राम आयेंगे तो...

    13-Jan-2024   
Total Views |
 T.J. Joseph

२०१० साली प्रा. जोसेफ यांच्यावर हल्ला करणार्‍या, ’पीएफआय’च्या दहशतवादी कृत्याचा मुख्य सूत्रधार सवाद याला नुकतीच अटक करण्यात आली. सवाद पकडला गेला, त्यापूर्वी ’पीएफआय’वरही बंदी आहेच. पण, त्याने केरळमधील कट्टर मानसिकतेच्या देशविघातक शक्तीवर परिणाम होईल का? तर दि. २२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होत आहे. केरळच्या परिस्थितीबाबतही एक ठाम आशावाद वाटतो, तो म्हणजे राम आयेंगे तो...

शहाजहा केरळच्या मट्टनूर येथे भाड्याने घर घेऊन राहत होता. त्याच्या कौमवाले त्याचा सन्मान करत. सुतारकाम करत असलेल्या आणि भाड्याने राहणार्‍या शहाजहाला त्याच्या मुस्लीम समुदायाचा अपवाद वगळून चांगलेच समर्थन होते. पण, काही दिवसांपूर्वी केरळ पोलिसांनी शहाजहाला पकडले. कारण, शहाजहा हा काही सुतारकाम करणारा कष्टकरी व्यक्ती नव्हता आणि त्याचे खरे नाव शहाजहाही नव्हते. त्याचे नाव होते-सवाद. १३ वर्षांपूर्वी केरळ पोलिसांनी त्याला शोधून देणार्‍या किंवा पकडून देणार्‍या व्यक्तीला दहा लाखांचे इनाम देण्याचे जाहीर केले होते. १३ वर्षं सवाद हा शहाजहा बनून केरळमध्येच अगदी सुखसमाधानात राहिला. सवाद हा प्रतिबंधित ’पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या दहशतवादी संघटनेचा सक्रिय कार्यकर्ता. दि. ४ जुलै २०१० साली केरळच्या न्यूमैन महाविद्यालयाच्या मल्याळम विभागाचे माजी विभागप्रमुख टी. जे. जोसेफ यांच्यावर सवाद आणि साथीदारांनी हिंसक हल्ला केला. त्यांनी प्रो. जोसेफ यांचा डावा हात तोडला आणि उजव्या पायावरही कुर्‍हाडीने वार केले. जोसेफ यांनी महाविद्यालयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पैगंबर मुहम्मद यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला होता. यामुळे म्हणे, राग येऊन बदला घेण्यासाठी ’पीएफआय’च्या कार्यकर्त्यांनी हे क्रूर कृत्य केले होते.

 स्वतंत्र भारतात लोकशाही राज्यात एका प्राध्यापकाने एक प्रश्न विचारला म्हणून त्याच्यावर असा हल्ला केला गेला होता. विशेष म्हणजे, महाविद्यालयाने जोसेफ यांचीच महाविद्यालयातून हकालपट्टी केली. हकालपट्टीचे कारण सांगितले की, जोसेफ यांनी मुस्लिमांच्या भावना दुखावल्या. हात तोडलेल्या, पायाने अधू केलेल्या, जोसेफ यांचे उदरनिर्वाहाचे साधनही गेले. या सगळ्या दुखाने व्यथित होत, याच काळात त्यांची पत्नीही वारली. जोसेफ यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली. शेवटी जानेवारी २०११ मध्ये त्यांच्यावर हल्ला केलेल्या, हल्लेखोरांवर तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, मुख्य आरोपी सवाद आखाती देशात पळून गेला, असे वरवर तरी निष्पन्न झाले. पोलिसांनी सवादला पकडून देणार्‍याला दहा लाखांचे इनाम जाहीर केले. शेवटी १३ वर्षांनंतर सवादलाही अटक करण्यात आली. न्यायालयाने जोसेफ यांच्या हल्ल्याबाबत १९ जणांना शिक्षा सुनावली. त्यात तीन जणांना आजन्म कारावास आणि १६ जणांना आठ वर्षं कारावासाची शिक्षा दिली. न्यायालयाच्या या निकालाने आणि सवादच्या अटकेनंतर जोसेफ यांनी म्हटले की, “एक कायदा-सुव्यवस्था मानणारा नागरिक म्हणून १३ वर्षांनी का होईना; पण मुख्य आरोपीला अटक झाली, ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे. पण, माझ्या मते माझ्यावर हल्ला करणारा, तो काही प्रमुख गुन्हेगार नाही, तर प्रमुख आरोपी ते आहेत, ज्यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा कट रचला आणि त्याअंतर्गत माझ्यावर हल्ला करण्यासाठी सवाद आणि त्याच्या साथीदारांना चिथावले. १९ हल्लेखोरांना शिक्षा झाली; पण त्यांना हल्ला करण्याची चिथावणी देणारे मुख्य गुन्हेगार आहेत, त्यांना शिक्षा झाली नाही.”

