लखनौ : लग्नाच्या बहाण्याने एका मुलीवर बलात्कार करून धर्मांतरासाठी दबाव टाकल्याची घटना उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून उघडकीस आली आहे. अफिफुल्ला असे आरोपीचे नाव आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिला पूजा करण्यापासून रोखण्यात आले. तिला मौलवीकडे नेण्यात आले. इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने त्यांनी पीडितेला मारहाण केली.
पीडितेने दि.९ जानेवारी २०२४ रोजी लखनौ येथे या संदर्भात तक्रार नोंदवली. मात्र हे प्रकरण नोएडाशी संबंधित असल्याने ते नोएडा पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे. वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, लखनौची राहणारी २७ वर्षीय हिंदू पीडित तरुणी नोएडामधील एका खासगी कंपनीत काम करत होती. यावेळी त्यांची भेट रामपूर येथील रहिवासी अफिफुल्ला याच्याशी झाली. अफिफुल्लाने तरुणीशी मैत्री केली. तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले.
तरुणीचा आरोप आहे की, तिला विश्वासात घेतल्यानंतर अफिफुल्लाने तिला एका हॉटेलमध्ये नेले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. तिने विरोध केला असता त्याने तिला लग्न करणार असल्याचे वचन दिले. लग्नाच्या नावाखाली अफिफुल्लाने तरुणीला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तरुणीने त्याला लग्नासाठी विचारले असता त्याने नकार दर्शवला.
पीडितेची, अफिफुल्लाने बहिण उर्सा आणि हमना यांच्याशीही ओळख करून दिली होती. त्यांच्यासमोर लग्न करण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र नंतर लग्न करण्यासाठी त्याने तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. कथितरित्या, अफिफुल्लाने यासाठी तिला एका मौलवीकडेही नेले होते. या मौलवीनेही धर्म बदलण्यास सांगितले. तरुणीचा आरोप आहे की, अफिफुल्ला तिला इस्लामिक पुस्तके आणून द्यायचा आणि इस्लामिक कार्यक्रमांनाही घेऊन जायचा.
पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपीने तिला सांगितले की, गैर-इस्लामी मुलीशी लग्न करणे त्याच्या धर्मात निषिद्ध आहे. त्यामुळे त्याला इस्लामचा स्वीकार करावा लागेल. त्याने पीडितेच्या धार्मिक पुजांना ही विरोध केला. कथितरित्या, जेव्हा मुलगी इस्लाम स्वीकारण्यास राजी नव्हती तेव्हा त्याने आपल्या बहिणींसह तिला मारहाण केली.लखनौ पोलिस ठाण्याचे निरीक्षक अखिलेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या तक्रारीवरून अफिफुल्लाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नोएडातील आहे, त्यामुळे नोएडा पोलीस या प्रकरणाचा तपास करणार आहेत. हे प्रकरण लवकरच नोएडा येथे वर्ग करण्यात येणार आहे.