश आल्यास, येथील हिंदू उत्तरेकडे जातील आणि ख्रिस्ती, मुस्लीम, बौद्ध आणि अन्य अल्पसंख्याक समाज हा दक्षिणेकडे जाईल. त्यांच्याकडून देशाच्या फाळणीची मागणी केली जाईल,” असे या धर्मगुरूने म्हटले आहे. सध्या धार्मिक संघर्षांच्या ज्या घटना घडत आहेत, त्या दहशतवाद किंवा नक्षलवाद यांच्यापेक्षा गंभीर आहेत, असेही त्याने म्हटले आहे.

आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल हा धर्मगुरू तसा प्रसिद्ध. भारतातील ख्रिस्ती आणि मुस्लीम समाजामध्ये फुटीरतेची बीजे पेरण्याचे काम त्याच्याकडून सातत्याने केले जाते. चर्च आणि मशिदींवर हल्ले केले जात असल्याची खोटीनाटी वक्तव्ये त्याच्याकडून केली जात असतात. अलीकडेच अजयबाबूने काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला असून, त्याला काही महिन्यांपूर्वी तेलंगण काँग्रेस प्रचार समितीचा समन्वयक म्हणून नेमण्यात आले. अधिकाधिक भारतीय ख्रिस्ती कसे होतील, असा प्रयत्न ख्रिस्ती धर्मगुरू करीत आहेत. गेल्या काही शतकांपासून या ख्रिस्ती धर्मप्रसारकांकडून धर्मप्रसाराचे जे कार्य सुरू होते, ते भारतास स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही सुखनैव सुरू आहे, हे अजयबाबू नावाचा ख्रिस्ती धर्मगुरू ज्या प्रकारची वक्तव्ये करीत आहे, त्यावरून दिसून येते. हे केवळ तेलंगणमधील उदाहरण झाले. असे देशविघातक विचार पसरविणारे धर्मगुरू देशाच्या अन्य राज्यांतही नक्कीच सक्रिय असतील. हिंदू समाजाने सतर्क राहून, अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे.

राम राज्य अब आ रहा हैं...
आचार्य सत्येंद्रनाथ यांना विश्वास

राम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पूजारी आचार्य सत्येंद्रनाथ यांनी दि. २२ जानेवारी रोजी राम मंदिराच्या गर्भगृहात प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असल्याचे सांगून ‘आता रामराज्य येत आहे’ असा विश्वास व्यक्त केला आहे. ”अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या भव्य मंदिरात श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. आमच्या अपेक्षेपेक्षा भव्य असे मंदिर राम जन्मभूमीवर उभारले जात आहे. अयोध्येतील वादग्रस्त वास्तूमध्ये रामललाची मूर्ती दि. २३ डिसेंबर १९४९ रोजी प्रकट झाली होती, तेव्हापासून न्यायालयाच्या आदेशानुसार त्या मूर्तीची पूजा केली जात आहे. मी दि. १ मार्च १९९२ रोजी रामललाचा पूजारी झालो. वादग्रस्त वास्तू पडल्यानंतर आम्ही रामललाची मूर्ती दि. ६ डिसेंबर रोजी एका तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या मंदिरात नेली. आज राम जन्मभूमीवर श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहत आहे, त्याचा आपणास अपार आनंद होत आहे,” असे आचार्य सत्येंद्रनाथ यांनी सांगितले. रामराज्य आता येत आहे, असे उद्गार त्यांच्या मुखातून यावेळी बाहेर पडले. यावेळी बोलताना आचार्य सत्येंद्रनाथ यांनी प. बंगालमध्ये पुरुलिया येथे साधूंवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. भगवा रंग पाहिला की प. बंगालच्या मुख्यमंत्री भडकतात, असा आरोपही त्यांनी केला. हिंदू समाजावर प. बंगालमध्ये सर्वाधिक हल्ले झाले, असा आरोपही त्यांनी केला. तृणमूल काँग्रेसच्या राज्यात हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराबद्दल साधू-संतांच्या मनात किती तीव्र संताप आहे, हे आचार्य सत्येंद्रनाथ यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेवरून दिसून येते.

सौरऊर्जेच्या क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेने!


सौरऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रामध्ये गुजरात हे आघाडीचे राज्य बनले असून, या क्षेत्रामध्ये या राज्याने देशापुढे एक आदर्श घालून दिला आहे. राज्यामध्ये सौरऊर्जेचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरवायला हवे, ही तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्पना. त्या कल्पनेने आज भव्य रूप घेतले असून, गुजरात राज्यात सौरऊर्जेचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात असल्याचे दिसून येते. सौरऊर्जेच्या क्षेत्रात गेल्या २० वर्षांपासून गुजरात राज्याने जी प्रगती केली आहे, ती अन्य राज्यांना प्रेरणा देणारी अशीच. सौरऊर्जेच्या क्षेत्रात गुजरात राज्याने केलेली प्रगती लक्षात घेऊन, गेल्या डिसेंबर महिन्यात गुजरातमध्ये ‘इंटर सोलर इंडिया’चे आयोजन करण्यात आले होते. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी २०२५ पर्यंत गुजरात राज्य हे भारताची अक्षयऊर्जेची राजधानी बनलेली असेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी कच्छमध्ये ३० हजार मेगावॅट क्षमतेच्या सौर आणि पवनऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. अशा प्रकारचा हा जगातील सर्वात मोठा प्रकल्प असल्याचा दावा केला जात आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या ‘कॉप २६’ परिषदेमध्ये पंतप्रधान मोदी यांनी ‘वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रीड’ याचा पुरस्कार आपल्या भाषणात केला होता. यामुळे केवळ उर्जा संकटच दूर होणार नाही, तर आपल्या भावी पिढ्यांना स्वच्छ आणि अक्षयऊर्जा खात्रीने मिळू शकेल, असा विश्वास व्यक्त केला होता. गुजरातमध्ये आज मोठ्या प्रमाणात ‘रूफ टॉप’ सौरऊर्जा यंत्रणांची उभारणी करण्यात आली आहे. याबाबतीत गुजरात हे देशातील आघाडीचे राज्य आहे. त्याशिवाय गुजरात राज्यात भव्य सोलर पार्क उभारण्यात आली आहेत आणि येत आहेत. त्यातून रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी सौरऊर्जेचा वापर करण्यासाठी, भारतातील अन्य राज्यांनी गुजरातचे उदाहरण पुढे ठेवायला हवे. सौरऊर्जा निर्मितीसाठी लागणार्‍या यंत्रसामग्रीचे देशामध्येच उत्पादन करण्याचा आदर्श गुजरातने घालून दिला आहे. सौरऊर्जेच्या क्षेत्रामध्ये भारताची आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल होत असून, त्यामध्ये गुजरात राज्य सर्वात पुढे आहे, असे म्हणता येईल.

तरूण तेजपाल यांनी मागितली माफी!

‘तेहलका’ नियतकालिकाचे संस्थापक आणि वादग्रस्त पत्रकार तरूण तेजपाल यांना एका ज्येष्ठ लष्करी अधिकार्‍याची मानहानी केल्याची ‘स्टोरी’ प्रसिद्ध केल्याबद्दल माफी मागावी लागली. इतकेच नव्हे तर त्या प्रमादाबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने तेजपाल यांना दहा लाख रुपये दंडही ठोठावला. निवृत्त मेजर जनरल एम. एस. अहलुवालिया यांच्याविषयी चुकीचे आरोप करणारा एक लेख प्रसिद्ध करण्यात आला होता. पण, आता तरूण तेजपाल आणि ‘तेहलका’चे सहसंस्थापक अनिरुद्ध बहल हे दोघे दि. १२ जानेवारी रोजी न्यायालयात उपस्थित राहिले आणि आपण सदर लष्करी अधिकार्‍यावर खोटे आरोप केल्याची कबुली दिली. सदर अधिकार्‍याने आपल्याकडे लाच मागितली नाही किंवा त्यांनी कोणाला लाच दिलीही नाही, अशी स्पष्ट कबुली या दोघांनी न्यायालयात दिली. ‘हिंदुस्तान टाइम्स’ या वृत्तपत्रासह प्रमुख दैनिकांमध्ये आपण बिनशर्त माफी मागू, असेही त्यांनी न्यायालयास सांगितले. सदर नियतकालिकाने २००२ मध्ये ती वादग्रस्त स्टोरी प्रसिद्ध केली होती. संरक्षण करारासाठी निवृत्त मेजर जनरल अहलुवालिया यांनी लाच स्वीकारल्याचा आरोप त्या स्टोरीमध्ये करण्यात आला होता. पण, तो खोटा असल्याचे सिद्ध झाल्याने तरूण तेजपाल आणि त्यांच्या साथीदारांना माफी मागावी लागली. तरूण तेजपाल यांनी त्यावेळी ‘स्टोरी’ प्रसिद्ध करून, सनसनाटी निर्माण केली असेल. आता त्याबद्दल त्यांनी माफी मागण्याचे ठरविले असले, तरी एका ज्येष्ठ लष्करी अधिकार्‍याची जी बदनामी केली गेली, ती अशा बिनशर्त माफीने थोडीच भरून निघणार आहे?


-दत्ता पंचवाघ