प्रा. जोसेफ यांचे हे विधान खूपच महत्त्वाचे आणि वास्तव आहे; कारण सवाद आणि त्याच्या साथीदारांना धर्माच्या नावाने कट्टर मानसिकतेचे क्रूर हिंसक बनवणारे वेगळेच लोक होते, जे तरुणांना देश आणि देशातील मुस्लिमेतर लोकांविरोधात भडकवत असतात. मुस्लीम युवकांना जिहादच्या नावाने भरकवटत असतात. ’जहन्नूम दोजख कयामत का दिन’ वगैरेची भीती दाखवून, या तरुणांकडून काहीही कृत्य करून घेतात. जन्नत, हूर वगैरेंचे आमिष दाखवत, या तरुणांना बेकायदेशीर कृत्य करण्यास भरीस पाडतात. ’पीएफआय’ आणि ’पीएफआय’ संबंधित ’रिहॅब इंडिया फाऊंडेशन’, ’कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया’, ‘ऑल इंडिया इमाम काऊंसिल’, ’नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ ह्यूमन राईट्स ऑर्गनायझेशन’, ‘नॅशनल वुमेन्स फ्रंट’, ‘ज्युनियर फ्रंट’, ‘एम्पॉवर इंडिया फाऊंडेशन’ आणि ‘रिहॅब फाऊंडेशन’ या सगळ्या संघटनांवर कायदेशीररित्या सरकारने बंदी घातली आहे. मात्र, तरीही केरळमध्ये आजही ’पीएफआय’ संघटनेचे फुटीरतावादी व्यक्ती देशद्रोही काम करत असावेत, असा अंदाज आहे. इतकेच काय ‘नॅशनल इन्वेस्टिगेशन एजन्सी’ने मागे केरळ पोलीस प्रशासनाला एक अहवाल सोपवला होता. त्यानुसार केरळमध्ये कमीत कमी ८७३ पोलीसकर्मी हे प्रतिबंधित ’पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी थेट जोडलेले होते. राज्याचे सब-इन्सपेक्टर ते स्टेशन हेड ऑफिसर ते अधिकारीही त्यामध्ये ’पीएफआय’शी संबंधित होते. काही महिन्यांपूर्वीच एका पोलीस अधिकार्‍याला नोकरीतून काढूनही टाकण्यात आले. कारण, त्याने आपल्या अधिकाराचा वापर करत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका जबाबदार व्यक्तीची पूर्ण माहिती काढून, ’पीएफआय’ला दिली होती. अशाच एका घटनेमध्ये मुन्नार येथेही तीन पोलिसांची बदली करण्यात आली होती. ’पीएफआय’कडे पैसे कुठून येत असतील?

