पुणे : ख्यातनाम शास्त्रीय गायिका स्वरयोगिनी प्रभा अत्रे (वय ९१) यांचे शनिवारी दि. १३ जानेवारीला पहाटे पुण्यात दुःखद निधन झाले. गेली अनेक दशके शास्त्रीय गायनासोबतच विविध गायन प्रकारांतून त्यांनी उच्चकोटीचे योगदान दिले. त्यांचा संगीत विषयाचा गाढा अभ्यास होता. त्यांनी अनेक नव्या संगीत रचना केल्या आणि ग्रंथ लेखनही केले आहे. त्यांना ‘पद्मविभूषण’सह तीनही पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
किराणा घराण्याच्या विख्यात गायिका प्रभा अत्रे यांचा जन्म १९३२ मध्ये पुण्यात झाला. ख्याल गायकीसोबतच, उपशास्त्रीय संगीत, नाट्यसंगीतासह विविध गायन प्रकारावर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांचे संगीतावर इंग्रजी ग्रंथलेखन प्रसिद्ध आहे. अलीकडेच २०२२ मध्ये त्यांना पद्मविभूषण सन्मानाने गौरविण्यात आले होते. त्याशिवाय अनेक राज्य सरकारांनीही त्यांचा सन्मान केला होता. त्यात महाराष्ट्र शासनाचा भारत रत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार, मध्यप्रदेशचा ‘कालीदास सम्मान’, त्याचप्रमाणे गुजरात, कर्नाटक आदी राज्यांनी केलेल्या सन्मानांचा समावेश आहे. तसेच त्यांच्या प्रदीर्घ सांगितिक वाटचालीत, संगीत क्षेत्रातील विविध ख्यातनाम संस्था आणि संघटनांनी त्यांचा गौरव केला आहे.
पुण्यात प्रदान केला होता ‘अटल संस्कृती गौरव’ पुरस्कार
अगदी अलीकडेच, पुण्यात २५ डिसेंबर २०२३ ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संस्कृती प्रतिष्ठानचा ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’ प्रभा अत्रे प्रदान करण्यात आला होता. यावेळी चंद्रकातदादा पाटील, मुरलीधर मोहोळ यांसह अनेक मान्यवर आणि पुणेकरांची समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थिती होती. त्यावेळी, नुकत्याच झालेल्या दुखापतीचा संदर्भ देत प्रभा अत्रे म्हणाल्या होत्या की ‘वाजपेयीजींचा आशीर्वाद पाठीशी असावा यामुळे मी इथे येऊ शकले असे मला वाटते.’ राजकारणात राहूनही नैतिकता जपणारा राष्ट्रप्रेमी अशा अधिकारी व्यक्तिमत्वाच्या नावाचा हा पुरस्कार आपल्याला मिळतो आहे याचा खूप आनंद आहे असे त्यांनी सांगितले होते. आपल्या ‘एनलायटिंग द लिसनर’ या पुस्तकाचे दिल्लीत वाजपेयींच्या हस्ते प्रकाशन झाले, त्यावेळी लेखनाबद्दल वाजपेयींचे विवेचनात्मक भाषण झाल्याची आठवण त्यांनी सांगितली.