आद्य नाटककार विष्णुदास भावे यांनी ‘सीतास्वयंवर’ या नाटकाने मराठी नाट्यसृष्टीचा पाया रोवला. यानंतर रंगभूमीवर अनेक अजरामर कलाकृतींनी आपली छाप सोडली. याच कलाकृतींचा ठेवा जपणारे नाट्य संमेलन म्हणजे कलाकारांसाठी जणू दिवाळीच! असा हा १००व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा भव्य सोहळा सांगली येथे नुकताच संपन्न झाला. त्यानंतर दि. ६ जानेवारी रोजी पिंपरी-चिंचवड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १००व्या नाट्य संमेलनाचा शुभारंभ झाला. अशा शंभरी ओलांडलेल्या नाट्यसृष्टीची सर्व रंगकर्मी आजही तितकीच मनोभावे सेवा करतात. अभिनेता असो वा अभिनेत्री, या रंगभूमीने हजारो कलाकारांना घडविले. म्हणूनच आज या रंगभूमीने कसलेल्या मराठी कलाकारांना हिंदीसह अन्य भाषिक चित्रपटसृष्टीतही तितकीच मागणी. याच संधीचं सोनं करत, रंगदेवतेला विनम्र अभिवादन करत, नुकतीच १००व्या नाट्य संमेलनाची सुरुवात झाली. तब्बल पाच महिने सुरू राहणार्या या नाट्य संमेलनाची सांगता रत्नागिरीत होणार आहे. पिंपरीत झालेल्या संमेलनाच्या शुभारंभावेळी १०० वर्षांची परंपरा असणारी कलाकारांची नाट्य दिंडीदेखील अतीव आनंद, उत्साह आणि सकारात्मकतेने सुफळ संपन्न झाली. यानिमित्ताने दै. ‘मुंबई तरुण भारत’ने नाट्य संमेलनाविषयी रंगकर्मींच्या भावनांचा घेतलेला हा धांडोळा...
नवीन पिढीचे कामही कौतुकास्पद...
मराठी नाट्य संमेलनाचे हे १००वे वर्षं आणि याचा एक कलाकार म्हणून मला नक्कीच अत्यंत आनंद होत आहे. नाट्यसृष्टीतही नवी पिढी फार अप्रतिम काम करत आहे आणि विक्रम गोखले यांनी ज्येष्ठ कलाकारांसाठी दोन एकर जागा वृद्धाश्रमासाठी देऊ केली आहे, ही फार उत्तम बाब. मुळात विक्रम गोखले हा दानशूर माणूस होता. पण, माझ्यावर वृद्धाश्रमात राहण्याची वेळ येऊ नये, हीच इच्छा. या नाट्य आणि मनोरंजनसृष्टीला ज्या दोन ज्येष्ठ कलाकारांनी आपले जीवन समर्पित केले, ते निळू फुले आणि विक्रम गोखले आज असते, तर त्यांना नक्कीच १००व्या नाट्य संमेलनाचा प्रचंड आनंद झाला असता.-मोहन जोशी,ज्येष्ठ अभिनेते
...तर मराठी रंगभूमी अधिक सक्षम होत जाईल!
१००व्या नाट्य संमेलनावेळी नाट्य परिषदेचा अध्यक्ष होणं, ही माझ्यासाठी सर्वस्वी फार सुखद घटना आहे. नाटक हे मनोरंजनाचं फार पूर्वी एकमेव माध्यम होतं. त्यामुळे प्रेक्षकांची नाळ कायमच रंगभूमीशी एकनिष्ठ राहिली आणि जर का आम्ही कलाकार मंडळींनी त्यांना त्यांच्या आवडीच्या कलाकृती देऊ केल्या, तर मराठी रंगभूमी दिवसेंदिवस अधिक सक्षम होत जाईल, यात शंका नाही.-प्रशांत दामले, अभिनेते आणि अध्यक्ष,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
नाट्यसृष्टी अधिक बळकट
पहिल्यांदाच मी नाट्य संमेलनात सहभागी झाले आहे आणि त्यातही ते शंभरावं संमेलन असल्यामुळे, याचा मला भाग होता आला, ही माझ्यासाठी फार आनंदाची बाब आहे. नाट्यदिंडीतदेखील मी कलाकारांचा उत्साह पाहिला, अनुभवला आणि आम्हा कलाकारांसाठी हे नाट्य संमेलन म्हणजे सोहळाच. काळ बदलत चालला आहे, तशी संस्कृतीदेखील बदलते. पण, आपल्या मूळ संस्कृतीचा विसर न पडता, ही नाट्यसृष्टी अधिक बळकट होत आहे, याचा अभिमान वाटतो.-प्रिया बेर्डे, अभिनेत्री
रंगभूमीने चेहरा मिळवून दिला
२००० साली ‘तुमचा मुलगा करतो काय’ हे माझं पहिलं नाटक रंगभूमीवर आलं. तेव्हापासून माझी रंगभूमीशी नाळ जोडली गेली. मी खूप कमी नाट्य संमेलनाला हजर राहिलो; पण १००व्या नाट्य संमेलनाचा भाग होता येणं, यापेक्षा अभिमानाची गोष्ट माझ्यासाठी नाही. मुळात मी नट होईन का? इथंपासून माझी सुरुवात होती. परंतु, एकांकिकेने ते बळ दिलं आणि या रंगभूमीने आम्हा चेहरा नसलेल्या, कलाकारांना चेहरा मिळवून दिला आणि १००व्या नाट्य संमेलनाला आमचा हातभार लागणे, ही कलाकार म्हणून एक अभिमानाचीबाब आहे.-सिद्धार्थ जाधव, अभिनेता
कलाकारांना रंगभूमीची ओढ
१००व्या नाट्य संमेलनात सहभागी होता आले, याचा मला मनस्वी आनंद आहे. नाट्यदिंडीत सहभागी झाल्यानंतर सर्व कलाकारांची रंगभूमीसाठी असलेली ओढ आणि त्यांचे नाते जवळून अनुभवता आले.-सुरेखा कुडची, अभिनेत्री
रंगभूमी हेच माझे प्रेम आणि सर्वस्व
खरं तर आज आम्हा कलाकारांची ‘सेंच्युरी’ झाल्यासारखं वाटतंय. १०० हा आकडा फार महत्त्वाचा. पण, या १००व्या नाट्य संमेलानाचा एक लहानसा भाग होणं, हीच फार मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. कारण, महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांपासून सुरू झालेला प्रवास हा चित्रपटांपर्यंत पोहोचला, तो केवळ रंगभूमीमुळेच! त्यामुळे रंगभूमी हे प्रेम, जिव्हाळा आणि सर्वस्व.-प्रशमेश परब, अभिनेता
स्मिता पाटील यांना मानवंदना
आतापर्यंत मी मराठी नाटक व्यावसायिकरित्या कधीच केले नाही. त्यामुळे मला जेव्हा १००व्या नाट्य संमेलनासाठी विचारणा करण्यात आली, त्यावेळी माझ्या मनात भावना आल्या की, मी या रंगभूमीचं, कलेचं काही देणं लागते आणि त्यातही अभिनेत्री स्मिता पाटील यांची मी खरंच पूजा करते. त्यामुळे त्यांना मानवंदना या संमेलनातून मला देण्याची संधी मिळत होती आणि मी त्या संधीचं सोनं केलं.-पूजा सावंत, अभिनेत्री