’पीएफआय’ची बँक खाती पाहिली, तर एखाद्या मोठ्या कंपनीचीही बचत ’पीएफआय’च्या बँकेतल्या शिलकी इतकी नव्हती. ’पीएफआय’चे म्हणणे होते, आखाती देशातील दानशूर लोक त्यांना आर्थिक सहकार्य करतात. पण, हे खोटे होते. कारण, ’पीएफआय’च्या देशद्रोही कृत्यांचा मागोवा घेताना निष्पन्न झाले की, ’पीएफआय’ला हवालाच्या माध्यमातून पैसे मिळायचे. ़’पीएफआय’चा सदस्य केए रऊफ शरीफ याला चीनने मास्क पुरवण्यासाठी म्हणे एक कोटी रूपये दिले होते, तर ’पीएफआय’च्या कलीम जाशा याला एका चिनी कंपनीने अशाच प्रकारे पाच कोटी रूपये दिले होते. या दोघांनीही या पैशांचा उपयोग काय केला असेल? तर पोलीस प्रशासनाच्या अहवालानुसार, या पैशांचा वापर ’पीएफआय’ने सीएए प्रदर्शन, सोशल मीडियावर दिल्ली दंगल आणि बाबरीवर पोस्ट तयार करून, लोकांना भडकावण्यासाठी केले. ’ईडी’च्या म्हणण्यानुसार, केए रऊफ शरीफने चीनकडून मिळालेल्या पैशांचा वापर हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेबद्दल देशात अस्थिरता माजावी, यासाठी केला होता. त्याआधी २०१४च्या अहवालानुसार, २७ राजनैतिक हत्यांमध्ये ’पीएफआय’चे कार्यकर्ते गुन्हेगार होते. तसेच केरळमधील १०६ धार्मिक दंग्यांमध्ये ’पीएफआय’ संबंधित होती. २३ राज्यांत जाळे पसरलेल्या ’पीएफआय’वर सध्या बंदी आहे. पण, या संघटनेने कट्टर हिंसकतेचे आणि हिंदू द्वेषाचे विष केरळमध्ये पेरले आहे. त्यामुळेच मागे आलपुझ्झा येथे ’पीएफआय’ने ‘सेव्ह द रिपब्लिक’ नावाचे एक आंदोलन केले होते. तेव्हा त्या आंदोलनात एका बालकाने म्हटले होते की, “हिंदू आणि ख्रिश्चनांनो, तुम्ही ठीक राहाल, तरच आमच्या जमिनीवर राहू शकाल.

नाही तर हिंदूनो आणि ख्रिश्चनांनो, तुम्ही तुमच्या अंतिम संस्काराची तयारी करा. संघींनो(राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) तुम्ही एक दिवस आम्ही आमच्या बाबरी आणि ज्ञानवापी मशीदमध्ये पुन्हा सजदा करणार. संघींनो, आम्ही मरण्यापूर्वी तुम्हाला मारून टाकून, तुमचा काल बनून आम्ही आलो आहोत.” ज्या वयात इतर मुलं खेळण्याशी खेळतात, त्या वयातील या बालकाच्या मनात मुस्लिमेतर लोकांबद्दल इतका हिंसक द्वेष कुणी भरला? बरं, हा देश मुस्लिमांचा आहे आणि बाकी हिंदू ख्रिश्चनांनी मुस्लिमांच्या इच्छेने जगायला हवे, असे त्याला कुणी शिकवले असेल? रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांना मारून टाकायचे आणि बाबरी मशीद तसेच ज्ञानवापी मशिदीमध्ये सजदा करायचे, हेच आयुष्याचे ध्येय आहे, हे त्याला कुणी सांगितले असेल? या मुलाचा हे बोलताना व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला. पोलिसांनी ’पीएफआय’कडे याबाबत चौकशी केली, तर ’पीएफआय’चे म्हणणे होते, आमचा काही संबंध नाही. अर्थात ’पीएफआय’चे म्हणणे काहीही असले आणि आता या संघटनेवर बंदी आणली असली, तरी एखादे लहान मुल इतके हिंसक, क्रूर मानसिकतेचे कसे बनले? आणि संघटनेवर बंदी आणली, तरी या बालकाच्या आणि त्याच्यासारख्या हजारो बालकांच्या मानसिकतेवर तर बंदी आणू शकत नाही ना? मुस्लिमेतर समाजाबद्दल पराकोटीचा द्वेष आणि हिंसात्मक विचार घेत, हे बालक आज ना उद्या तरूण होणार आहे. ’पीएफआय’ने केरळमधली अशी पिढी खराब केली आहे. त्यामुळे जोसेफ यांच्यावर हल्ला करणारा सवाद जरी पकडला गेला, तरी आणखी असे हजारो सवाद केरळमध्ये बालपणातून तारुण्यात प्रवेश करत असणार. देवभूमी केरळाला लागणारे, हे ग्रहण कधी संपणार? दि. २२ जानेवारीला रामललांची प्राणप्रतिष्ठा होत आहे. राम येणार आहेत. कदाचित केरळच्या कट्टर हिंसक देशद्रोहीवृत्तीच्या राक्षसांचा अंतही होईल का? राम आयेंगे तो...


 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.