२२ जानेवारी २०२४ हा दिवस केवळ भारतीयांसाठीच नव्हे, तर जगासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी अवघे जग आतूर झाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. जगातील तब्बल १६० देशांत यानिमित्त विविध कार्यक्रम होणार असून, त्याचवेळी अयोध्येतून त्याचे थेट प्रक्षेपणही होणार आहे. त्याचा आनंद कोट्यवधी रामभक्तांना घेता येणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्याचा योग जगविख्यात न्यूयॉर्क येथील टाइम्स स्क्वेअरलाही मिळणार आहे. जागतिक व्यापार केंद्र असलेल्या, न्यूयॉर्क शहरात मॅनहॅटननजिक असलेले टाइम्स स्क्वेअर पर्यटकांसाठी आकर्षण आहे. हा चौक दिवसाचे २४ तास गजबजलेला आणि विविध प्रकारच्या जाहिरातींच्या लखलखाटाने डोळे दीपवून टाकणारा असतो.
अमेरिकेत पर्यटनासाठी गेलेली व्यक्ती टाइम्स स्क्वेअरला भेट देतेच. एवढे महत्त्वाचे पर्यटन केंद्र म्हणून टाइम्स स्क्वेअरची ख्याती आहे. टाइम्स स्क्वेअर हा अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील मध्यवर्ती भाग आहे. मिडटाऊन मॅनहॅटनमध्ये असलेला हा चौक पर्यटन, व्यवसाय आणि मनोरंजनाचे मोठे केंद्र आहे. टाइम्स स्क्वेअरमधून रोज तब्बल साडेतीन लाख लोक ये-जा करतात. यातील बहुतांश देश-विदेशातील पर्यटक असतात. गर्दीच्या दिवशी पाच लाखांपेक्षाही अधिक लोक येथे येतात, तर दरवर्षी सात कोटींपेक्षा अधिक लोक या चौकास भेट देतात. त्यामुळे व्यापार, मनोरंजन आणि पर्यटनाचे जागतिक केंद्र म्हणून टाइम्स स्क्वेअरला जगभरात ख्याती लाभली आहे. या चौकात काही सेकंदाच्या जाहिरातीसाठी हजारो डॉलर्स मोजावे लागतात.
गान कोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतीला काही मिनिटे उजाळा या चौकात देण्यात आला. त्याचे वृत्तही अमेरिकेतील आघाडीच्या वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केले होते. एवढे अनन्यसाधारण महत्त्व असलेला, टाइम्स स्क्वेअर दि. २२ जानेवारी रोजी राममय होणार आहे. श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचे थेट प्रक्षेपण येथे करण्यात येणार आहे. त्याची जय्यत तयारी आणि प्रसिद्धी करण्यात येत आहे. दि. २२ जानेवारीला सकाळी अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सुरू होईल, त्यावेळी न्यूयॉर्कमध्ये मध्यरात्र असेल, तरीही या ठिकाणी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. त्यासाठी येथे बसण्याची तसेच अल्पोपहाराची सोय करण्यात येणार आहे. टाइम्स स्क्वेअर येथे दि. ३१ डिसेंबरला रात्रभर जल्लोष असतो. तसाच उत्साह दि. २२ जानेवारीला असेल, असे येथील भारतीयांचे म्हणणे आहे. टाइम्स स्क्वेअर हा श्रीराम प्राणप्रतिष्ठेचा साक्षीदार होणार आहे, त्याचबरोबर येथे अयोध्येतील थेट प्रक्षेपण केले जाणे, ही येथे वास्तव्य करणार्या, प्रत्येक भारतीयासाठी गौरव आणि अभिमानाची बाब मानली जात आहे.
अमेरिका, कॅनडात विश्व हिंदू परिषद आणि हिंदू स्वयंसेवक संघाने प्राणप्रतिष्ठा प्रसार आणि प्रचाराची मोहीम हाती घेतली आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, शिकागो, अटलांटा, न्यूजर्सी आदी ठिकाणी तसेच कॅनडात टोरंटोसह अन्य शहरांत आणि युरोपीय देशातही प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची मोहीम राबवली जात आहे. त्यात न्यूयॉर्कच्या टाइम्स स्केअर येथून होणार्या, थेट प्रक्षेपणाची दखल अमेरिकेतील प्रमुख माध्यमांनी घेतली आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद जगभरातील रामभक्तांना मिळावा, या उद्देशाने स्थानिक भारतीयांनी ही मोहीम हाती घेतली असून, त्यास तेथील प्रशासनाचाही अनुकूल पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे विश्व हिंदू परिषदेच्यावतीने प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे १६० देशांत थेट प्रक्षेपण करण्याचा संकल्प केला असून, त्यात टाइम्स स्क्वेअरचाही समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे नेतृत्व स्वीकारल्यापासून जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा सुधारण्याबरोबरच भारतीय आणि हिंदुत्वाचा आदरही जगभरात वाढला आहे. त्यातूनच आखाती देशांतही भव्य हिंदू मंदिरांची उभारणी झाली. अमेरिकेत गेल्याच वर्षी जगातील दुसर्या क्रमांकाचे सर्वात मोठे असे स्वामी नारायण मंदिराचे उद्घाटन झाले. त्यात यंदाच्या वर्षी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा साक्षीदार टाइम्स स्क्वेअर होत आहे. अयोध्येतील रामनाम केवळ भारतातच नव्हे, तर सातासमुद्रापार पोहोचले! हेच बदललेल्या भारताचे प्रतिबिंब आहे.
मदन बडगुजर